सोशल मीडियावरील ‘फॉलोअर्स’च्या संख्येवरुन कलाकारांच्या ‘कास्टिंग’चा निर्णय : मानसी कुळकर्णी

    22-Aug-2026

Mansi Kulkarni Casting
 
 
आगामी ‘द्विधा’ या चित्रपटातून अभिनेत्री मानसी कुळकर्णी एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार असून, या चित्रपटाची ‘सहनिर्माती’म्हणूनही तिने यशस्वीपणे धुरा सांभाळली आहे. यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने मानसीशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी मानसीने आगामी चित्रपटाबरोबरच अनेक महत्त्वाच्या विषयांवरही अगदी मनमोकळेपणाने मतं व्यक्त केली. त्यात "सोशल मीडियावरील ‘फॉलोअर्स’ बघून कलाकारांचे ‘कास्टिंग’ केले जाते, तेव्हा वाईट वाटते. बरेचदा असे अनुभव आले आहेत,” असे सांगत, "मालिकेतील कलाकार आणि चित्रपटातील कलाकार असाही भेदभाव केला जातो,” अशी खंत यावेळी बोलताना व्यक्त केली.
 
वडील आणि मुलीच्या नातेसंबंधांवर आधारित ‘द्विधा’ हा हृदयस्पर्शी चित्रपट आहे. तेव्हा या चित्रपटाविषयी काय सांगशील?
 
दिग्दर्शक निलेश नाईक यांनी जेव्हा मला या चित्रपटाची गोष्ट ऐकवली, तेव्हा मला ती प्रचंड आवडली. बरं, गोष्ट ऐकताना माझ्या मनात ‘कास्टिंग’ वगैरेंचा काही विचार नव्हता. पण, मला गोष्ट आवडल्याचं लक्षात येताच, त्यांनी वेळ न दवडता, मलाच या भूमिकेबाबत विचारणा केली. गोष्ट उत्तम असल्यामुळे मी लगेच या भूमिकेसाठी होकार दिला. प्रत्येक कामाकडे व्यावसायिक नजरेतून बघायचं नसतं, तर जे काम आपल्याला समाधान देईल, अशा कामावर भर द्यायचा असतो. ‘द्विधा’हा चित्रपट त्यांपैकीच एक. ‘श्रावणी नाईक’सारखं पात्र मी कधीही साकारलं नव्हतं आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे, मी खलनायिकेच्याच भूमिका करते, असा लोकांचा समज होत चालला होता. त्यामुळे ती चौकटपण मला तोडायची होती. या चित्रपटाच्या निमित्ताने तो योग जुळून आला.
 
अभिनेते सतीश पुळेकर खूप शिस्तप्रिय आहेत. तेव्हा, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
 
मुळात आमच्यापैकी कोणीही बेशिस्त वागणारं नव्हतं. म्हणजे आता, बाई कडक आहेत, असं आपल्याला कधी वाटतं, जेव्हा आपण मस्ती करतो. पण, आपण मस्ती केलीच नाही, तर बाई कधी कडक वाटतच नाहीत. माझं शिक्षणपण या क्षेत्रात असंच झालंय. विश्वास सरांच्या तालमीत आम्ही घडलो. तालमीत सतत शिस्त असायची आणि हेच माझ्या पथ्यावर पडलं. कामाच्या बाबतीत तू म्हणालास, तर छोट्या छोट्या गोष्टी, भूमिकेचं निरीक्षण या सगळ्या गोष्टी सतीश सरांकडून शिकायला मिळाल्या. आपण सहसा कोणाला काही सांगायला जात नाही. कोण कसा प्रतिसाद देईल, आपल्याला माहीत नसतं. पण, सतीश सरांना माझ्यावर इतका विश्वास वाटला की, त्यांनी एक-दोन गोष्टी मला सुचविल्या आणि त्यांची मला माझ्या पात्रात बदल करताना खूप मदत झाली. माणसं उगाच मोठी नाही होत. बाकी शिस्त म्हणशील, तर आधीपासूनच अंगात आहेच.
 
अभिनयाबरोबरच ‘सहनिर्माती’ म्हणूनही चित्रपटाची जबाबदारी तुझ्याकडे होती. तेव्हा, हा अनुभव नेमका कसा होता?
 
‘सहनिर्माती’ हा फारच मोठा शब्द झाला. आमची निर्माती खरं तर विदुला आहे. तिने पूर्ण शेड्युल अगदी खमकेपणाने सांभाळलं. कारण, कुठलाही चित्रपट करायचा म्हटला ना, तर काय होतं, आपण आपल्या परीने कितीही काहीही करायचा प्रयत्न जरी केला, तरी शेवटी एक आर्थिक पाठबळ लागतंच. आमच्या निर्मात्यांनी अगदी सक्षमपणे सगळी बाजू चित्रपट सुरू होताना उत्तम सांभाळली. पण, नुसतं चित्रपटाचं चित्रीकरण संपवणं, एवढंच काम नसतं. ‘पोस्ट प्रोडशन’, ‘मार्केटिंग’, ‘पीआर’, ‘डिस्ट्रिब्युशन’ अशा बर्‍याच गोष्टी आहेत. मला एक तर चित्रपट प्रचंड आवडला; शिवाय माझी प्रमुख भूमिका असलेला हा पहिलाच सिनेमा. त्यामुळे कुठलीही गोष्ट कमी पडायला नको, म्हणून हा छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा मी निर्णय घेतला.
 
मराठी चित्रपटात नेहमीच ओरड असते की, सशक्त निर्माता नसल्यामुळे बरेच चांगले चांगले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. पण, जेव्हा तुझ्यासारखे कलाकार पुढाकार घेतात आणि हिंमत दाखवतात की, नाही, आम्ही सोबत आहोत, आपला चित्रपट फक्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हे खरोखरीचं तर स्तुत्य आहे.
 
सर्वप्रथम धन्यवाद की तू या गोष्टीची दखल घेतलीस. बरेचदा काय होतं की, लोकांची वृत्ती बरोबर नसते. एखादा निर्माता किंवा प्रायोजक मिळाला, तर त्याला पूर्णपणे ओरबाडून काढतो. या अशा वृत्तीमुळेच आपल्या इंडस्ट्रीची हानी होते. बर्‍याचजणांना चित्रपटात पैसे गुंतवण्याची इच्छा असते; पण अशा लोकांमुळे ते धजावत नाहीत. काही लोकांना आलेल्या भीषण अनुभवांमुळे दुसराही मग हिंमत करत नाही. आमच्या निर्मात्या आणि दिग्दर्शक दोघांचाही हेतू चांगला होता; म्हणून मीपण म्हटलं या लोकांच्या पाठीशी उभं राहायला हवं. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला.
 
चित्रपटांपेक्षा मालिकांमध्ये तू अधिक रमतेस का?
 
नाही, असं काही नाही. दूरचित्रवाणी तुमच्यासाठी सुरक्षित माध्यम आहे. कारण, तुम्हाला जास्त आणि नियमित मानधन इथे मिळतं. आता, माझे बरेच चित्रपट तयार आहेत; पण अजून प्रदर्शित झालेले नाहीत. मी एक अभिनेत्री म्हणून जोखीम घ्यायला आता तयार आहे. एका प्रायोगिक साच्यातून बाहेर निघून वेगवेगळे प्रयोग मला आता करायचे आहेत. माझे स्वतःचे दोन-तीन चित्रपट तयार आहेत; पण अजून त्यांच्या प्रदर्शनाचा पत्ता नाही. बरं, मला जास्त चित्रपटांच्या ऑफर्स येतात, असंही काही नाही. कदाचित दूरचित्रवाणी कलाकार आणि चित्रपटातील कलाकार असा भेदभाव होत असल्यामुळे असं होत असेल. ‘कास्टिंग’ होत असताना मी स्वतः हे बघितलंय. जेव्हा मी चित्रपट करत होते, तेव्हा काही कलाकारांची नावं सुचविली होती. पण, ‘ते फक्त दूरचित्रवाणीवर काम करतात,’ म्हणून त्यांचा त्या चित्रपटासाठी विचार केला गेला नाही. मला तेव्हा खूप वाईट वाटलं. अरे, आमचं काम बघा; मग ठरवा ना! मी नाटक करते; एकदा नाटक बघायला या. माझं काम बघा; मग माझी क्षमता ओळखा, हेचं माझं सगळ्यांना सांगणं आहे. हे सगळं कमी होतं की काय, म्हणून आता अजून एक डोयाला ताप झाला आहे. तुमचे ‘फॉलोअर्स’ बघून तुम्हाला काम मिळणार की नाही, हे ठरवलं जातं. आता, माझ्या ‘फॉलोअर्स’वरून तुम्ही आमची अभिनय क्षमता ठरवू शकत नाही. एखाद्या माणसाने मला ‘फॉलो’ केलं किंवा ‘लाईक’ केलं, याचा अर्थ असा नाही की, तो माणूस उद्या घराबाहेर पडून २५० रुपयांचे तिकीट काढून माझा चित्रपट सिनेमागृहातही बघायला येईल. बर्‍याच कलाकारांनी वर्षभरात या गोष्टीवर वारंवार बोलण्याचा मी प्रयत्नसुद्धा केला. कारण, बर्‍याच चांगल्या कलाकारांचे पुरेशा ‘फॉलोअर्स’च्या अभावी चित्रपटाचे काम हातचे गेले आहे. अगदी माझ्या बाबतीतही हे घडलं आहे. एका मोठ्या बॅनरच्या मोठ्या चित्रपटासाठी मी ऑडिशन दिलं होतं. माझी निवडदेखील होणार होती; पण ‘फॉलोअर्स’चा विषय निघाला आणि तो चित्रपट माझ्या हातातून गेला, याचं मला खूप वाईट वाटलं.
 
‘द्विधा’च्या निमित्ताने तुझी मुलगी ओवीदेखील मोठ्या पडद्यावर पदार्पण करीत आहे. मग नेमकं कसं झालं तिचं कास्टिंग?
 
तिच्या ‘कास्टिंग’चा एक वेगळाच किस्सा आहे. मी माझ्या लेकीबरोबर विरंगुळा म्हणून रील्स वगैरे करून पोस्ट करते. समाजमाध्यमांवर आमचे रील बघून आमचे दिग्दर्शक निलेश नाईक यांचा मला कॉल आला की, "ओवीसाठी एक भूमिका आहे. ती करेल का?” त्यावेळी मी त्याला म्हटलं की, "रील करणं आणि चित्रपटात भूमिका करणं, यात खूप फरक आहे.” पण, तरीसुद्धा निलेशने ओवीवर विश्वास ठेवला आणि तिचं ऑडिशन घेतलं. माझी मुलगी आहे, म्हणून मी सांगत नाही, पण ओवीने खूप गोड काम केलं आहे. माझं माझ्या मुलीला पूर्ण स्वातंत्र्य असेल. तिला आवड असेल, त्या क्षेत्रात तिने करिअर करावं.

-कपिल देशपांडे




संबंधित मजकूर