मुंबई : (Bandra Fort) गिरगाव आणि दादर चौपाटीनंतर मुंबईच्या किनारपट्टीवरील आणखी एका पर्यटनस्थळाला नवा ‘वॉटरफ्रंट व्ह्यू पॉइंट’ मिळणार आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून वांद्रे किल्ला परिसरातील समुद्रकिनाऱ्याचे संरक्षण आणि सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे १७.८५ कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाची राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जात पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
मुंबईतील वांद्रे येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या ऐतिहासिक वांद्रे किल्ला परिसराच्या विकासासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये किल्ल्यालगत संरक्षण भिंत उभारणे, बँड स्टँड परिसरात व्ह्यूइंग गॅलरीची निर्मिती तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या कामांचा समावेश आहे. (Bandra Fort)
ही कामे दर्जेदार पद्धतीने, निर्धारित कालमर्यादेत आणि परिसराच्या ऐतिहासिक व पर्यावरणीय महत्त्वाचा विचार करून पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. (Bandra Fort)
या प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण समुद्राकडे पाहता येईल असा ‘वॉच डेक’ उभारण्याची योजना आहे. या प्रस्तावित डेकवरून वांद्रे- वरळी सी लिंक, आगामी वर्सोवा-वांद्रे सी लिंक तसेच वरळी -दादर किनारपट्टीचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. त्यामुळे बांद्रा फोर्ट हे मुंबईतील नागरिक आणि पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षणाचे ठिकाण ठरण्याची शक्यता आहे. (Bandra Fort)
३७ बाय २६.५ मीटरचा वॉच डेक
प्रस्तावित वॉच डेकची लांबी सुमारे ३७ मीटर आणि रुंदी २६.५ मीटर असणार आहे. हा डेक विद्यमान समुद्रकिनारी पदपथाशी जोडण्यासाठी सुमारे ४२ मीटर लांबीचा प्रवेश रॅम्प उभारण्यात येणार आहे. डेकची उभारणी प्रीकास्ट काँक्रीट पाइल्सवर करण्याचे नियोजन आहे. (Bandra Fort)
यामुळे समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षितपणे उभे राहून समुद्र, सी लिंक आणि मुंबईच्या किनारपट्टीचे दृश्य अनुभवण्याची सुविधा नागरिकांना मिळू शकते. मात्र, डेकच्या अंतिम आराखड्यासह त्याचे स्थान आणि सार्वजनिक वापरासंदर्भातील तपशील प्रशासनाच्या पुढील प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहेत. (Bandra Fort)
३७० मीटर समुद्रभिंतीचे मजबुतीकरण
हा प्रकल्प केवळ पर्यटनाच्या दृष्टीने नाही, तर किनारपट्टी संरक्षणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. प्रकल्पांतर्गत बांद्रा फोर्ट परिसरातील सुमारे ३७० मीटर लांबीच्या विद्यमान समुद्रभिंतीचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. (Bandra Fort)
अनेक वर्षांच्या समुद्राच्या भरती-ओहोटी आणि मुसळधार पावसामुळे समुद्रभिंतीच्या काही भागांतील दगड विस्थापित झाले आहेत. तसेच काही ठिकाणी पोकळ्या निर्माण झाल्या असून पदपथाच्या खालील संरचनेवरही परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे किनारपट्टीची स्थिरता आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन संरचनात्मक दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे. (Bandra Fort)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.