लिपिक म्हणून नोकरी, विविध बँका, शाखा आणि जबाबदार्यांचा अनुभव घेत, आज ‘दि कुर्ला नागरिक सहकारी बँके’च्या ‘कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी’ पदापर्यंत पोहोचलेल्या संदीप चिंतामणी यांच्याविषयी...
दि कुर्ला नागरिक सहकारी बँके’ची नुकतीच ७६वी सर्वसाधारण सभा पार पडली. बँकेचा सभासद या नात्याने या सभेला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. सभासदांनी विचारलेले प्रश्न आणि मांडलेल्या सूचना सकारात्मक पद्धतीने स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्याची संदीप मधुकर चिंतामणी यांची भूमिका लक्षात आली. सभासदांच्या प्रश्नांकडे औपचारिकता म्हणून न पाहता, त्यातून बँकेच्या कामकाजात सुधारणा करण्याची त्यांची पद्धत विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल. या अनुभवातून त्यांच्या प्रदीर्घ बँकिंग प्रवासाकडे पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली.
दि. ५ सप्टेंबर १९६५ रोजी जळगाव येथे जन्मलेल्या चिंतामणी यांनी बालमोहन विद्यामंदिर, भगीरथ इंग्लिश स्कूल आणि मुळजी जेठा महाविद्यालयातून ‘एमकॉम’पर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण सुरू असतानाच दि. १५ डिसेंबर १९८७ रोजी ‘जळगाव जनता सहकारी बँके’त ‘लिपिक’ म्हणून ते रुजू झाले. विविध विभागांत काम करण्याची संधी मिळाल्याने सुरुवातीपासूनच बँकेच्या कामकाजाचे वेगवेगळे पैलू समजून घेता आले.
१९८९ मध्ये त्यांनी ‘जीडीसीए’ परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावर्षी बँकेच्या इतिहासात ही परीक्षा उत्तीर्ण करणार्या कर्मचार्यांमध्ये संदीप यांचाही समावेश होता. या विशेष कामगिरीची नोंद बँकेच्या वार्षिक अहवालात करण्यात आली होती. १९९२ मध्ये ‘ज्युनिअर ऑफिसर’ पदासाठी झालेल्या परीक्षेत ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. रोख विभागातील अनुभव अधिक असल्याने त्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले. मात्र, त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये ‘आस्थापना अधिकारी’ म्हणून बढती मिळाली. १९९३ मध्ये ‘धुळे पीपल्स बँक’ ‘जळगाव जनता बँके’त विलीन झाली. या प्रक्रियेतही त्यांनी काम केले. पुढे पदोन्नती परीक्षेत यश मिळवत प्रशासन अधिकारी आणि त्यानंतर १९९६-९७ मध्ये साहाय्यक सरव्यवस्थापक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
यानंतर शाखा व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. कर्जकेंद्रित शाखेत शाखाधिकारी असताना बँकेच्या इतिहासातील ६५ लाख रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर झाले. त्या शाखेत कर्ज आणि नफ्याच्या बाबतीत सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक कायम राहिला. नंदूरबार येथील तोट्यातील शाखेची जबाबदारी घेतल्यानंतर २७ लाख रुपयांचा तोटा नफ्यात आणण्यात आला. २००२ ते २००७ याकाळात नाशिक शाखेत काम करताना तोट्यातील शाखा नफ्यात आणली. त्यानंतर धुळे, नवी पेठ, जळगाव, भुसावळ आणि फैजपूर येथेही त्यांनी काम केले.
बँकेतील नोकरीसोबतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित काम सुरू होते. नाशिकमध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्याने देण्याची संधीही त्यांना मिळाली. बँकेच्या ‘एलआयसी’ उपक्रमात सर्व कर्मचार्यांच्या सहकार्याने पॉलिसीविक्रीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. त्याची दखल घेऊन ‘एलआयसी’तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना २५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि घड्याळ देण्यात आले.
कुटुंबातील जबाबदार्यांचा विचार करून त्यांनी ‘संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँके’त ‘कर्ज अधिकारी’ म्हणून काम केले. तेथे ‘कर्मचारी प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्याची कल्पना त्यांनी मांडली. चेअरमन राजेश मालपाणी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले आणि कर्मचारी प्रशिक्षण सुरू झाले. ही व्यवस्था आजही सुरू असल्याचे चिंतामणी सांगतात.
यानंतर ‘आयएमसी बँके’त सरव्यवस्थापक, ‘समर्थ बँके’त लेखापरीक्षण विभाग, ‘वणी मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँके’त उपमहाव्यवस्थापक आणि ‘पिंपळगाव मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँके’त लेखापरीक्षण विभागात त्यांनी काम केले. ‘सोलापूर जनता सहकारी बँके’त भारतीय रिझर्व्ह बँकेने दि. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी दिलेल्या निर्देशांनुसार, नवीन ‘आरबीआयए’ म्हणजेच, जोखीमआधारित अंतर्गत लेखापरीक्षण सुरू करण्याबाबत दिशा-निर्देश देण्यात आले. त्यानुसार, चिंतामणी यांनी जोखीमआधारित अंतर्गत लेखापरीक्षणाची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे प्रशासन, कर्ज, लेखापरीक्षण, प्रशिक्षण आणि शाखा व्यवस्थापनाचा व्यापक अनुभव त्यांच्या कारकिर्दीत जमा झाला.
दि. १ एप्रिल २०२६ पासून ते ‘दि. कुर्ला नागरिक सहकारी बँके’त उपमहाव्यवस्थापक म्हणून रुजू झाले. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी राजीनामा दिल्यानंतर दि. २२ मे २०२६ पासून ते ‘कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी’ म्हणून काम पाहत आहेत. बँकेचे कामकाज पुढे नेण्यासोबत कर्मचारीवर्गाला प्रशिक्षण देण्यावर त्यांचा भर आहे.
७६व्या सर्वसाधारण सभेतील त्यांची भूमिका त्यांच्या सध्याच्या कार्यपद्धतीचे चित्र स्पष्ट करते. सभासदांनी मांडलेल्या प्रश्नांना आणि सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांची अंमलबजावणी करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी ठेवला. विविध बँका आणि विभागांमध्ये मिळवलेला अनुभव आजच्या जबाबदारीत उपयोगी पडताना दिसतो.
आई आणि गुरुजन हे आपले प्रमुख प्रेरणास्थान असल्याचे चिंतामणी सांगतात. संघपरिवाराचाही त्यांच्या जडणघडणीत वाटा आहे. पत्नीने घरची जबाबदारी समर्थपणे सांभाळल्यामुळे आपल्या कामावर लक्ष देता आले, असे ते नमूद करतात.
‘लिपिक’ म्हणून सुरू झालेला प्रवास आज ‘कार्यकारी मुख्य कार्यकारी’ अधिकार्याच्या जबाबदारीपर्यंत पोहोचला आहे. विविध पदांवर मिळालेला अनुभव, कर्मचारी प्रशिक्षणाची भूमिका आणि सभासदांच्या सूचनांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन, यामुळे त्यांची सध्याची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते. बँकेची प्रगती, कर्मचारीवर्गाचे प्रशिक्षण आणि सभासदांच्या अपेक्षा यांचा समन्वय साधत पुढील कामकाज सुरू ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे संदीप मधुकर चिंतामणी यांच्या पुढील कार्यमय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!