ठाण्यात ‘महा वॉकेथॉन’चा उत्साह...

जलसंवर्धनासाठी पाणी-माती वाचवण्याचा हजारोंचा संकल्प...

    22-Aug-2026
Maha Walkathon  
ठाणे : (Maha Walkathon Thane)  ‘माती वाचवा, पाणी जपा-सुरक्षित भविष्य घडवा’ आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश देत ठाण्यात गुरुवारी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उत्साहात पार पडली. उपवन तलाव ते डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या सुमारे तीन किलोमीटरच्या पदभ्रमणात नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी उपस्थितांनी माती आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे संरक्षण करण्याची सामूहिक शपथ घेतली.
 
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच जलसंधारण दिन आणि जलसंधारण सप्ताहानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Maha Walkathon Thane)
 
उपवन तलाव येथून सुरू झालेली वॉकेथॉन आदिवासी आश्रम क्रांतिवीर राघोजी भांगरे चौक, वीरांगना झलकारीबाई मार्ग आणि वसंत विहार फाटामार्गे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पोहोचली. प्रारंभी वॉर्म-अप आणि झुंबा सत्राने सहभागींचा उत्साह वाढवला. (Maha Walkathon Thane)
 
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले की, या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला असून सहा ते सात हजारांहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली होती. जलसंवर्धनाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्गावर जनजागृती फलक लावण्यात आले होते. अभियानांतर्गत आयोजित रील स्पर्धेलाही तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सहभागाची मुदत वाढविण्यात आली आहे. (Maha Walkathon Thane)
 
मृद व जलसंधारण विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देवराज यांनी जलसंधारण सप्ताह हा केवळ शासकीय उपक्रम न राहता लोकसहभागातून व्यापक लोकचळवळ बनावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. नागरिकांच्या प्रतिसादामुळे रील स्पर्धेची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. (Maha Walkathon Thane)
 
कार्यक्रमात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, ठाणे शहराचे उपमहापौर कृष्णा पाटील, अधीक्षक अभियंता सूरज शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. (Maha Walkathon Thane)
 

 




संबंधित मजकूर