मुंबई : (Maharashtra Agriculture) हवामान बदल, पाणीटंचाई, घटती जमिनीची सुपीकता, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि उत्पादन खर्च यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ आधारित शेती प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, संत्री, हळद, कांदा आणि मका या पिकांतील १० हजार शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.(Maharashtra Agriculture)
सह्याद्री अतिथिगृह येथे या प्रकल्पाच्या सादरीकरणादरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित होते.(Maharashtra Agriculture)
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन, IoT सेन्सर्स, डेटा अॅनालिटिक्स आणि मशीन लर्निंगच्या माध्यमातून पिकांची वाढ, जमिनीतील ओलावा, पाण्याची गरज, हवामान, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि संभाव्य उत्पादनाचा अभ्यास करण्यात येईल. या माहितीचे एकत्रित विश्लेषण करून शेतनिहाय आणि पिकनिहाय सल्ला शेतकऱ्यांना देण्याची सक्षम डिजिटल प्रणाली विकसित करण्यात येणार आहे.(Maharashtra Agriculture)
AI आधारित सिंचन व्यवस्थापनामुळे पाण्याचा वापर कमी करण्याबरोबरच उत्पादन खर्च घटवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात निवडक पिके आणि शेतकऱ्यांवर प्रकल्पाची चाचणी घेऊन त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर राज्यभर विस्तार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.(Maharashtra Agriculture)
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी AI आधारित शेतीमुळे राज्याच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यांच्या माहितीनुसार, AI आधारित ऊस शेतीच्या प्रायोगिक वापरात २०० नोंदींपैकी १६४ वैध नोंदींमध्ये सरासरी उत्पादन ६५.४५ टनांवरून ७३.१२ टन प्रति एकर झाले. तसेच AI आधारित सिंचन व्यवस्थापनामुळे सरासरी ४२ टक्के पाणी बचत झाल्याचे नमूद करण्यात आले.(Maharashtra Agriculture)
ड्रोनद्वारे घेतलेल्या पिकांच्या प्रतिमांचे AI आणि मशीन लर्निंगच्या मदतीने विश्लेषण करून कीड-रोगांचा प्रारंभिक टप्प्यात शोध घेता येणार आहे. त्यानुसार सिंचन आणि फवारणीचे नियोजन थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्याची संकल्पना आहे. AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि जलव्यवस्थापन सुधारण्याचा राज्याचा प्रयत्न आहे.(Maharashtra Agriculture)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.