रेल्वेलगतच्या बांदल चाळीचे आधी पुनर्वसन, नंतरच निष्कासन!

६० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ५० कुटुंबांना मोठा दिलासा..

    21-Aug-2026
Sanjay Kelkar 21 
 
ठाणे : (Bandal Chawl Rehabilitation in Thane) नियोजित नवीन व विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकाच्या उभारणीत बाधित होणाऱ्या बांदल चाळीतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. चाळीतील कुटुंबांचे आधी योग्य पुनर्वसन करण्यात येईल आणि त्यानंतरच निष्कासनाची प्रक्रिया केली जाईल असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. मीना यांनी मान्य केले आहे. आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याने ५० कुटुंबांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
 
ठाणे रेल्वे स्थानकालगत गेल्या सुमारे ६० वर्षांपासून बांदल चाळ अस्तित्वात असून येथे सुमारे ५० कुटुंबे वास्तव्यास आहेत. नवीन विस्तारित रेल्वे स्थानकाच्या कामासाठी ही चाळ बाधित होणार असल्याने रेल्वे प्रशासनाकडून रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. अचानक निष्कासनाच्या भीतीने रहिवासी हवालदिल झाले होते. (Bandal Chawl Rehabilitation in Thane)
  
या पार्श्वभूमीवर बांदल चाळीतील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. त्यानंतर केळकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. (Bandal Chawl Rehabilitation in Thane)
 
गुरुवारी आमदार केळकर यांनी रहिवाशांसह विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. मीना आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन रहिवाशांची बाजू ठामपणे मांडली. “रहिवाशांना बेघर करून विकासकामे करता येणार नाहीत. आधी प्रत्येक बाधित कुटुंबाचे योग्य पुनर्वसन करा आणि त्यानंतरच चाळीचे निष्कासन करा,” अशी स्पष्ट मागणी केळकरांनी केली. (Bandal Chawl Rehabilitation in Thane)
 
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. मीना यांनी आधी पुनर्वसन आणि त्यानंतरच निष्कासन करण्यास मान्यता दिली. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चिंतेत असलेल्या बांदल चाळीतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले आहेत. (Bandal Chawl Rehabilitation in Thane)
 
 




संबंधित मजकूर