सारेगमपच्या मंचावर अवधूत गुप्तेंचं पुनरागमन! Avadhoot Gupte

    22-Aug-2026
 
avadhoot
 
 
 
 
मुंबई - (Avadhoot Gupte)मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि परीक्षक अवधूत गुप्ते पुन्हा एकदा ‘सारेगमप’ च्या मंचावर परीक्षकाच्या भूमिकेत परतले आहेत. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या ‘सारेगमप’च्या या नव्या पर्वात नव्या पिढीचे नवे आवाज, त्यांची संगीताकडे पाहण्याची बदललेली दृष्टी आणि सोशल मीडियामुळे बदललेलं संगीतविश्व पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने त्यांनी नव्या पिढीचं संगीत, सोशल मीडियाचा प्रभाव, स्पर्धकांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या संगीतप्रवासाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.
 
"‘सारेगमप’मध्ये खूप काही नवीन आणि खास पाहायला मिळणार आहे. नवीन टॅलेंट, नवीन चेहरे, नवीन आवाज आणि नावीन्य असलेली नवी पिढीच पाहायला मिळेल, असं म्हणायला हरकत नाही. आताची पिढी खूप स्मार्ट आहे. त्यांचं जीवनमान त्यांच्या पद्धतीने बदललं आहे. ही पिढी खूप फास्ट आहे. नव्या पिढीचं संगीत आत्मसात करण्याचं माध्यम, संगीत उपभोगण्याचं माध्यमही बदललं आहे. आता सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमधून नव्या पिढीला गाणी मिळत असतात आणि ती त्यांना आकर्षित करत असतात. अशा पिढीचं गाणं आपण यावेळेस ‘सारेगमप’ मध्ये ऐकणार आहोत. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हेच या सीझनचं सगळ्यात मोठं नावीन्य असेल,असं यावेळी गुप्ते म्हणाले. (Avadhoot Gupte)
 
परीक्षक म्हणून माझा निकष कधीच बदलणार नाही. पहिलं म्हणजे सूर आणि ताल, दुसरं म्हणजे काव्याची जाण, शब्दांचा अर्थ समजून घेतला आहे की नाही याची परीक्षा आणि त्यामुळे येणारी भावुकता. या चार गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. गाणं गातानाच गायकाचं प्रेझेंटेशनही खूप महत्त्वाचं असतं. कारण गाणं प्रस्तुत करताना ते समोरच्याला पण समजावून सांगता आलं पाहिजे. त्याचे भाव हे समोरच्यालाही फील झाले पाहिजेत आणि हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आम्ही परीक्षक म्हणून जुन्या आणि नव्याचा एक मिलाप करण्याचा प्रयत्न करत आहोत. स्पर्धकांचं खरं संगीत, खरं टॅलेंट हे प्रेक्षकांसमोर आणणं, जे खरोखर टॅलेंटेड आहेत त्यांना प्रोत्साहन देणं हे जरी परीक्षकांचं काम असलं, तरी नव्या माध्यमांसमोर जायला आजच्या पिढीला तयार करणं ही देखील एका परीक्षकाची जबाबदारी आहे, अशा मताचा मी आहे. त्यामुळे माझा फोकस या सीझनला या गोष्टीवरसुद्धा असेल की सोशल मीडिया ला किंवा इतर नवीन माध्यमांना स्पर्धकांनी त्यांचं संगीत कशा प्रकारे मांडायला हवं. त्यासाठी काही मार्गदर्शन करण्याचा आम्ही परीक्षक म्हणून जरूर प्रयत्न करू, असं हि अवधूत गुप्ते यावेळी म्हणाले. (Avadhoot Gupte)
 




संबंधित मजकूर