चिपळूणचे कै. मोरेश्वर रामकृष्ण तथा मोरुभाऊ जोशी हे अशा निष्ठावान स्वयंसेवकांपैकी एक होते ज्यांनी संघाने दिलेली प्रत्येक जबाबदारी स्वतःचे कर्तव्य मानून तब्बल सात दशके संघ, समाज आणि राष्ट्रासाठी निरलस सेवा केली. त्यांचे जीवन म्हणजे संघनिष्ठा, साधेपणा आणि कर्तव्यपरायणतेचे प्रेरणादायी उदाहरण होय.
सन १९३२ मध्ये चिपळूणमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची सुरुवात झाली. अवघ्या वर्षभरात या कार्याचा आढावा घेण्यासाठी बाबाराव सावरकर यांच्यासह संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार चिपळूणला आले. त्यानंतर १९३७ मध्ये डॉ. हेडगेवार पुन्हा चिपळूणला आले. त्या भेटीदरम्यान मोरुभाऊ जोशी, बंधू संसारे, वॉचमेकर शिर्के, मापातील तांबट, काका खेडेकर, थत्ते वकील, साबळे यांसारख्या स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांचा परिचय झाला. ही भेट मोरुभाऊंच्या आयुष्यातील निर्णायक वळण ठरली. संघाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आयुष्यभरासाठी स्वयंसेवकत्व स्वीकारले आणि त्यानंतर संघकार्यच त्यांच्या जीवनाचा श्वास बनले.
मोरुभाऊंसाठी संघकार्य म्हणजे केवळ शाखेपुरते मर्यादित नव्हते. संघाने सांगितले म्हणून त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू महासभेच्या कामात सहकार्य केले, संघाच्या वर्तमानपत्रांचे वितरण केले, हिंदू विद्यार्थी बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली, तसेच १९४८ च्या पहिल्या संघबंदीच्या काळात सत्याग्रहींच्या संचलनाची जबाबदारीही सांभाळली. त्यांच्यासाठी कोणतेही काम लहान किंवा मोठे नव्हते; संघाचे काम म्हणजेच स्वतःचे कर्तव्य, अशी त्यांची धारणा होती.
मोरुभाऊंची आर्थिक परिस्थिती कधीच विशेष बळकट नव्हती. लहानपणी त्यांनी बैलगाडीतून लाकूडफाटा वाहून नेण्यापासून शेणगोठा आणि शेतीची कामे केली. पुढे १९५५ ते १९७० या काळात कराडचे वसंतराव देशपांडे आणि चिपळूणचे रामभाऊ फडके यांच्या सहकार्याने ठेकेदारी केली. आर्थिक लाभ फारसे मिळाले नाहीत, पण त्यांनी कधीच कोणाकडे हात पसरला नाही. स्वाभिमानाने जगत त्यांनी आपल्या कुटुंबाला आधार दिला आणि त्याचवेळी संघकार्यासाठी अधिकाधिक वेळ दिला.
मोरुभाऊंच्या संघनिष्ठेचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्यांची रोजची शाखा आयुष्यभर कधीच चुकली नाही. कै. अप्पा साठे यांच्यानंतर ते चिपळूणचे संघचालक झाले आणि जवळपास वीस वर्षे ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. संघातील प्रचारक, अधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी त्यांचे घर कायम खुले असे. पत्नी पायाने अधू असूनही त्यांनी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा प्रेमाने पाहुणचार केला. साधे आमटी-भाताचे जेवण असो किंवा राहण्याची व्यवस्था—जोशी कुटुंबाने संघकार्याला घराचे स्वरूप दिले.
सन १९६५ मध्ये त्यांनी नवीन घर बांधले आणि त्याच वर्षी सरसंघचालक श्रीगुरुजी यांचा मुक्काम त्यांच्या घरी झाला. पुढे एकनाथजी रानडे, बाळासाहेब देवरस, मोरोपंत पिंगळे, माधवराव मुळ्ये, नानाजी देशमुख, अप्पाजी जोशी, जगन्नाथराव जोशी, बाबाराव भिडे, रामभाऊ गोडबोले यांसारख्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी त्यांच्या घरी मुक्काम केला. हे केवळ आतिथ्य नव्हते; ते संघकार्यावरील त्यांच्या विश्वासाचे आणि समर्पणाचे प्रतीक होते.
संघकार्याबरोबरच मोरुभाऊ समाजजीवनातही सक्रिय राहिले. ते दहा वर्षे चिपळूण नगरपालिकेचे सभासद होते. पक्षभेद बाजूला ठेवून त्यांनी नगरविकासासाठी काम केले. परशुराम एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त, दातार महाविद्यालयाच्या समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी योगदान दिले. गावातील गोकुळाष्टमी, शिवरात्रीसारख्या उत्सवांमध्ये गळ्यात ढोल घालून सहभागी होणारा हा माणूस तितक्याच सहजतेने सामान्य कर्मचाऱ्यांपासून प्रतिष्ठित व्यक्तींपर्यंत सर्वांना आपलेसे करून घेत असे. पूर्वी सिगारेट ओढणारे मोरुभाऊ संघशिस्तीला बाधा येते म्हणून ती सवय कायमची सोडून दिली. साधेपणा आणि स्वयंशिस्त त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते.
१९४८ च्या संघबंदीच्या वेळी आणि १९७५ च्या आणीबाणीत त्यांनी कारावास भोगला. आणीबाणीच्या काळात त्यांचे ज्येष्ठ पुत्र मोहन हेही त्यांच्यासोबत कारागृहात होते. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही त्यांच्या पत्नीने कोणतीही तक्रार न करता संसार सांभाळला. त्या कुटुंबाने संघकार्यासाठी केलेला त्यागही तेवढाच मोठा होता. कारावासाच्या काळात त्यांची भाई वैद्य, ग. प्र. प्रधान, कुमार सप्तर्षी, किशोर पवार, भिकाजीराव चव्हाण यांसारख्या विविध विचारांच्या व्यक्तींशी मैत्री झाली. मतभेद असले तरी मनभेद नसावेत, हा त्यांच्या स्वभावाचा विशेष होता. मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुख असूनही ते अनेकांसाठी मित्र, मार्गदर्शक आणि आधारवड होते.
दि. ४ जुलै २००८ रोजी, वयाच्या सुमारे ८६ व्या वर्षी, मोरुभाऊ जोशी यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी म्हटले; चिपळूणच्या गेल्या सत्तर वर्षांच्या सामाजिक, राजकीय आणि संघजीवनाचा चालताबोलता इतिहास काळाआड गेला. मोरुभाऊ जोशी यांचे जीवन सांगते की संघकार्याचा खरा इतिहास मोठ्या पदांमध्ये नसतो; तो अशा स्वयंसेवकांच्या निःस्वार्थ सेवेत असतो, जे प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता आयुष्यभर राष्ट्रकार्याचा दीप तेवत ठेवतात. चिपळूणच्या संघपरंपरेत मोरुभाऊंचे स्थान अशाच एका अढळ, निष्ठावंत आणि प्रेरणादायी स्वयंसेवकाचे आहे.