म्हाडाच्या कारवाई दरम्यान कुर्ल्यात भीषण दुर्घटना; महाकाय क्रेन कोसळून तीन घरे उद्ध्वस्त

    21-Aug-2026   
kurla Qureshi Nagar Accident
 
मुंबई : (kurla Qureshi Nagar Accident) मुंबईतील कुर्ला पूर्व भागात आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि दुर्घटना घडली. कुर्ला पूर्व येथील कुरेशी नगर परिसरात म्हाडाच्या पाडकाम कारवाईसाठी आणलेली एक महाकाय हायड्रॉलिक क्रेन अचानक नियंत्रण सुटल्याने थेट रहिवासी घरांवर कोसळली. या दुर्घटनेत दोन ते तीन घरे पूर्णपणे चक्काचूर झाली असून, घरात गाढ झोपेत असलेले १० जण गंभीर जखमी झाले आहेत सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पूर्व येथील इंदिरा नगर आणि कुरेशी नगर भागातील म्हाडाच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर निष्कासन आणि पाडकाम मोहीम राबवली जाणार होती. या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी प्रशासनाकडून जेसीबी, पोकलेन आणि इतर अवजड यंत्रसामग्री मागवण्यात आली होती. आज शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साधारण २:३० ते ३:०० वाजण्याच्या सुमारास या यंत्रांची हालचाल सुरू होती. एका मोठ्या ट्रेलरवरून जेसीबी मशीन खाली उतरवण्यासाठी हायड्रॉलिक क्रेनचा वापर केला जात असताना अचानक क्रेनचा समतोल बिघडला. (kurla Qureshi Nagar Accident)
 
क्षणार्धात ही अवजड क्रेन बाजूलाच असलेल्या कच्च्या घरांवर जाऊन कोसळली.मध्यरात्रीची वेळ असल्याने सर्व नागरिक गाढ झोपेत होते. अचानक मोठा आवाज होऊन घरांचे छत अंगावर कोसळल्याने नागरिकांमध्ये एकच आक्रोश सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी स्वतःहून ढिगार्‍याखाली अडकलेल्या महिला, लहान मुले आणि पुरुषांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. माहिती मिळताच चुनाभट्टी आणि कुर्ला पोलीस ठाण्याचे पथक, तसेच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने कुर्ल्यातील भाभा रुग्णालय आणि सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (kurla Qureshi Nagar Accident)
 
अपघाताची भिषणता :रेल्वेलाही फटका
 
या अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की, क्रेनचा एक भाग जवळून जाणार्‍या कुर्ला-ट्रॉम्बे मालवाहू रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड विजेच्या तारांवर जाऊन पडला यामुळे या मार्गावरील वीजपुरवठा खंडित झाला आणि मालगाड्यांची वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या तांत्रिक पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेन बाजूला करण्याचे आणि ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. (kurla Qureshi Nagar Accident)
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर