‘जन-गण-मन’ आणि ‘वन्दे मातरम्’ या दोन राष्ट्रगीतांचा अपमान करणार्यांविरोधात फौजदारी कारवाईचा कायदा संसदेने केल्यानंतर केवळ एका महिन्यातच गांधी परिवार आणि काँग्रेसचे नामधारी अध्यक्ष खर्गे हे त्यात गुंतावेत, हा योगायोग. सोनिया व राहुल गांधी आणि खर्गे यांच्यावर सरकार कारवाई करणार की नाही, याची प्रतीक्षा आहेच. कारण, आपला पक्ष ‘वन्दे मातरम्’ची केवळ दोनच कडवी गाणार असल्याचे सांगून, काँग्रेसने केवळ सरकारलाच थेट आव्हान दिलेले नाही,तर स्वातंत्र्यलढ्याचा महामंत्र असलेल्या ‘वन्दे मातरम्’चाही अपमानच केला आहे.
काँग्रेसचे नामधारी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे खरे मालक सोनिया गांधी व राहुल गांधी हे अडचणीत आले आहेत, असे दिसते. कारण, स्वातंत्र्य दिनी काँग्रेसच्या मुख्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर तेथे ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीयगीत संपूर्णपणे वाजविले जात असल्याचे पाहून सोनिया गांधी संतप्त झाल्याचे या कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते. त्या केवळ संतप्तच झाल्या नाहीत, तर त्यांनी हे गीत सुरू असताना खर्गे यांच्याशी काही चर्चा केली, तसेच हातवारे करून हे गीत मध्येच थांबविण्याच्याही सूचना केल्या. त्यानंतर राहुल गांधी हेही ‘वन्दे मातरम्’ पूर्णपणे वाजविण्याच्या विरोधात असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. हा व्हिडिओ देशभर प्रसिद्ध झाल्यानंतर या तिघांवर कारवाई केली जावी, अशी मागणी जनतेत होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या अन्य नेत्यांनीही गांधी परिवाराने ‘वन्दे मातरम्’चा अपमान केल्याचे सांगत, त्यांच्यावर सडकून टीकाही केली.
‘वन्दे मातरम्’ हे गीत सर्वांनाच संपूर्णपणे तोंडपाठ असेल, असे नाही. त्याबद्दल या कायद्यात सक्ती नाही. पण, ते संपूर्णपणे वाजविले जात असताना उपस्थितांनी शांतपणे उभे राहून या गीताचा मान राखला पाहिजे, हे या कायद्यात अपेक्षित. तसे न करणार्यांवर कायदेशीर कारवाई करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. तेथे कोण गुन्हेगार आहे, हे पाहून त्यानुसार कारवाईत अधिक-उणे करता येणार नाही.
‘वन्दे मातरम्’ हे जाज्ज्वल्य राष्ट्रीयगीत असून, त्यास भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची आणि त्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानाची सोनेरी किनार आहे. फाशीचा दोर आवळला जाण्यापूर्वी अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांचे ‘वन्दे मातरम्’ हे अखेरचे शब्द होते, हे लक्षात घेता या गीताचे महत्त्व लक्षात येईल. हे गीत पूर्णपणे म्हटले जावे आणि देशाचा गौरव सर्वत्र जाहीर व्हावा, या उद्देशानेच सरकारने मध्यंतरी हा कायदा केला होता. यंदा स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर प्रथमच ‘वन्दे मातरम’ हे गीत वाजविले गेले आणि तेही संपूर्णपणे. मात्र, काँग्रेससारख्या पक्षाने इतया महत्त्वपूर्ण बाबीतही आपले क्षुद्र पक्षीय राजकारण आणले आहे. कारण काय, तर त्यांनी हे गीत संपूर्णपणे वाजविले; तर मुस्लीम मतदार नाराज होतील आणि ते आपल्याला मते देणार नाहीत, ही भीती काँग्रेस नेत्यांना वाटते.
ही भावना केवळ आजच्या गांधीपिढीतील गांधी परिवाराची नाही. पं. नेहरू यांनीच या गीताचा अपमान अधिकृत केला होता. ‘वन्दे मातरम्’ या गीताची छाटणी काँग्रेसच्या अधिवेशनातच झाली. तेव्हाही तत्कालीन काँग्रेस नेते पं. नेहरू यांनी हे गीत पूर्णपणे गायल्यास मुस्लीम समाज नाराज होईल, असे कारण दिले होते. तेव्हा त्यांनी महात्मा गांधी यांचे मन वळवून या गीताची पहिली दोनच कडवी सरकारी कार्यक्रमात वाजविली जातील, असा ठराव संमत केला होता. म्हणजे, मुस्लिमांच्या लांगूलचालनाचे काँग्रेसचे धोरण हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे आहे. मात्र, सामान्य लोक आणि कलाकारांची या गीताबद्दलची खरी भावना काय आहे, ते काँग्रेसच्याच अधिवेशनात दिसून आले होते. १९२३ मध्ये आंध्र प्रदेशातील काकिनाडा येथे काँग्रेसचे अखिल भारतीय अधिवेशन भरले होते. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, मौलाना मोहम्मद अली जौहर. जेव्हा ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. विष्णू दिगंबर पलुस्कर या अधिवेशनाच्या उद्घाटनानिमित्त मंचावर ‘वन्दे मातरम्’चे संपूर्ण गायन करायला लागले, तेव्हा या मौलानाने ‘इस्लाममध्ये संगीताला स्थान नाही’ आणि त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत हे गाणे थांबविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पं. पलुस्कर यांनी तो जुमानला नाही. "हा अधिवेशनाचा मंच, ही काही मशीद किंवा धार्मिकस्थळ नव्हे,” असे सांगून त्यांनी हे गीत पूर्णपणे गायले. या अधिवेशनात मौलानांची मिरवणूक वाजतगाजत आली होती. तेव्हा या मौलानाला ‘इस्लाममध्ये संगीताला स्थान नाही,’ याची आठवण झाली नव्हती, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.
या गीतातील ‘वन्दे मातरम्’ हे शब्द आणि पुढील कडव्यांमधील हिंदू देवतांच्या उल्लेखामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याची तकलादू सबब मुस्लिमांकडून नेहमी पुढे केली जाते. पण, या देशातील बहुसंख्य लोकांच्या भावनेचे काय? मुस्लिमांकडून दिवसातून पाचवेळा जी ‘अझान’ दिली जाते, त्यात ‘अल्लाशिवाय जगात अन्य कोणीही पूजनीय नाही व अल्ला हाच एकमेव परमेश्वर आहे,’ अशी उद्घोषणा केली जाते. त्यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत काय? भारतातील बहुसंख्य जनतेला मान्य असलेल्या सांस्कृतिक आणि धार्मिक प्रतीकांचा आदर राखला जाणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. नेमया याच भावनेतून भाजप सरकारने हा कायदा केला होता. पूर्वीच्या ‘राजपथा’चे नामांतर ‘कर्तव्यपथ’ असे करणे आणि तेथे ‘इंडिया गेट’जवळील कमानीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापन करून भाजप सरकारने आपले राष्ट्रवादी चारित्र्य स्पष्ट केले होते. ‘वन्दे मातरम्’ कायदा हा त्याच राष्ट्रवादीवृत्तीचा नवा आविष्कार होता. आता त्याची अंमलबजावणी करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे.
गांधी परिवार आणि खर्गे यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. कारण, त्यांनी थेट सरकारला आव्हान दिले आहे. मात्र, सरकारच्या नरमाईच्या धोरणामुळे काँग्रेस नेत्यांची भीड चेपली असून, दोन दिवसांनंतर काँग्रेसने असे म्हटले आहे की, "काँग्रेसच्या कार्यक्रमात ‘वन्दे मातरम्’ची केवळ पहिली दोनच कडवी वाजविली जातील.” हे गीत यापुढे संपूर्णपणे वाजविले गेले पाहिजे, असा कायदा नुकताच संसदेने संमत केला आहे. त्यामुळे, ‘त्याची केवळ पहिली दोनच कडवी वाजविली जातील,’ असे म्हणणे हे या कायद्याला दिलेले थेट आव्हानच आहे. काँग्रेसच्या नेत्यांची ही मग्रुरी उतरविणे आणि त्यांना कायद्याचे पालन करावयास भाग पाडणे, हे आता सरकारच्या हाती!