स्मशानभूमींच्या धुरातील प्रदूषणावर ९५ टक्के नियंत्रण; पालिका बसवणार अत्याधुनिक यंत्रणा

    22-Aug-2026
Mumbai Crematorium Pollution
                                                             (Image Credit : AI Chatgpt)
 
मुंबई: (Mumbai Crematorium Pollution) शहरातील स्मशानभूमींमधील विद्युत आणि गॅस दाहिन्यांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. स्मशानभूमींमधील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ ही अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात शहरातील आठ स्मशानभूमींमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या कामासाठी सुमारे ३३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पुढील काळात टप्प्याटप्प्याने मुंबईतील सर्व ४८ स्मशानभूमींमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.(Mumbai Crematorium Pollution)
 
​स्मशानभूमीतील दाहिन्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरातील हवेची गुणवत्ता खालावत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी महिन्यात शिवाजी पार्क स्मशानभूमीत या यंत्रणेची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीदरम्यान बाहेर पडणाऱ्या धुरातील प्रदूषणात तब्बल ९५ टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे ‘भारतीय तंत्रज्ञान संस्थे’च्या तांत्रिक अहवालातून समोर आले. या यशस्वी चाचणीनंतर पालिकेने संपूर्ण शहरात ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.(Mumbai Crematorium Pollution)
 
​पर्यावरण आणि हवामान बदल विभागामार्फत या प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येत असून, लवकरच तो मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर सादर केला जाणार आहे. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर निविदा प्रक्रिया राबवून पुढील सात ते आठ महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.(Mumbai Crematorium Pollution)
 
​जलअभियांत्रिकी विभागातही यंत्रणा लागू करणार -
 
पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रांवर पाणी खेचण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उच्च क्षमतेच्या जनित्रांमधून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडतो. या धुरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पाच प्रमुख केंद्रांवर २२ कोटी रुपये खर्चून ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ बसवले जातील. या यंत्रणेच्या साहाय्याने धुरातील अतिसूक्ष्म धूलिकण आणि काजळी वेगळी केली जात असल्याने वातावरणात स्वच्छ हवा सोडणे शक्य होणार आहे.(Mumbai Crematorium Pollution)
 
इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणेचे कार्य:
 
दाहिनीतून निघणारा धूर या यंत्रणेतून जाताना उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहाद्वारे त्यातील अतिसूक्ष्म धूलिकण आणि काजळीवर विद्युत भार निर्माण केला जातो, ज्यामुळे हे सर्व प्रदूषणकारी कण यंत्रणेतील विरुद्ध भार असलेल्या पट्ट्यांकडे खेचले जाऊन तिथेच अडकतात आणि चिमणीवाटे वातावरणात केवळ स्वच्छ व प्रदूषणमुक्त हवा बाहेर सोडली जाते.(Mumbai Crematorium Pollution)
 
 
 




संबंधित मजकूर