जेएनपीएची डबल स्टॅक झेप! पहिली लाँग-हॉल कंटेनर ट्रेन रवाना

३६० टीईयूज आयात कंटेनरची वाहतूक;मालवाहतुकीचा वेग वाढणार, बंदरातील थांबण्याचा कालावधी घटणार

Jawaharlal Nehru Port Authority
 
मुंबई : (Jawaharlal Nehru Port Authority) देशातील प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) समर्पित मालवाहतूक मार्गिकेवरील (डीएफसी) रेल्वे वाहतुकीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जेएनपीएतून पहिली डबल स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेन २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रवाना झाली. या ट्रेनमधून ३६० टीईयूज आयात कंटेनरची वाहतूक करण्यात आली असून, ती गुजरातमधील वर्णामा येथील सीजीएमव्हीच्या दिशेने रवाना झाली.
 
भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेडमार्फत हाताळण्यात आलेला हा आयात माल पीएसएच्या माध्यमातून बंदरात दाखल झाला होता. डबल स्टॅक लाँग-हॉल ट्रेनच्या या पहिल्या फेरीमुळे जेएनपीएची दीर्घ पल्ल्याची रेल्वे जोडणी अधिक मजबूत झाली असून, बंदरातून आयात-निर्यात मालाची जलद आणि कार्यक्षम वाहतूक करण्यास मोठी चालना मिळणार आहे. (Jawaharlal Nehru Port Authority)
 
एका फेरीत अधिक माल, वाहतुकीला वेग
 
डबल स्टॅक पद्धतीमुळे एका ट्रेनमधून अधिक कंटेनरची वाहतूक करणे शक्य होते. त्यामुळे रेल्वे मालवाहतुकीची क्षमता वाढण्याबरोबरच बंदरात दाखल झालेल्या कंटेनरची जलद उचल आणि पुढील गंतव्यस्थळी वाहतूक करता येणार आहे. विशेषतः आयात कंटेनरचा बंदरातील थांबण्याचा कालावधी कमी करण्यासाठी या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे. लाँग-हॉल रेल्वेमुळे मोठ्या प्रमाणातील माल एकाच वेळी लांब अंतरावर पोहोचवता येणार असल्याने वाहतूक व्यवस्थेतील अडथळे कमी होतील. परिणामी संपूर्ण पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. (Jawaharlal Nehru Port Authority)
 
डीएफसीशी जोडणीला मिळणार बळ
 
जेएनपीएच्या रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार आणि समर्पित मालवाहतूक मार्गिकेशी वाढती जोडणी यामुळे देशातील महत्त्वाच्या अंतर्गत बाजारपेठांपर्यंत माल पोहोचवण्याचा वेग वाढणार आहे. बंदरातून अंतर्गत गंतव्यस्थळी होणारी जलद रेल्वे वाहतूक आयातदार, निर्यातदार आणि मालवाहतूक क्षेत्रातील इतर घटकांना अधिक वेगवान व वेळेची निश्चितता असलेली सेवा उपलब्ध करून देईल. यामुळे कंटेनर उपलब्ध होण्यास लागणारा वेळ कमी होईल. तसेच मालसाठवणुकीवरील खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि उद्योगांना मालसाठ्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे. (Jawaharlal Nehru Port Authority)
 
आयात-निर्यात व्यापाराला नवी गती
 
लाँग-हॉल डबल स्टॅक डीएफसी रेकमुळे बंदरातील मालाची जलद उचल आणि देशाच्या अंतर्गत भागात कार्यक्षम वाहतूक करण्याची क्षमता वाढणार आहे. परिणामी मालवाहतुकीचा वेळ कमी होऊन भारतीय आयात-निर्यात व्यापाराची स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होईल. जेएनपीएकडून पायाभूत सुविधा आणि संपर्कव्यवस्था मजबूत करण्यासाठी सातत्याने गुंतवणूक केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून सुरू झालेली पहिली लाँग-हॉल डबल स्टॅक डीएफसी कंटेनर ट्रेन भारताच्या वेगवान, कार्यक्षम, विश्वासार्ह आणि स्पर्धात्मक बहुपर्यायी मालवाहतूक व्यवस्थेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. (Jawaharlal Nehru Port Authority)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर