मुंबई : (Mangrol Indian Navy) भारतीय नौदलाच्या सागरी सुरक्षाक्षमतेत आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड (सीएसएल) येथे स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात आलेली ‘मंगरोल’ ही ‘अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट’ श्रेणीतील तिसरी नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. २१ ऑगस्ट २०२६ रोजी या नौकेचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले. (Mangrol Indian Navy)
कमी खोल पाण्यातील तसेच किनारपट्टीलगतच्या सागरी क्षेत्रात पाणबुडीविरोधी कारवाया करण्यासाठी ‘मंगरोल’ विशेष सक्षम आहे. पाण्याखालील भागाची टेहळणी, किनारी भागातील पाणबुड्यांचा शोध आणि त्यांच्याविरोधात कारवाई, कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा तसेच सुरुंगविरोधी मोहिमा राबविण्यासाठी या नौकेची रचना करण्यात आली आहे. (Mangrol Indian Navy)
८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्री
‘मंगरोल’च्या बांधणीत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील संरक्षण उत्पादन क्षेत्र आणि स्वदेशी जहाजबांधणीची वाढती क्षमता अधोरेखित होत आहे. अत्याधुनिक प्रणालींनी सुसज्ज असलेली ही नौका भारतीय नौदलाच्या किनारी सुरक्षाव्यवस्थेला अधिक बळकटी देणार आहे. ही नौका वॉटरजेट प्रणोदन प्रणालीवर चालते. अत्याधुनिक टॉर्पेडो, पाणबुडीविरोधी रॉकेट्स, प्रगत रडार आणि सोनार प्रणाली यांसारख्या उपकरणांनी ती सज्ज आहे. त्यामुळे कमी खोल पाण्यातील पाणबुडी शोध आणि पाणबुडीविरोधी युद्ध मोहिमांमध्ये तिची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (Mangrol Indian Navy)
गुजरातच्या किनारी शहरावरून नाव
गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील मंगरोल या किनारी शहर आणि लहान बंदराच्या नावावरून या नौकेला ‘मंगरोल’ हे नाव देण्यात आले आहे. मंगरोल हे सागरी मत्स्यव्यवसायाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. या नौकेला भारतीय नौदलाच्या इतिहासाचीही जोड आहे. यापूर्वी ‘आयएनएस मंगरोल’ हे माइनस्वीपर जहाज २००४ पर्यंत भारतीय नौदलाच्या सेवेत होते. त्या जहाजाच्या वारशाचे स्मरण या नव्या नौकेच्या माध्यमातून कायम ठेवण्यात आले आहे. महत्त्वपूर्ण युद्धनौकांची नावे पुढील पिढीतील जहाजांना देत त्यांचा वारसा जतन करण्याची नौदलाची परंपरा यामुळे पुढे सुरू राहिली आहे. (Mangrol Indian Navy)
‘आत्मनिर्भर भारत’ला बळ
‘मंगरोल’चे नौदलात आगमन हे केवळ एका नव्या युद्धनौकेचा समावेश नसून, स्वदेशी जहाजबांधणी आणि संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक आहे. देशातच अत्याधुनिक युद्धनौका विकसित आणि बांधण्याच्या क्षमतेत होत असलेली वाढ यामुळे अधोरेखित झाली आहे. ‘मंगरोल’च्या समावेशामुळे भारतीय नौदलाची किनारी आणि उथळ पाण्यातील पाणबुडीविरोधी युद्धक्षमता अधिक मजबूत होणार असून, समुद्री सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. ‘आत्मनिर्भर भारत’च्या संकल्पनेनुसार स्वदेशी संरक्षण उत्पादन परिसंस्थेला चालना देण्याच्या प्रयत्नांनाही या प्रकल्पामुळे बळ मिळाले आहे. (Mangrol Indian Navy)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.