डोंगर, धुके आणि रुळांवरची जादूई सफर:भारताच्या ‘टॉय ट्रेन’चा प्रवास

India Toy Train
 
 
शिट्टी वाजते... छोटंसं इंजिन धुयात शिरतं... खिडकीबाहेर कधी हिमालयाची शिखरं, कधी चहाचे मळे, तर कधी हिरव्यागार दर्‍या... भारतातील ‘टॉय ट्रेन’चा प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणं नाही, तर तो आहे इतिहास, निसर्ग आणि मानवी अभियांत्रिकीच्या अफाट कल्पकतेतून घडणारा जिवंत अनुभव. त्याचाच आढावा घेणारा आजचा लेख...
 
भारतात ‘रेल्वे’ म्हटलं की डोळ्यांसमोर लांबच लांब एसप्रेस, गजबजलेली रेल्वे स्थानके आणि वेगवान प्रवास येतो. पण, भारताच्या डोंगराळ प्रदेशात अशा काही रेल्वेगाड्या आहेत, ज्या तुम्हाला वेगाच्या जगातून बाहेर काढतात. अरुंद रुळांवरून धावणारे छोटे डबे, छोटंसं इंजिन, तीव्र वळणं, बोगदे, खोल दर्‍या आणि अवघ्या काही मीटर अंतरावर दिसणारी घरं... त्यामुळेच या गाड्यांना प्रेमाने ‘टॉय ट्रेन’ म्हणून संबोधले जाते.
 
काही दिवसांपूर्वीच आपल्या देशाचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दार्जिलिंग रेल्वेचा एक विहंगम व्हिडिओ शेअर केला. भारतातील डोंगरी रेल्वेच्या इतिहासात ‘दार्जिलिंग हिमालयन रेल्वे’, ‘निलगिरी माऊंटन रेल्वे’ आणि ‘कालका-शिमला रेल्वे’ यांना विशेष स्थान आहे. कारण, या तिन्ही रेल्वे ‘युनेस्को’च्या ‘माऊंटन रेल्वेज ऑफ इंडिया’ या जागतिक वारसास्थळाचा भाग आहेत. या रेल्वेमार्गांकडे केवळ पर्यटनाच्या नजरेतून पाहून चालणार नाही, तर शतकभरापूर्वी अत्यंत कठीण डोंगराळ भागात रेल्वे पोहोचवताना अभियंत्यांनी केलेल्या कल्पकतेची ही जिवंत स्मारके आहेत.
 
या जागतिक वारसास्थळात भारतातील तीन ऐतिहासिक पर्वतीय रेल्वेमार्गांचा समावेश आहे. ‘दार्जिलिंग हिमालयन रेल्वे’ ही यांमध्ये समाविष्ट झालेली पहिली आणि आजही डोंगराळ प्रवासी रेल्वेचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. १८८१ मध्ये सुरू झालेल्या या रेल्वेच्या रचनेत अत्यंत निसर्गरम्य, पण आव्हानात्मक पर्वतीय भूभागातून प्रभावी रेल्वे संपर्क निर्माण करण्यासाठी धाडसी आणि कल्पक अभियांत्रिकी उपायांचा वापर करण्यात आला.
 
दार्जिलिंग : चहाच्या मळ्यांतून धुयाच्या गावाकडे!
 
पश्चिम बंगालमधील ‘दार्जिलिंग हिमालयन रेल्वे’ ही भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध ‘टॉय ट्रेन’पैकी एक. न्यू जलपाईगुडी परिसरापासून दार्जिलिंगपर्यंतचा हा ऐतिहासिक रेल्वेमार्ग १९व्या शतकाच्या अखेरीस उभारण्यात आला. सुमारे ८८ किमीचा हा मार्ग डोंगराळ प्रदेशातील तीव्र चढावर मात करण्यासाठी ‘झिगझॅग’ आणि ‘लूप’च्या तंत्राचा वापर करतो. रेल्वेचा मार्ग जसजसा उंची गाठतो, तसतसे परिसराचे स्वरूप बदलत जाते. मैदानी भाग मागे पडतो आणि चहाच्या बागा, पाईनची झाडे, डोंगराळ वस्ती आणि धुयाने वेढलेले उतार दिसू लागतात. म्हणूनच या प्रवासाचं खरं सौंदर्य खिडकीबाहेर आहे. काही ठिकाणी रेल्वेमार्ग घरांच्या अगदी जवळून जातो. त्यामुळे प्रवास करताना दार्जिलिंगमधील स्थानिक जीवनाचेही दर्शन घडते. १९९९ मध्ये ‘दार्जिलिंग हिमालयन रेल्वे’ला ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाला. दार्जिलिंग-घूम परिसरातील ‘टॉय ट्रेन’ जॉय राईड पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. कमी अंतराच्या या प्रवासात डोंगराळ रेल्वेचा इतिहास आणि दार्जिलिंगचा निसर्ग यांचा अनुभव एकाचवेळी घेता येतो. ‘दार्जिलिंग हिमालयन रेल्वे’वरील प्रसिद्ध ‘बी-लास’ वाफेची इंजिने, तसेच जुन्या प्रकारचे चारचाकी आणि बोगी डबे आजही या वारशाची आठवण करून देतात. यामुळे या रेल्वे केवळ ऐतिहासिक अवशेष न राहता ‘लिविंग हेरिटेज’ म्हणजेच जिवंत वारसा ठरतात.
 
कालका-शिमला : प्रत्येक बोगद्याच्या पलीकडे नवं चित्र!
 
एक बोगदा संपतो. क्षणभर डोळ्यांसमोर अंधार आणि पुढच्याच क्षणी खिडकीबाहेर दिसते खोल हिरवी दरी! हिमाचल प्रदेशातील शिमल्याला मैदानी भागाशी जोडणारा कालका-शिमला रेल्वेमार्ग हा भारतातील अभियांत्रिकीच्या उल्लेखनीय कामगिरींपैकी एक मानला जातो. सुमारे ९६ किमी लांबीचा हा मार्ग १९०३ मध्ये सुरू झाला. डोंगराच्या कठीण भूभागातून रेल्वे नेण्यासाठी या मार्गावर असंख्य वळणे, पूल आणि बोगदे बांधण्यात आले. सुरुवातीच्या मार्गावर १०३ बोगदे होते; त्यांपैकी एक नंतर वापरातून बाहेर पडला. त्यामुळे आज या रेल्वेमार्गाच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांमध्ये १०२ बोगद्यांचा उल्लेख केला जातो. कालका सोडल्यानंतर रेल्वे हळूहळू उंची गाठू लागते. मैदानी भागातील वातावरण मागे पडत जाते आणि पाईन, ओक यांसारख्या वृक्षांनी व्यापलेले डोंगर, दर्‍या आणि लहान गावे खिडकीबाहेर दिसू लागतात. बोगद्यातून बाहेर पडताना अचानक समोर उघडणारे डोंगराचे दृश्य हा या प्रवासातील महत्त्वाचा अनुभव ठरतो. २००८ मध्ये कालका-शिमला रेल्वेचा ‘युनेस्को’च्या ‘माऊंटन रेल्वेज ऑफ इंडिया’ या जागतिक वारसास्थळात समावेश करण्यात आला.
 
निलगिरी : दक्षिण भारतातला ‘ब्लू माऊंटन’ अनुभव
उत्तर भारतातील हिमालय सोडून आता दक्षिणेकडे जाऊया. तामिळनाडू, सकाळची थंड हवा. हिरवेगार निलगिरी पर्वत. चहाचे मळे. जंगलातून वाहणारा धुकेदार वारा आणि मेट्टुपालयमकडून उटीच्या दिशेने निघालेली ‘निलगिरी माऊंटन रेल्वे.’ तामिळनाडूच्या निलगिरी डोंगरात ही ऐतिहासिक ‘टॉय ट्रेन’ धावते. ‘निलगिरी माऊंटन रेल्वे’ मेट्टुपालयम आणि उधगमंडलम अर्थात उटी यांना जोडते. सुमारे ४६ किमीचा हा रेल्वेमार्ग डोंगराळ जंगल, चहाचे मळे आणि धुयाने वेढलेल्या उतारांमधून जातो. या रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे, तीव्र चढासाठी वापरण्यात येणारी रॅक-अ‍ॅण्ड-पिनियन प्रणाली. रुळांमध्ये विशेष दातेरी पट्टी बसवून इंजिनाला चढावर पुढे जाण्यास मदत केली जाते. त्यामुळे ‘निलगिरी माऊंटन रेल्वे’ला भारतीय रेल्वेच्या इतिहासात तांत्रिकदृष्ट्या विशेष स्थान आहे. मेट्टुपालयमपासून कुनूरमार्गे उटीकडे जाताना परिसर सातत्याने बदलत जातो. जंगल, धबधबे, पूल, बोगदे आणि चहाचे मळे या प्रवासाचे वैशिष्ट्य आहे. डोंगराच्या उतारावरून सावकाश पुढे जाणारी रेल्वे आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर यामुळे हा मार्ग देशातील लोकप्रिय पर्वतीय पर्यटन मार्गांपैकी एक ठरला आहे. २००५ मध्ये ‘निलगिरी माऊंटन रेल्वे’ला ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाला.
 
महाराष्ट्राची लाडकी ‘टॉय ट्रेन’ : नेरळ-माथेरान
मुंबईच्या धावपळीपासून फार दूर न जाता, ‘टॉय ट्रेन’चा अनुभव घ्यायचा असेल, तर महाराष्ट्राकडेही स्वतःचा खजिना आहे. नेरळ स्टेशन सोडल्यानंतर ट्रेन हळूहळू सह्याद्रीच्या डोंगररांगांकडे चढायला लागते. खाली गावं छोटी होत जातात. एका बाजूला डोंगराची भिंत आणि दुसर्‍या बाजूला दरी. पावसाळ्यानंतर परिसर हिरव्यागार रंगाने भरून जातो. ढग खाली उतरतात. छोट्या धबधब्यांचा आवाज येतो आणि लाल मातीच्या वाटांच्या बाजूने नेरळ ते माथेरान ही ‘टॉय ट्रेन’ हळूहळू पुढे सरकते.
‘युनेस्को’च्या यादीत नसली, तरी महाराष्ट्राची ही रेल्वे देशातील प्रसिद्ध ऐतिहासिक डोंगरी रेल्वेमध्ये गणली जाते. नेरळ ते माथेरानदरम्यानचा सुमारे २० किमीचा हा रेल्वेमार्ग १९०१ ते १९०७ या काळात उभारण्यात आला. मुंबई आणि पुणे या महानगरांच्या जवळ असलेल्या माथेरानमुळे या रेल्वेला विशेष पर्यटनमूल्य प्राप्त झाले आहे. नेरळहून डोंगर चढताना सह्याद्रीचे उतार, दर्‍या, जंगल आणि पावसाळ्यात निर्माण होणारे धबधबे यांचे दर्शन घडते. विशेषतः पावसाळ्यानंतर माथेरानचा परिसर हिरवागार झाल्यावर या रेल्वेचा प्रवास अधिक आकर्षक ठरतो. महाराष्ट्राच्या पर्वतीय रेल्वे वारशात नेरळ-माथेरान या ‘टॉय ट्रेन’चे स्थान महत्त्वाचे आहे.
 
कांग्रा व्हॅली : धौलाधारच्या सावलीतील रेल्वे
 
हिमाचल प्रदेशातील आणखी एक कमी चर्चेत असलेला, पण सुंदर रेल्वे अनुभव म्हणजे ‘कांग्रा व्हॅली रेल्वे.’ पठाणकोटपासून जोगिंदर नगरकडे जाणारी ही रेल्वे कांग्रा खोर्‍यातून पुढे जाते. खिडकीबाहेर एका बाजूला गावं, शेतं आणि नद्या दिसतात, तर दुसर्‍या बाजूला धौलाधार पर्वतरांग प्रवासातील उत्तम सोबती ठरते.
 
हिमाचल प्रदेशातील पठाणकोट-जोगिंदर नगर कांग्रा व्हॅली रेल्वे हा आणखी एक ऐतिहासिक पर्वतीय रेल्वे मार्ग आहे. २०२२ मध्ये मान्सूनमुळे पुलाचे नुकसान झाल्याने चार वर्षे स्थगिती दिल्यानंतर, पठाणकोट (पंजाब) आणि जोगिंदर नगर (हिमाचल प्रदेश) दरम्यानच्या १६४ किमी लांबीच्या नॅरो-गेज मार्गावरील सेवा जून २०२६ मध्ये अधिकृतपणे पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू झाली. कांग्रा खोर्‍यातून जाणार्‍या या रेल्वेमार्गावरून प्रवास करताना धौलाधार पर्वतरांग, शेतजमिनी, गावे, नद्या आणि डोंगराळ परिसराचे दर्शन घडते. या मार्गावरील आहजू स्थानक हे उंचावरील महत्त्वाचे स्थानक आहे. प्रवासादरम्यान कांग्रा खोर्‍याचा ग्रामीण आणि नैसर्गिक परिसर जवळून पाहता येतो.
 
खिडकी उघडी ठेवा... प्रवास अजून बाकी आहे!
 
आजच्या काळात प्रवास म्हणजे कमी वेळात जास्त अंतर पार करणे, अशी संकल्पना रूढ झाली आहे. त्याउलट ‘टॉय ट्रेन’चा प्रवास आपल्याला ‘स्लो ट्रॅव्हल’चा अनुभव देतो. गाडीचा वेग कमी असतो. त्यामुळे खिडकीबाहेरचा निसर्ग पाहण्यासाठी वेळ मिळतो. एखाद्या वळणावर अचानक उघडणारी दरी, बोगद्यातून बाहेर पडताना दिसणारे डोंगर, धुयात हरवलेली झाडे किंवा स्थानिक गावातून जाणारी रेल्वे हे सारे अनुभव घाईत घेता येत नाहीत. याच कारणामुळे या रेल्वे आजही पर्यटकांना आकर्षित करतात.
 
वारसा जपणार्‍या रुळांची सफरभारतीय रेल्वेचा विस्तार आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने होत असताना, या छोट्या गाड्या मात्र भूतकाळाशी जोडलेला दुवा कायम ठेवतात. त्यांच्या प्रवासात जुन्या काळातील रेल्वे अभियांत्रिकी आहे, पर्वतीय प्रदेशातील स्थानिक जीवन आहे आणि पर्यटनाला वेगळी दिशा देणारा निसर्ग आहे. दार्जिलिंगच्या चहाच्या मळ्यांतून जाणारी रेल्वे असो, शिमल्याच्या बोगद्यांमधून पुढे सरकणारी गाडी असो, उटीच्या धुयातून मार्ग काढणारी ‘निलगिरी रेल्वे’ असो किंवा सह्याद्रीच्या कुशीत माथेरानकडे जाणारी ‘टॉय ट्रेन’ असो प्रत्येक मार्गाची कहाणी स्वतंत्र आहे. म्हणूनच भारताच्या पर्वतीय रेल्वे हा केवळ ‘टॉय ट्रेन’चा रोमँटिक प्रवास नाही. तो १०० वर्षांहून अधिक काळ धावत असलेला, अभियांत्रिकी, इतिहास, निसर्ग आणि मानवी विकास यांना जोडणारा भारताचा जिवंत जागतिक वारसा आहे.
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर