'मी कात टाकली' मालिकेत नागिणीच्या रुपात दिसणार अभिनेत्री सानिका मोजार!

    21-Aug-2026
 
 
sanika
 
 
 
 
मुंबई - (star pravah )नागपंचमीचं औचित्य साधून स्टार प्रवाह वाहिनीने बहुप्रतिक्षित ‘मी कात टाकली’ मालिकेचा टिझर लॉन्च केला. पहिल्या टिझरनंतर मालिकेत नागिणीच्या रुपात कोणती अभिनेत्री दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. अनेक अभिनेत्रींच्या नावांची चर्चाही रंगली. अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळणार आहे. मी कात टाकली मालिकेतून अभिनेत्री सानिका मोजार नागिणीच्या रुपात भेटीला येणार आहे. गूढ आणि रहस्यमय विषयांना प्रेक्षकांची नेहमीच पसंती मिळते. याच आवडीचा विचार करून स्टार प्रवाह पहिल्यांदाच नागतत्त्वावर आधारित हा अनोखा विषय घेऊन येत आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा विषय हाताळला जाणार असून रहस्य, थरार आणि भावनिक नात्यांची अनोखी गुंफण ‘मी कात टाकली’ मालिकेतून पाहायला मिळणार आहे. संतोष अयाचित यांच्या येळकोटी निर्मिती संस्थेने मालिकेची निर्मिती केली आहे.
 
मी कात टाकली या मालिकेत सानिका साकारत असलेली यामिनी अतिशय अभ्यासू, हुशार, उत्साही, जिद्दी आणि स्वतंत्र विचारांची आहे. यामिनीचं जग तिच्या आईभोवती विणलेलं आहे. मात्र तिच्या या साध्या आयुष्यामागे एक गूढ सत्य दडलेलं आहे. यामिनीला तिच्यामध्ये असलेल्या नागतत्त्वाची जाणीव नाही. मात्र जेव्हा तिला या सत्याची जाणीव होईल तेव्हा तिच्या आयुष्यात नेमके कोणते बदल घडतील? तिच्यासमोर कोणती गूढ रहस्यं उलगडतील? आणि या सगळ्याचा तिच्या जवळच्या माणसांवर काय परिणाम होईल? या प्रश्नांची उत्तरं उलगडणारी रंजक कथा म्हणजे ‘मी कात टाकली’ मालिका.(star pravah)
 
या भूमिकेविषयी सांगताना सानिका मोजार म्हणाली, ‘मराठी मालिका विश्वात पहिल्यांदाच हा गूढ विषय हाताळला जातोय. जेव्हा या विषयावरील मालिका मराठीत येईल तेव्हा नागिणीची भूमिका मला साकारायला मिळावी अशी खूप इच्छा होती. मी कात टाकलीच्या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होतेय. यामिनी ही फक्त नागिणीची भूमिका नाही, तर एका मुलीचा स्वत्वाचा शोध घेणारा प्रवास आहे. तिच्यातील निरागसता आणि तिच्यात दडलेलं नागतत्त्व हे दोन्ही पैलू साकारताना खूप काही शिकायला मिळत आहे. ही भूमिका साकारण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. प्रेक्षक यामिनीला आणि तिच्या या अनोख्या प्रवासाला नक्कीच भरभरून प्रेम देतील अशी मला आशा आहे.(star pravah)




संबंधित मजकूर