मुंबई : (Potholes In Chakan Industrial Area) चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांसदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर आठवड्याभराच्या आतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र टिम चाकणला पाठवली आहे. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा सहाय्याने खड्डे बुजविण्यास सुरुवात देखील केली आहे. काल मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या टीमसोबत व्हिडिओ कॉल करत खड्डे बुजवण्याच्या कामाचा आढावा घेऊन उद्योजकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी चाकण मधील रस्त्यावर पडलेले खड्डे प्री- कास्ट आणि पॉलिमर टेक्नो पॅच पद्धतीने दुरुस्त करायला सुरुवात झाली असून, त्यातून उद्योजक आणि स्थानिक नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रश्नाबाबत नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती.
या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह उद्योजकांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती. यावेळी स्थानिक उद्योजकांना भेडसावणारे प्रश्न हे कालबद्ध रित्या सोडविण्याचे निश्चित करण्यात आले होते. यात प्रामुख्याने या औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यावेळी शिंदे यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने खड्डे बुजवावेत असे सुचवले होते.मात्र एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली आहे.
चाकण परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने भरता यावेत आणि लोकांना तातडीने दिलासा देण्यासाठी त्यांनी सी एन सी कंपनीचे सत्या लांडगे यांच्यासोबत आपली एक टीम चाकण येथे पाठवली होती. या टीमने रस्त्यांची पाहणी केल्यानंतर त्यांना रस्त्यावर तसेच रस्त्याच्या कडेकडील भाग ( साइड शोल्डर ) येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे निदर्शनास आले..तसेच तिथे पाण्याचा निचरा होण्याची काही व्यवस्था नसल्याने हे खड्डे मोठे होऊन वाहनांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे त्यांना आढळले.
याठिकाणी रस्ताचा भाग समतल करून त्यावर तत्काळ एम -६० हार्डनर वापरून तयार केलेले प्री- कास्ट पॅचेस बसवण्याचा पर्याय त्यांना योग्य वाटला. त्यानुसार तत्काळ तिथे हे पॅचेस बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. हे पॅच चाकण येथे पाठवून प्रत्यक्ष खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यातील प्रत्येक प्री- कास्ट पॅच हा चार टनाचा असून या मार्गावरून ५० - ५० टन वजनाचे ट्रक ट्रेलर वाहून नेले जात असले तरी त्यांचे वजन झेलण्याची क्षमता या प्री- कास्ट पॅच मध्ये आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हे पॅचेस बसवून तत्काळ रस्ता करून त्यावरून वाहतूक सोडता येणे शक्य होणार आहे. त्यासोबतच तसेच एम - 60 विथ हार्डनरचा वापर करून रस्त्यावरील अन्य खड्डे बुजवल्यास मुख्य महामार्गावरील वाहतूक देखील सुरळीत करता येणे शक्य होणार आहे.
या प्री-कास्ट पॅचेस मुळे रस्त्यांची डागडुजी कमी वेळेत करता येईलच, पण त्यामुळे स्थानिक नागरिक आणि उद्योजकांना तातडीने दिलासा मिळवून देणे शक्य होईल. त्यामुळे नुसती बैठक घेऊन चर्चा न करता सुचवलेल्या उपायांची तातडीने अंमलबजावणी केल्याबद्दल चाकण औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर चाकण वासियांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्यास मदत आहे.