नशामुक्त महाराष्ट्रासाठी...

    21-Aug-2026
Drug-Free Maharashtra

माणसाच्या आयुष्यात कुठलाही चांगला-वाईट विचार किंवा सवय रुजवण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे बालपण. म्हणूनच, ‘अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र’ करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने या बालमनावर संस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. नशेच्या विळख्यात तरुणाईला ओढणार्‍या वातावरणापासून आधीच सतर्क करण्याचा शासनाचा हा उपक्रम स्तुत्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती लहानवयातच मिळावी, यासाठी कडक पावले उचलली. शालेय शिक्षणात अमली पदार्थांचे दुष्परिणाम यावर आधारित अभ्यासक्रमाच्या समावेशाची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अलीकडेच दिलेत. शिवाय, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात असलेल्या टपर्‍यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे ‘अमली पदार्थमुक्त महाराष्ट्रा’च्या दिशेने हे मोठे पाऊल म्हणावे लागेल.
 
तरुणाईच्या हातातील भविष्य नशेच्या विळख्यात जाऊ नये, यासाठी आता सरकारने उपचारांपेक्षा प्रतिबंध आणि पुनर्वसनावर भर देण्याचा निर्धार केला आहे. अमली पदार्थांच्या जाळ्याची मुळे उखडून काढतानाच, प्रत्येक शासकीय रुग्णालयात ‘नशामुक्ती केंद्र’ सुरू करण्यापर्यंत व्यापक उपाययोजनांची दिशा मुख्यमंत्री फडणवीस यांनी निश्चित केली. ‘नशामुक्त महाराष्ट्र’ घडविण्यासाठी आता संपूर्ण शासकीय यंत्रणेलाच मैदानात उतरविण्याचा निर्धार सरकारने केला आहे. तरुणपिढी नशेच्या विळख्यात सापडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा त्यांना या दुष्टचक्रात ओढणार्‍या प्रवृत्तींच्या मुळावर घाव घालण्याचा राज्य शासनाचा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. एवढेच नाही, तर अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये ‘एनडीपीएस’ कायद्याचा प्रभावी वापर करण्यासोबतच अशा प्रकरणांचा जलदगतीने निपटारा होण्यासाठी विशेष न्यायालये स्थापन करण्याची दिशा सरकारने निश्चित केली.
 
‘नशामुक्त महाराष्ट्रा’चे स्वप्न केवळ पोलिसांच्या कारवाईने साकार होणार नाही. नशेचा पुरवठा रोखणे, तरुणांना नशेपासून दूर ठेवणे, व्यसनाधीनांचे पुनर्वसन करणे आणि नशेला पोषक ठरणार्‍या सामाजिक वातावरणावर नियंत्रण आणणे, या चारही आघाड्यांवर एकाच वेळी लढा द्यावा लागणार आहे. या निर्णयांमुळे नशामुक्त महाराष्ट्र’ ही केवळ घोषणा न राहता, त्यासाठी ठोस कृतीची दिशा निश्चित झाली आहे.
 
काँग्रेसची दिखाऊ राष्ट्रभक्ती
 
गेली कित्येक दशके अगदी लहान मुलापासून, तर वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक भारतीय नागरिक ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा’ हे गीत अभिमानाने गातो. आपल्या तिरंगा ध्वजाचा सन्मान आणि त्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान या सगळ्याची आठवण करून देणारे हे गीत गायल्यानंतर आपसूकच एक ऊर्जा मिळते. राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय. मात्र, अलीकडेच पार पडलेल्या स्वातंत्र्य दिनी याच पवित्र तिरंग्याचे चित्र असलेला प्रतीकात्मक केक कापण्याचा प्रकार समोर आला. केरळम्चे गृहमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची ही संतापजनक कृती. एकीकडे राष्ट्रभक्तीची भाषणे द्यायची आणि दुसरीकडे राष्ट्रध्वजाच्या प्रतीकात्मक वापराबाबत बेफिकिरी दाखवायची, हा दुटप्पीपणा आता जनतेनेच ओळखायला हवा. ‘तिरंगा’ हा काँग्रेसच्या राजकीय कार्यक्रमातील सजावटीचा भाग नसून, तो देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे प्रतीक आहे. सीमेवर उभा असलेला जवान ज्या तिरंग्यासाठी ऊन-पाऊस, गोळीबार आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता कर्तव्य बजावतो, त्या तिरंग्याचे प्रतीक असलेला केक कापण्याची कृती कितपत योग्य आहे, याचे उत्तर काँग्रेसने जनतेला द्यायलाच हवे.
 
विशेष म्हणजे, राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान हा पक्षीय राजकारणाचा विषय असू नये. काँग्रेस असो किंवा अन्य कोणताही पक्ष, तिरंग्याचा मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र, स्वतःला राष्ट्रहित आणि संविधानाच्या मूल्यांचा मोठा पुरस्कर्ता म्हणून सादर करणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांकडूनच अशी कृती होत असेल, तर त्यावर प्रश्न उपस्थित होणारच. काँग्रेसला राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र वाटायचे असेल, तर आधी स्वतःच्या कृतींचा आरसा जनतेसमोर धरावा लागेल. ज्या तिरंग्यासाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी हसतहसत फासावर चढणे स्वीकारले, ज्या तिरंग्याच्या सन्मानासाठी सीमेवर जवान छातीवर गोळ्या झेलत आहेत, तोच ‘तिरंगा’ केकच्या रूपात समोर ठेवून कापला जात असेल, तर हा केवळ एका कार्यक्रमाचा भाग म्हणून सोडून देण्यासारखा प्रकार नाही. रमेश चेन्नीथला यांच्या या कृतीने काँग्रेसच्या कथित राष्ट्रभक्तीचा मुखवटाच जनतेसमोर आणला आहे.




संबंधित मजकूर