कोरोनाकाळात पती गमावलेल्या ‘प्रीती’चा पुनर्विवाह; राजकारणापलीकडील सामाजिक बांधिलकीचा अनोखा विवाहसोहळा

मुख्यमंत्री फडणवीस झाले पालक

Fadnavis Kanyadaan
 
मुंबई: (Preeti Akde Remarriage)  कोरोनाकाळात पती गमावल्यानंतर संकटात सापडलेल्या प्रीती आकडे यांच्या आयुष्याला गुरुवारी नव्याने सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत नागपुरात प्रीती यांचा शिवम यांच्यासोबत पुनर्विवाह सोहळा पार पडला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारा हा विवाहसोहळा संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरला.
 
कोरोना महामारीच्या काळात अनेक कुटुंबांतील कर्त्या पुरुषांचे निधन झाले. त्यामुळे अनेक तरुण महिला आणि त्यांच्या मुलांसमोर उदरनिर्वाह, शिक्षण आणि भवितव्याचे मोठे संकट उभे राहिले. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मित्र, भाजपचे माजी आमदार संदीप जोशी यांनी अशा कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमांतर्गत सुमारे २९३ कुटुंबांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी १०० कुटुंबांचे पालकत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले. (Preeti Akde Remarriage)
 
या कुटुंबांना शिक्षण, आर्थिक मदत आणि इतर आवश्यक बाबींमध्ये सातत्याने सहकार्य करण्यात आले. याच उपक्रमातील प्रीती आकडे यांच्या पुनर्विवाहामुळे या सामाजिक कार्याला भावनिक आणि सकारात्मक सुरुवात झाली आहे. पतीच्या निधनानंतर प्रीती यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. मात्र, या कठीण काळात फडणवीस आणि संदीप जोशी यांनी दिलेल्या आधारामुळे त्यांना पुन्हा आयुष्य उभे करण्याचे बळ मिळाले. विवाहसोहळ्यात प्रीती भावुक झाल्या. “आज माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. माझे दोन बंधू माझ्या पाठीशी आहेत, याचा मला प्रचंड आनंद आहे,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त करत फडणवीस आणि संदीप जोशी यांचे आभार मानले. (Preeti Akde Remarriage)
 
‘२९३ बहिणींच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय’
 
यावेळी संदीप जोशी म्हणाले, “कोविड काळात १९ ते २५ या वयोगटातील सुमारे २९३ बहिणींच्या वाट्याला दुर्दैवाने दुःख आले. या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय आम्ही घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला साथ देत स्वतः १०० कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले. आज प्रीतीच्या विवाहसोहळ्याने या कार्याची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.” (Preeti Akde Remarriage)
 
प्रीतीच्या पुनर्विवाहामुळे त्यांच्या जीवनात स्थैर्याची नवी सुरुवात झाली असून, भविष्यात या कुटुंबांतील मुलींच्या विवाहापर्यंतही पालकत्वाची जबाबदारी पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यामुळे हा विवाह केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्याची नवी सुरुवात नसून, संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी समाज आणि नेतृत्व उभे राहू शकते, याचे उदाहरण ठरला आहे. विवाहसोहळ्यास आमदार संजय भेंडे, नागपूरच्या महापौर निता ठाकरे, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वाखरे, माजी आमदार संदीप जोशी, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. (Preeti Akde Remarriage)
 
“कोरोनाच्या काळात संकटात सापडलेल्या कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचा आम्ही संकल्प केला होता. आज प्रीतीचा विवाह होताना तिच्या आयुष्यात स्थैर्याची नवी सुरुवात होत आहे, याचे मनापासून समाधान आहे. पुढील काळात या कुटुंबांतील सर्व मुलींच्या विवाहापर्यंतची जबाबदारीही आम्ही पार पाडू.” - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर