मुंबई: (Cooperatives for Inclusive Growth in India ) सहकाराच्या माध्यमातून विकासाची फळे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकारी संस्थांनी बदलत्या आर्थिक परिस्थितीशी जुळवून घेत आधुनिक तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि व्यावसायिक व्यवस्थापनाचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे माजी संचालक सतीश मराठे यांनी केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कीर्ती म. डुंगरसी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ‘सृजन २०२६’ अंतर्गत राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आणि ग्रामीण विकास विभागांच्या वतीने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या सहकार्याने ‘समावेशक वृद्धी व विकास : भारतातील सहकार क्षेत्राची भूमिका’ या विषयावर आंतरमहाविद्यालयीन अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मराठे बोलत होते. (Cooperatives for Inclusive Growth in India )
मराठे यांनी भारतातील सहकार चळवळीचा विकास, समावेशक आर्थिक वृद्धीमध्ये सहकार क्षेत्राचे योगदान, ग्रामीण व तळागाळातील अर्थव्यवस्थेचे सक्षमीकरण आणि लोकसहभागाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आर्थिक विकासाकडे केवळ पारंपरिक दृष्टिकोनातून न पाहता समावेशकता, सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत विकास या व्यापक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. (Cooperatives for Inclusive Growth in India )
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. अनिल मार्कंडेय यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन समकालीन सामाजिक व आर्थिक प्रश्न समजून घेण्याची आणि त्यावर चिकित्सक विचार करण्याची संधी ‘सृजन’च्या माध्यमातून मिळत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. हर्षद भोसले यांच्यासह विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. मेधा धापारे यांनी केले, तर डॉ. अंकिता वर्तक यांनी सूत्रसंचालन केले. (Cooperatives for Inclusive Growth in India )