धर्मांतराचे आमिष दाखवणाऱ्यांना 'जेन झी' तरुणांनी पकडले

    22-Aug-2026   
Kandivali Alleged Religious Conversion Case ( चित्र:एआय) 
मुंबई: (Gen Z) धर्मांतरासाठी पाच ते सहा लाख रुपयांचे आमिष दाखवून हिंदू देवदेवतांची निंदा करणाऱ्या तिघांना कांदिवलीतील स्थानिक 'जेन झी' तरुणांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. "धर्मांतरण विरोधी कायदा आहे, हे माहिती आहे ना ?" असा थेट जाब विचारत या सुशिक्षित तरुण पिढीने वस्तीत सुरू असलेल्या या बेकायदेशीर कृत्याची पोलखोल केली. ही घटना बुधवारी,१९ ऑगस्ट रोजी कांदिवली येथील संजय नगर भागात घडली.
 
आयसी कॉलनी परिसरात राहणारे मूळचे बौद्ध धर्मीय परंतु नंतर ख्रिश्चन झालेले एक महिला आणि पुरुष, दक्षिण कोरियातून भारतात शिक्षणासाठी आलेल्या एका परदेशी तरुणासह संजय नगर वस्तीत आले होते. दुपारी वस्तीतील नागरिक घरात असताना या तिघांनी लोकांना गाठून धार्मिक प्रचार सुरू केला. "आमच्या सेमिनारला या, तुमचे सर्व आजार बरे होतील. ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर पाच ते सहा लाख रुपये मिळतील," असे आमिष ते लोकांना दाखवू लागले. (Gen Z)
 
श्रद्धास्थानांची निंदा आणि तरुणांचा आक्षेप
 
वस्तीतील महिलांनी सध्या श्रावण महिना सुरू असल्याने आम्ही शिवपूजा करतो असे सांगताच, त्या प्रचारकांनी 'शिवलिंग हा केवळ एक दगड आहे, तो देव कसा असू शकतो?' असे म्हणत हिंदूंच्या श्रद्धास्थानांची निंदा केली. हा सर्व प्रकार तिथून जवळच असलेल्या जितेंद्र चौधरी या तरुणाने आणि त्याच्या मित्रांनी ऐकला. या 'जेन झी' जागरूक तरुणांनी तातडीने या संवादाचे आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतले. (Gen Z)
 
तरुणांनी पोलिसांच्या स्वाधीन केले
 
पुराव्यासह तरुणांनी त्या तिघांना थेट जाब विचारला. "तुम्ही हिंदू देवांची निंदा करू शकत नाही आणि धर्मांतरासाठी पैशांचे आमिष दाखवणे हा गुन्हा आहे," असे सुनावताच आमिष दाखवणाऱ्यांची बोलती बंद झाली. यानंतर स्थानिक तरुणांनी तातडीने बजरंग द आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधला. कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आणि पोलिसांना पाचारण केले. कांदिवली पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले असून, या बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रयत्नामागे मोठी साखळी कार्यरत आहे का, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. (Gen Z)
 
झेन जींचे अभिनंदन मात्र दोषींवर कारवाई व्हावी (Gen Z)
 
या अत्यंत निंदनीय घटनेच्या गुन्हेगारांवर सध्या पोलीस कारवाई करत आहेत. स्थानिक लोक आणि विशेषता परिसरातील जेन झी तरूणाईने धर्मांतरणाचे कारस्थान उलथून लावले याबाबत त्यांचे धन्यवाद. विश्वहिंदू परिषदेने मागणी केली आहे की स्थानिक दोघांच्यासोबतच त्या साऊथ कोरीयामधून शिक्षणाच्या नावावर भारतात आलेल्या परदेशी युवकावर कारवाई व्हावी. कारण या दोघा स्थानिकांनी आणि त्या परदेशी युवकाने बेधडकपणे गोरगरीबांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या अज्ञानाचा पायदा घेत धर्मांतरणाचे षडयंत्र रचले आहे. -सचिन म्हमाणे, विभाग संयोजक,विश्व हिंदू परिषद, बजरंग दल
 
 







योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर