सरसंघचालकांच्या कॅनडा दौऱ्याला १०० हून अधिक कॅनेडियन संघटनांचा पाठिंबा

प्रवेशाबाबतचा निर्णय राजकीय दबावाऐवजी पुरावे आणि कायदेशीर प्रक्रियेवर घ्यावा, पत्राद्वारे मार्क कार्नी सरकारकडे मागणी

    21-Aug-2026   
Mohan Bhagwat Canada Visit Support
 
मुंबई : (Mohan Bhagwat Canada Visit Support) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रस्तावित कॅनडा दौऱ्याला १०० हून अधिक कॅनेडियन संघटना आणि नागरी स्वातंत्र्य गटांनी पाठिंबा दर्शविला आहे. या संघटनांनी पंतप्रधान मार्क कार्नी आणि केंद्र सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना पत्र लिहून, डॉ. भागवत यांच्या प्रवेशाबाबतचा कोणताही निर्णय पुरावे आणि कायदेशीर प्रक्रियेच्या आधारे घ्यावा, राजकीय दबावाखाली नाही, अशी मागणी केली आहे.
 
पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या संघटनांनी म्हटले आहे की, सरसंघचालकांचा प्रस्तावित दौरा कॅनडातील हिंदू समाजासाठी "विशेष महत्त्वाचा" आहे. या पत्रानुसार कॅनडात १० लाखांहून अधिक हिंदू वंशाचे नागरिक वास्तव्यास आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्णन त्यांनी समाजसेवा, सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्य आणि सार्वजनिक चर्चेसाठी ओळखली जाणारी भारतातील एक महत्त्वाची संस्था असे केले आहे. आम्ही १०१ हून अधिक कॅनेडियन संघटना आणि नागरी स्वातंत्र्य गटांचे प्रतिनिधी म्हणून सरसंघचालकांच्या कॅनडा दौऱ्याला पाठिंबा व्यक्त करीत आहोत. हा दौरा कॅनडातील हिंदू समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.(Mohan Bhagwat Canada Visit Support)
 
पत्रात पुढे म्हटले आहे की, एनडीपी खासदार जेनी क्वान आणि हेदर मॅकफर्सन, तसेच काही संघटनांनी कॅनडा सरकारला डॉ. भागवत यांना देशात प्रवेश नाकारण्याची आणि त्यांना 'अप्रवेशयोग्य' घोषित करण्याची मागणी केली आहे. या मागणीबद्दल आम्ही चिंतित आहोत, असे संघटनांनी स्पष्ट केले. पत्रात कॅनडाच्या बहुसांस्कृतिक धोरणाचा उल्लेख करताना म्हटले आहे, "कॅनडाची बहुसांस्कृतिक व्यवस्था विविध श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरांच्या लोकांना सार्वजनिक जीवनात समान सहभागाची संधी देते. हिंदूंना इतर सर्व धार्मिक किंवा अधार्मिक पार्श्वभूमीच्या कॅनेडियन नागरिकांप्रमाणेच सन्मान, सुरक्षा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, शांततापूर्ण संघटन स्वातंत्र्य आणि कायद्यापुढे समानतेचा अधिकार आहे."(Mohan Bhagwat Canada Visit Support)
 
पत्राच्या शेवटी कॅनडा सरकारला आवाहन करण्यात आले आहे की, डॉ. भागवत यांच्या प्रस्तावित दौऱ्याचा विचार करताना समानता, बहुविधता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, शांततापूर्ण संघटन स्वातंत्र्य आणि कायदेशीर प्रक्रिया या मूलभूत तत्त्वांचे पालन करावे. कॅनडाला अधिक संवादाची गरज आहे, विभाजनाची नाही; अधिक पुराव्यांची गरज आहे, आरोपांची नाही; अधिक कायदेशीर प्रक्रियेची गरज आहे, राजकीय दबावाची नाही; आणि आपल्या बहुसांस्कृतिक समाजव्यवस्थेचा अधिक आदर करण्याची गरज आहे; एखाद्या समुदायाला आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नेत्यांचे स्वागत करण्याचा वैध अधिकार हिरावून घेण्याच्या प्रयत्नांची नाही.(Mohan Bhagwat Canada Visit Support)
 
आरोपांवर नव्हे, पुराव्यांवर निर्णय व्हावा
 
पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, राजकीय मतभेद आणि शांततापूर्ण आंदोलन लोकशाहीचा वैध भाग आहेत. धार्मिक, सांस्कृतिक किंवा राजकीय नेत्यांवर टीका करणेही योग्य आहे. मात्र, विश्वसनीय पुराव्यांशिवाय केवळ आरोपांच्या आधारे एखाद्या पाहुण्या नेत्याला प्रवेश नाकारणे हे बहुविधता आणि न्याय्यतेच्या तत्त्वांवर गंभीर प्रश्न निर्माण करणारे ठरेल. संघटनांनी पत्रात म्हटले आहे की, सरसंघचालकांनी नेहमी सामाजिक समरसता, सांस्कृतिक ओळख, समाजसेवा आणि विविध समुदायांतील संवाद यावर भर दिला आहे. त्यामुळे राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांनी सार्वजनिक वक्तव्यांमध्ये जबाबदारीचे भान ठेवावे आणि समाजात फूट पाडणारे वक्तव्य टाळावे, असे आवाहन करण्यात आले.(Mohan Bhagwat Canada Visit Support)
 
या संघटनांचा सहभाग
 
या आवाहनाला पाठिंबा देणाऱ्या १०० हून अधिक संघटनांमध्ये कॅनडा इंडिया फाउंडेशन, कॅनेडियन आर्य समाज, ब्रॅम्प्टन हिंदू सोसायटी, हिंदू सोसायटी ऑफ कॅनडा, हिंदू मिशन ऑफ कॅनडा, हिंदू सभा टेंपल, हिंदू स्वयंसेवक संघ, व्हीएचपी कॅनडा, तसेच अनेक मंदिरे, सांस्कृतिक संस्था आणि सामुदायिक संघटनांचा समावेश आहे.(Mohan Bhagwat Canada Visit Support)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर