मुंबई - प्रसिद्ध अभिनेते आणि युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आयुष्मान खुराना यांनी महाराष्ट्रातील जालना येथे भेट देऊन, हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या “कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण” या युनिसेफ कार्यक्रमाला भेट देऊन मुले आणि उपस्थितांशी संवाद साधला.खुराना यांच्यासोबत युनिसेफ इंडियाच्या पथकात उपप्रतिनिधी यास्पर मोलर यांचा समावेश होता. या मोहिमेला राज्य सरकार आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य आहे.
Ayushmann Khurrana
"हंगामी, आर्थिक अडचणींमुळे होणारे स्थलांतर हा स्वखुशीने निवडलेला पर्याय नसून अनेक कुटुंबांसाठी ते कठोर वास्तव आहे," असे मत आयुष्मान खुराना यांनी मुले आणि स्थानिक सदस्यांची भेट घेतल्यानंतर यावेळी व्यक्त केले. कोणत्याही मुलाला त्याच्या आवाक्यात नसलेल्या परिस्थितीमुळे आपले बालपण गमवावे लागू नये. जालन्यात, मी स्थानिक रहिवाशांना एकत्र येऊन स्थलांतरामुळे प्रभावित झालेल्या मुलांना संरक्षण देताना आणि त्यांना कुटुंबाशी जोडून घेऊन काळजी घेताना पाहिले. हा कार्यक्रम केवळ सुरक्षित घर पुरवत नाही तर नातेसंबंधही जपतो, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि मुलांना उज्ज्वल भविष्याची आशा देते, असं यावेळी आयुष्यमान म्हणाला.
Ayushmann Khurrana
अनेक उपेक्षित कुटुंबांसाठी, आर्थिक अडचणींमुळे हंगामी स्थलांतर ही वास्तविकता आहे. यामुळे मुलांसाठी बालमजुरी, बालविवाह, शिक्षणात खंड, कौटुंबिक दुर्लक्ष आणि हिंसाचाराचा धोका वाढू शकतो. पालकांच्या अनुपस्थितीत काही वेळा विस्तारित कुटुंबासह किंवा आजी-आजोबांसोबत मागे राहणारी मुले शाळेत जातात किंवा त्यांना आरोग्यसेवाही मिळतात. परंतु, त्यांना अनेकदा भावनिक पाठिंबा मिळत नाही, घरातून दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढते आणि घरगुती जबाबदाऱ्या अंगावर पडतात. या समस्यांचे निराकरण करणाऱ्या आणि हिंसाचार, अत्याचार, शोषण व कौटुंबिक दुर्लक्ष रोखण्यासाठी तसेच बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी युनिसेफ भारत सरकारसोबत काम करते. जालन्यात, जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने “कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण” कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक रहिवासी आणि सरकार यांनी एकत्र काम केल्यामुळे स्थलांतरित पालकांच्या मुलांसाठी सुरक्षित वातावरण, शिक्षणात खंड न पडणे या गोष्टी शक्य झाल्या आहेत. तसेच आरोग्यसेवा, पोषण व मानसिक-सामाजिक आधार यांसारख्या सेवाही मुलांसाठी उपलब्ध झाल्या असून बालमजुरी आणि बालविवाहाचा धोकाही कमी होण्यास मदत झाली आहे.
Ayushmann Khurrana
"सर्वाधिक असुरक्षित मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण पुरवण्यात जालना जिल्हा प्रशासनाला साथ देताना युनिसेफला आनंद होत आहे," असे युनिसेफ इंडियाचे यास्पर मोलर म्हणाले. "मुलांवरील हिंसाचार रोखला जाऊ शकतो. बाल न्याय कायदा २०१५ ला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. अशावेळी मुलांच्या आयुष्यात असलेले धोके वेळीच ओळखणे आणि कुटुंबांना आवश्यक सेवा देणे गरजेचे आहे. तसेच मुलांना सामाजिक संरक्षणाशी जोडण्यासाठी व्यवस्था अधिक बळकट करणेही महत्त्वाचे आहे. या कामासाठी सहकार्य देणाऱ्या आणि प्रत्येक मुलाच्या सुरक्षितता व काळजी या हक्कांसाठी पुढाकार घेणाऱ्या आयुष्मान खुराना यांचेही युनिसेफ मनःपूर्वक कौतुक करते."Ayushmann Khurrana
खुराना आणि मोलर यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आणि मुले व कुटुंबांवर या कार्यक्रमाचा होणारा परिणाम याबद्दल कौतुक केले.Ayushmann Khurrana