राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर! महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश; देशभरातील ४८ शिक्षकांची निवड

    22-Aug-2026   
 
National Teachers Award 2026
 
नवी दिल्ली (National Teachers Award 2026) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील ४८ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. येत्या दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
 
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत हा पुरस्कार दिला जातो. नावीन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. (National Teachers Award 2026)
 
महाराष्ट्रातील चार मानकरी
 
या पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात कार्यरत असलेल्या डॉ. कविता गिट्टे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी दिव्यांग आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसह वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. नाशिक महानगरपालिका शाळा क्र. १८ चा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विविध अभिनव उपक्रम राबवणाऱ्या कुंदा बच्छाव यांचाही सन्मान होणार आहे. यासोबतच पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे कार्यरत असलेल्या वैभव कुलकर्णी हेदेखील या पुरस्काराचे लाभार्थी ठरले असून त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला. तसेच सैनिक स्कूल, सातारा येथे कार्यरत असलेल्या शिवप्रसाद टिंगरे यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना रुजविण्यासाठी विशेष योगदान दिले. (National Teachers Award 2026)
 
विज्ञान भवनात होणार गौरव
 
शिक्षक दिनानिमित्त दि. ५ सप्टेंबर रोजी विज्ञान भवनात होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती देणारे लघुपटही यावेळी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या सोहळ्याचे दूरदर्शन, शिक्षण मंत्रालयाची ‘स्वयं प्रभा’वाहिनी तसेच अधिकृत वेबकास्ट आणि सोशल मीडिया माध्यमांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. (National Teachers Award 2026)





अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर