गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकला ब्रेक

गणेशोत्सवापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मेट्रो सेवा आणि रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश

    21-Aug-2026
Ganeshutsav 1 
 
मुंबई : (Mumbai Ganeshotsav) गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि उपनगरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने मुंबई मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ आणि रेल्वेवरील मेगाब्लॉक घेऊ नका, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. भाविकांचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि अडथळामुक्त व्हावा, यासाठी रात्री उशिरापर्यंत, तसेच आवश्यकतेनुसार मध्यरात्रीपर्यंत मेट्रो सेवा सुरू ठेवण्याच्या सूचना मेट्रो प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर नियमित मेगा ब्लॉक तसेच रात्रकालीन ब्लॉक घेऊ नये, असे निर्देश कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले.
 
गणेशोत्सवात मुंबईसह उपनगरांतील विविध गणेश मंडळांना भेट देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मेट्रो आणि लोकल रेल्वेचा वापर करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मेट्रोच्या दोन फेऱ्यांमधील अंतर अर्थात ‘हेडवे’ कमी करून अधिक फेऱ्या चालविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळेत मेट्रोची शेवटची फेरी उशिरापर्यंत सुरू ठेवून भाविकांसाठी विशेष फेऱ्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही सांगण्यात आले आहे. (Mumbai Ganeshotsav)
 
गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांवर प्रवाशांचा मोठा ताण येण्याची शक्यता आहे. दिवस-रात्र रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी होणार असल्याने गणेशोत्सवाच्या प्रारंभापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर नियमित मेगा ब्लॉक किंवा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येऊ नये, असे निर्देश मंत्री लोढा यांनी दिले आहेत. (Mumbai Ganeshotsav)
 
गर्दीच्या काळात आणि रात्री गणेश दर्शनावरून परतणाऱ्या भाविकांसाठी अतिरिक्त उपनगरीय विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात याव्यात. प्रमुख रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त रेल्वे सुरक्षा बल (RPF) तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तैनात करून प्रवाशांच्या सुरक्षेसह गर्दी व्यवस्थापनाची प्रभावी व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Mumbai Ganeshotsav)
 
भाविकांना तिकीट काढताना अडचणी येऊ नयेत, यासाठी मेट्रोवरील सर्व तिकीट काऊंटर, ऑटोमेटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (ATVM), डिजिटल तसेच क्यूआर तिकीट प्रणाली मेट्रोची शेवटची फेरी होईपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकांवरील लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि प्राथमिक उपचार केंद्रे सेवा सुरू असेपर्यंत उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Mumbai Ganeshotsav)
 
प्रमुख आणि गर्दीच्या मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा रक्षक तसेच क्राऊड मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये होणारे बदल, वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवश्यक माहिती स्थानकांवरील डिस्प्ले बोर्ड, उद्घोषणा यंत्रणा तसेच अधिकृत सोशल मीडिया माध्यमांद्वारे वेळोवेळी प्रसारित करण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. (Mumbai Ganeshotsav)
 
“गणेशोत्सव हा मुंबईकरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा मोठा सण आहे. या काळात लाखो भाविक गणेश दर्शनासाठी रेल्वे, मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि त्यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत व वेळेत व्हावा, यासाठी वाहतूक यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. गर्दीमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी मेट्रो आणि रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त सेवा, सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी,” असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. (Mumbai Ganeshotsav)
 
 




संबंधित मजकूर