अभाविपच्या विद्यार्थिनींवर हल्ल्याचा प्रयत्न!सदस्यता अभियानादरम्यान मनविसे कार्यकर्त्यांनी टेबल उचलून धक्काबुक्की केल्याचा आरोप

    21-Aug-2026   
Attempted Attack On ABVP Students
 
मुंबई : (Attempted Attack On ABVP Students) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मुंबईसह महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये गेल्या एक महिन्यापासून सदस्यता अभियान सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांशी संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना संघटनेशी जोडण्यासाठी हे अभियान शांततामय व लोकशाही पद्धतीने राबवले जात आहे. मात्र, साठे महाविद्यालय परिसरात अभाविपचे सदस्यता अभियान सुरू असताना गुरुवारी मनविसेच्या काही कार्यकर्त्यांनी अभाविपच्या अभियानाला विरोध केल्याचे निदर्शनास आले. अभाविप कार्यकर्त्यांशी वाद घातला आणि त्यानंतर विद्यार्थीनींवर टेबल उचलून हल्ला करणाच्या प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शांततामय पद्धतीने सुरू असलेल्या विद्यार्थी संपर्क अभियानाला हिंसक पद्धतीने विरोध होणे ही गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचे अभाविपचे म्हणणे आहे. (Attempted Attack On ABVP Students)
 
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये अभाविपचे ४ कॅम्पसवर सदस्यता अभियान सुरू होते. यंदाच्या सदस्यता अभियानात महाराष्ट्रात अभाविपने आतापर्यंत दोन लाख सदस्यसंख्येचा टप्पा गाठला असून, मुंबईसह राज्यातील विविध प्रमुख महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुंबईमधील कीर्ती कॉलेज, रुईया महाविद्यालय, रूपारेल महाविद्यालय, भवन्स महाविद्यालय, रुईया महाविद्यालय, वर्तक महाविद्यालय यांसह राज्यातील सुमारे २५० हून अधिक महाविद्यालय मध्ये सदस्यता झाली आहे आणि ह्या पुढे ५०० पेक्षा अधिक कॅम्पसमध्ये हे अभियान शांततेत सुरू राहिल. अशा पार्श्वभूमीवर साठे महाविद्यालय परिसरातच विरोध आणि हल्ल्याची घटना का घडली? अशी विचारणा अभाविपकडून होते आहे. (Attempted Attack On ABVP Students)
 
अभाविपच्या वाढत्या सदस्यसंख्येला आणि विद्यार्थ्यांमधील वाढत्या प्रतिसादाला पाहूनच हा विरोध केला जात आहे का? असा प्रश्न अभाविपला पडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांमध्ये आपले विचार आणि कार्य घेऊन जाण्याऐवजी एखाद्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करून विरोध करण्याचा मार्ग स्वीकारणे हे लोकशाही मूल्यांना धरून नाही. अभाविपचे सदस्यता अभियान कोणत्याही विद्यार्थ्यावर लादलेले नसून, विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार संघटनेशी जोडण्याचा हा लोकशाही मार्ग आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी हिंसेचा वापर कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही, असे अभाविपचे स्पष्ट मत आहे. (Attempted Attack On ABVP Students)
 
संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच महाविद्यालयीन परिसरातील विद्यार्थी आणि सर्व विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची मागणी अभाविपने केली आहे. (Attempted Attack On ABVP Students)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर