राणी मुखर्जीचा 'ला ट्रोब' विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट देऊन सन्मान !

    21-Aug-2026
 
 
rani
 
 
मुंबई - (Rani Mukerji) बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री राणी मुखर्जीचा ऑस्ट्रेलियातील 'ला ट्रोब' विद्यापीठाने डॉक्टरेट ही मानद पदवी प्रदान केली. इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न 2026 अंतर्गत मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअर येथे आयोजित विशेष समारंभात हा सन्मान देण्यात आला. भारतीय सिनेमातील जवळपास तीन दशकांच्या उल्लेखनीय योगदानासोबतच महिला, मुले आणि वंचित समुदायांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
 
या सन्मानासह राणी मुखर्जी या शाहरुख खाननंतर ला ट्रोब विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान मिळवणाऱ्या दुसऱ्या भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व ठरल्या आहेत. विद्यापीठाने यापूर्वी 2019 मध्ये शाहरुख खान यांना त्यांच्या समाजसेवा आणि भारतीय सिनेमातील योगदानासाठी सन्मानित केले होते तसेच त्यांच्या नावाने PhD शिष्यवृत्तीची घोषणा केली होती.  (Rani Mukerji)
 
या सन्मानाबद्दल राणी मुखर्जी म्हणाली , “ला ट्रोब विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात भावूक आणि नम्र करणाऱ्या क्षणांपैकी एक आहे. लहानपणी इतर मुलांप्रमाणेच मलाही माझ्या कुटुंबाचा आणि देशाचा अभिमान वाटावा, असे काहीतरी करायचे होते. ते कसे साध्य करायचे हे माहीत नव्हते, पण एखाद्या गोष्टीत मनापासून चांगले होण्याचा प्रयत्न केला तर माझे आई-वडील आनंदी होतील, एवढे मात्र माहीत होते. आणि सिनेमा हे ते स्वप्न पूर्ण करण्याचे माध्यम बनले.”  (Rani Mukerji)
 
आपल्या कारकिर्दीतील चित्रपटांच्या निवडीबद्दल त्या म्हणाल्या, “माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच मी जोखीम घेणारी राहिले आहे. मी नेहमी अशाच चित्रपटांची निवड केली, ज्यांनी सर्वप्रथम माझ्या मनावर प्रभाव टाकला. सांगितली जाणे आवश्यक असलेली कथा, जी लोकांना प्रेरणा देईल आणि सक्षम करेल.”  (Rani Mukerji)
 
राणी पुढे म्हणाली , “प्रत्येक कलाकाराची जबाबदारी केवळ अभिनयापुरती मर्यादित नसते. नकळत आपण आपल्या संस्कृतीचे राजदूत बनतो. माझ्या चित्रपटांमुळे एखाद्या व्यक्तीलाही भारत आणि भारतातील महिलांना थोडे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता आले असेल… त्यांनी संवादाला प्रोत्साहन दिले असेल… त्यांनी सहानुभूती निर्माण केली असेल… तर मला वाटते की केवळ अभिनेत्री असण्यापेक्षा कितीतरी मोठी जबाबदारी मी पार पाडली आहे,” असेही त्यांनी नमूद केले.  (Rani Mukerji)
 
ब्लॅक ,हम तुम , युवा , बंटी और बबली , नो वन किल्ड जेसिका , हिचकी , मर्दानी फ्रँचायझी आणि मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे यांसारख्या चित्रपटांमधून राणी मुखर्जीने महिला हक्क, लैंगिक समानता, दिव्यांगांचा समावेश आणि सामाजिक बदल यांसारख्या विषयांना प्रभावीपणे अधोरेखित केले आहे.  (Rani Mukerji)
 




संबंधित मजकूर