मुंबईतील टर्फना आता ‘स्मार्ट’ नियमांचा लगाम; ‘खेलो मुंबई’ ॲपवरून बुकिंग, विषारी रबर कणांवर बंदी

    22-Aug-2026
 
Mumbai Turf Rules
 
मुंबई (Mumbai Turf Rules) : मुंबईतील अनधिकृत व अनियंत्रित कृत्रिम टर्फ (आर्टिफिशियल टर्फ) आणि बॉक्स क्रिकेट मैदानांना शिस्त लावण्यासाठी महानगरपालिकेत 'ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ धोरण' लागू करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला आहे. भाजप नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी मांडलेल्या या ठरावाला मंजुरी मिळाल्याने आता पालिका प्रशासनाला यावर तातडीने कृती अहवाल (ॲक्शन टेकन रिपोर्ट) सादर करावा लागणार आहे.
 
​मुंबईत १ हजार ५०० हून अधिक टर्फ सुरू असून स्पष्ट नियमावलीअभावी रहिवाशांच्या आरोग्याचा आणि शांततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या ठरावामुळे टर्फ चालकांच्या मनमानी कारभाराला लगाम बसणार आहे. ​धोरणातील प्रमुख तरतुदीनुसार सर्व टर्फची नोंदणी, ऑनलाइन आरक्षण, परवानग्या आणि महसूल व्यवस्थापन पालिकेच्या 'खेलो मुंबई' ॲपद्वारेच अनिवार्य होईल, ज्यामुळे पारदर्शकता येईल. (Mumbai Turf Rules)
 
​खेळाडूंच्या आरोग्याला धोकादायक आणि कर्करोगास कारणीभूत ठरू शकणाऱ्या निकृष्ट रबर कणांवर (टॉक्सिक रबर क्रम्ब्स) बंदी घालून पर्यावरणपूरक साहित्याचा वापर सक्तीचा केला जाईल. निवासी भागातील उपद्रव टाळण्यासाठी सर्व टर्फवर संरक्षणात्मक छत जाळी (रूफ नेट) बसवणे बंधनकारक असेल.ध्वनीप्रदूषण, प्रखर फ्लडलाइट्सचा त्रास, वाहतूक कोंडी आणि अग्निसुरक्षेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल.​"मुंबईला क्रीडाप्रेमी शहर बनवताना नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करता येणार नाही. टर्फ बंद न करता त्यांना कायदेशीर चौकटीत आणणे हाच उद्देश आहे" असे भाजप नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी सांगितले. (Mumbai Turf Rules)
 
​खेळाडूंची सोय आणि रहिवाशांचे स्वास्थ्य यांचा सुवर्णमध्य साधणाऱ्या या निर्णयाची पालिका प्रशासन कशी अंमलबजावणी करते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. (Mumbai Turf Rules)
 
 




संबंधित मजकूर