परीक्षांमधील चुका टाळण्यासाठी एनटिएचा आतापर्यंतचा सर्वात मोठा दणका

पॅनेलमधून ६०० हून अधिक विषय तज्ज्ञांची हकालपट्टी

    21-Aug-2026   
NTA 
 
नवी दिल्ली : (NTA) देशातील सर्वोच्च आणि संवेदनशील परीक्षांचे आयोजन करणार्‍या ’नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने आपल्या संपूर्ण कार्यपद्धतीला आणि विश्वासार्हतेला सुधारण्यासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भविष्यातील परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिकांमधील तांत्रिक चुका, भाषांतराचा घोळ आणि संभाव्य पेपरफुटीचे धोके मुळापासून उपटून टाकण्यासाठी एनटीएने आपल्या पॅनेलमधून एकाच वेळी तब्बल ६०० हून अधिक विषय तज्ज्ञांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या सर्व तज्ज्ञांच्या जागी आता नवीन नामांकित प्राध्यापक आणि तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. 
 
केंद्रीय शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांनी एनटीएच्या परीक्षा प्रक्रियेचे व्यापक फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. नुकत्याच झालेल्या युजीसी-नेट परीक्षेतील इंग्रजी, कॉमर्स आणि सोशियोलॉजी या तीन महत्त्वाच्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये गंभीर तथ्यविषयक आणि चुकीच्या भाषांतराच्या चुका आढळल्या होत्या. यामुळे या परीक्षा रद्द करून त्या पुन्हा घेण्याची नामुष्की एनटीएवर ओढावली होती. विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि सरकारच्या प्रतिमेला लागलेला डाग पुसण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या कडक इशार्‍यानंतर एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी ही मोठी फेररचना जाहीर केली. एनटीएने अंतर्गत पातळीवर केलेली ही मोठी ’साफसफाई’ परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास शिक्षण मंत्रालयाने व्यक्त केला आहे. (NTA)
 
काय आहे नवीन ’फोर-टीअर’ तपासणी व्यवस्था ?
 
प्रश्नपत्रिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि चुकांवर रोख लावण्यासाठी आता ’फोर-टीअर’ (चार-स्तरीय) प्रश्नपत्रिका तपासणी व्यवस्था लागू केली जात आहे. या नवीन रचनेनुसार कोणतीही प्रश्नपत्रिका अंतिम होण्यापूर्वी ती खालील चार स्वतंत्र स्तरांवरून सक्तीने तपासली जाईल: (NTA)
 
१. तथ्य तपासणी : प्रश्नांमधील तांत्रिक, वैज्ञानिक व सांख्यिकीय अचूकता तपासणे.
 
२. भाषा आणि व्याकरण तपासणी : प्रश्नांची भाषा संदिग्ध न ठेवता स्पष्ट करणे.
 
३. अनुवाद तपासणी : इंग्रजीतून प्रादेशिक भाषांमध्ये (विशेषतः मराठी, हिंदी इ.) होणार्‍या भाषांतरातील चुका शंभर टक्के रोखणे.
 
४. फॉर्मेटिंग तपासणी : प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि अंतिम रचनेची पडताळणी करणे. (NTA)
 
१५० हून अधिक कर्मचारी कार्यमुक्त
 
एनटिएची सुरक्षा तैनातविषय तज्ज्ञांशिवाय, एनटीएने अंतर्गत प्रशासकीय स्तरावरही मोठे फेरबदल करताना ५० हून अधिक संशयास्पद कर्मचार्‍यांना पदावरून हटवले आहे. तसेच, अत्यंत संवेदनशील असलेले हे परीक्षा मंडळ आता ओखला परिसरातून मिंटो रोडवरील नवीन सुरक्षित वास्तूत हलवले जात असून, या नवीन कार्यालयाच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी आता ’केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे’ सोपवण्यात आली आहे. (NTA)
 
खाजगी सायबर तज्ज्ञांची मदत
 
प्रश्नपत्रिका तयार करताना मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी इंटरनेट आणि ब्लूटूथ संपर्क नसलेले संगणक वापरले जाणार आहेत. याशिवाय, सायबर सुरक्षा, सायकोमेट्रिक्स आणि प्रश्नपत्रिका डिझाइनिंगसाठी आयटी क्षेत्रातील नामांकित खाजगी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. (NTA)
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर