परहित सरिस धरम नहि भाई

    20-Aug-2026

Tulsidas Teachings On Humanity

भारताच्या अध्यात्म क्षेत्रात अनेक संत झाले. यामध्ये भगवंताचे सामान्यसुलभ दर्शन घडवणार्‍यांमध्ये गोस्वामी तुलसीदास यांचे नाव महत्त्वाचे. श्रीरामाची भक्ती करताना, समाजाला रामराज्याची व्यापक कल्पना देणार्‍या तुलसीदासांची जयंती बुधवार दि. १९ ऑगस्ट रोजी झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांचे चिंतन करणारा हा लेख...
 
भारताच्या अध्यात्म अवकाशात ईश्वराला साक्षात सामान्य माणसाच्या सन्मुख प्रस्तुत करणार्‍या अनेक विभूति आहेत आणि त्यामध्ये गोस्वामी तुलसीदास अग्रणी. तुलसीदासांनी वेद-उपनिषदांतील गहन तत्त्वज्ञान लोकभाषेत उतरवले, भक्तीला कर्माशी जोडले आणि धर्माला मानवी संवेदनांचा स्पर्श दिला. ‘परहित सरिस धरम नहि भाई| पर पीड़ा सम नहि अधमाई॥’ या एका वचनातून, त्यांनी धर्माचे जणू सारतत्त्वच सांगितले आहे. या वचनाचा अर्थ; दुसर्‍याचे कल्याण करण्यासारखा दुसरा धर्म नाही आणि दुसर्‍याला दुःख देण्यासारखे दुसरे पाप नाही. तुलसीदास जयंतीचे निमित्त साधून त्यांच्या चरित्राचा विचार करताना, आपल्याला केवळ या एका दोह्यापुरते थांबून चालणार नाही; तर असा उदात्त आणि प्रगल्भ विचार ज्यांच्या लेखणीतून प्रकट झाला, त्या तुलसीदासांचे जीवन, त्यांची रामभक्ती आणि त्यांची सर्वश्रेष्ठ निर्मिती ‘रामचरितमानस’ यांचाही विचारही करावा लागेल.
 
गोस्वामी तुलसीदासांच्या जन्मकाळाबाबत विद्वानांत मतभेद असले, तरी परंपरेनुसार उत्तर प्रदेशातील राजापूर येथे त्यांचा जन्म झाल्याचे मानले जाते. जन्मापासूनच त्यांच्या आयुष्याला दुःखाची किनार होती. माता-पित्याचे छत्र फार काळ लाभले नाही आणि बालपण उपेक्षा व प्रतिकूलतेत गेले. पुढे गुरु नरहरिदास यांच्या सान्निध्यात त्यांना श्रीरामकथेचे संस्कार मिळाले; परंतु तरुणपणी त्यांचे मन वैराग्याकडे नव्हे, तर संसाराकडेच ओढले गेले. रत्नावलीशी विवाह झाल्यानंतर तर ते पत्नी प्रेमात इतके आकंठ बुडाले की, तिच्याविना क्षणभरही राहणे त्यांना असह्य होई. एकदा रत्नावली माहेरी गेली असता, विरहाने व्याकुळ झालेल्या तुलसीदासांनी मुसळधार पाऊस, काळोखी रात्र आणि दुथडी भरून वाहणारी नदी यांची पर्वा केली नाही. जीव धोयात घालून ते तिच्या माहेरी पोहोचले. पतीची ही अनावर विषयासक्ती पाहून रत्नावली प्रेमाने सुखावली नाही; उलट तिने त्यांची कठोर निर्भर्त्सनाच केली. तिचे शब्द प्रसिद्ध आहेत ‘अस्थि चर्ममय देह मम, तामें ऐसी प्रीति; ऐसी जो श्रीराम में, होत न तौ भवभीति|’ अर्थात, हाडामांसाच्या माझ्या नश्वर देहावर जितके प्रेम करता, त्याच्या अर्धे जरी श्रीरामावर केले असते, तर संसारभयातून मुक्त झाला असतात!
 
हे शब्द तुलसीदासांच्या हृदयात वज्राघातासारखे उतरले. त्याच रात्री जणू एक विषयासक्त पती संपला आणि रामनामात स्वतःला विसर्जित करणार्‍या महान तुलसीदासांचा जन्म झाला. तुलसीदासांचे सर्वांत महान कार्य अर्थातच ‘रामचरितमानस.’ महर्षी वाल्मिकींनी संस्कृतमध्ये सांगितलेली रामकथा तुलसीदासांनी ‘अवधी’ लोकभाषेत नव्या भक्तिभावाने मांडली.
 
‘रामचरितमानस’ही स्वतंत्र आध्यात्मिक-काव्यात्मक निर्मिती आहे. वाल्मिकींच्या रामायणातील रामकथा गाभास्वरूप असली, तरी तुलसीदासांच्या ‘मानसा’तील राम हे भक्ताच्या अंतःकरणातील परमेश्वर आहेत. त्यांच्या रामात परब्रह्म आहे, पण त्याचवेळी पुत्राची नम्रता, बंधूचे प्रेम, पतीचे उत्तरदायित्व, राजाचे कर्तव्य आणि सामान्य माणसाविषयीची करुणाही आहे. म्हणूनच, ‘रामचरितमानस’ वाचताना, आपण आदर्श मानवी जीवनाचा आध्यात्मिक आराखडा पाहात असतो.
 
याहून महत्त्वाचे म्हणजे, तुलसीदासांनी धर्मज्ञानाला लोकाभिमुख केले. त्या काळात संस्कृतमधील धार्मिक आणि तात्त्विक साहित्य सामान्य जनतेच्या सहज आवायात नव्हते. तुलसीदासांनी रामकथा बोलीभाषेत आणली. त्यामुळे शेतकरी, कारागीर, गृहिणी, व्यापारी, साधू-समाजातील प्रत्येक स्तरातील माणूस, रामकथेचा सहभागी झाला. ‘रामचरितमानस’ घराघरांतील ग्रंथ झाला. त्याच्या चौपाया आईच्या अंगाईत आल्या, रामलीलेच्या रंगमंचावर आल्या, कीर्तन-प्रवचनात आल्या आणि लोकांच्या दैनंदिन बोलण्यातही उतरल्या. सामान्य माणसाला त्याच्या भाषेत अध्यात्म उपलब्ध करून देणे, हे स्वतःमध्ये तुलसीदासांनी केलेले महान ‘परहित’च होते.
 
‘रामचरितमानस’चा आणखी एक विलक्षण पैलू म्हणजे, त्यातील भक्ती आणि सामाजिक नीतिमूल्यांचा समन्वय. तुलसीदासांच्या रामाच्या वाटेवर निषादराज येतो, केवट येतो, शबरी येते आणि हनुमंत येतात. सामाजिक प्रतिष्ठा किंवा भौतिक वैभवापेक्षा भक्ती, निष्ठा आणि अंतःकरणाची शुद्धता अधिक महत्त्वाची असल्याचा भाव या पात्रांमधून व्यक्त होतो. राम केवटाला जवळ करतात, शबरीची भक्ती स्वीकारतात आणि हनुमंताच्या सेवेला अमरत्व देतात. ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निर्मळ भावनेतूनच जातो, हा भक्तीचा मूलभूत संदेश यातून मिळतो.
 
याच पार्श्वभूमीवर ‘परहित सरिस धरम नहि भाई| पर पीड़ा सम नहि अधमाई॥’ या वचनाची खरी व्याप्ती लक्षात येते. ‘परहित’ म्हणजे केवळ धनदान नव्हे. भुकेल्याला अन्न देणे परहित आहे; पण अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला आधार देणेही परहित आहे. निराश माणसाला आशा देणे, अज्ञानी व्यक्तीला ज्ञान देणे, सामर्थ्यवानाने दुर्बलाचे संरक्षण करणे, श्रीमंताने आपल्या संपत्तीत समाजाचा वाटा मानणे आणि राज्यकर्त्याने स्वतःच्या अधिकाराचा उपयोग जनकल्याणासाठी करणे, हे सारे परहितच. अगदी आपल्या शब्दांमुळे दुसर्‍याला अनावश्यक वेदना होणार नाहीत, याची काळजी घेणेही परहिताच्या सूक्ष्म परिघात येते.म्हणूनच या दोह्याचा दुसरा चरण पहिल्याइतकाच महत्त्वाचा आहे, ‘पर पीड़ा सम नहि अधमाई|’ दुसर्‍याला जाणीवपूर्वक पीडा देणे, हा अधर्म आहे. अन्याय करणे, शोषण करणे, फसवणूक करणे, अपमानित करणे, अधिकाराचा गैरवापर करणे, दुर्बलाचे हक्क हिरावून घेणे; ही सारीच परपीडेची वेगवेगळी रूपे.
 
तुलसीदासांच्या साहित्यविश्वाची व्याप्ती ‘रामचरितमानस’पुरतीच मर्यादित नाही. ‘विनयपत्रिका’, ‘कवितावली’, ‘गीतावली’, ‘दोहावली’ सारख्या रचनांतूनही त्यांच्या भक्तीचे रंग दिसतात. ‘हनुमान चालीसा’ही त्यांच्याशी जोडली जाते. त्यांच्या रचनांमध्ये कधी भक्ताची ईश्वरापुढील आर्त विनवणी आहे, कधी वैराग्य आहे, तर कधी मानवी स्वभावाचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आहे. मात्र, या सगळ्याच्या केंद्रस्थानी रामच आहेत.
 
तुलसीदासांची रामराज्याची संकल्पनाही समजून घेणे आवश्यक आहे. रामराज्य म्हणजे न्याय, सुरक्षा, परस्परविश्वास, कर्तव्य आणि लोककल्याणावर आधारित समाजाचे प्रतीक. राजा स्वतःसाठी नसून प्रजेसाठी आहे; सामर्थ्य संरक्षणासाठी आहे; संपत्ती लोककल्याणासाठी आहे. आजच्या काळात तुलसीदासांचे हे तत्त्व कदाचित अधिकच प्रासंगिक आहे. म्हणूनच त्यांच्या शिकवणीने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. आपल्या आसपासच्या एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केली, एखाद्या वृद्धाला आधार दिला, एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी दिली, आपल्या व्यवसायात प्रामाणिकपणा ठेवला, आपल्या अधिकारामुळे कोणावर अन्याय होऊ दिला नाही किंवा एखाद्या निराश माणसाच्या आयुष्यात आशेचा छोटासा दिवा लावला, तर तीदेखील रामपूजाच आहे.
 
तुलसीदासांनी प्रभू रामाला ग्रंथातून लोकांच्या हृदयात आणले. ‘रामचरितमानस’ने रामकथा घराघरांत पोहोचवली; पण त्यातून त्यांनी धर्माला माणुसकीची दिशा दिली. रामनाम ओठांवर येणे, ही भक्तीची सुरुवात आहे; रामाची करुणा आपल्या आचरणात उतरणे, ही तिची पूर्णता आहे. म्हणून शेकडो वर्षांनंतरही तुलसीदासांच्या शब्दांतून भारतीय अध्यात्माचा एक चिरंतन स्वर ऐकू येतो.

परहित सरिस धरम नहि भाई|
पर पीड़ा सम नहि अधमाई॥
 
माणसाने माणसासाठी उभे राहावे, सामर्थ्याने दुर्बलाचे रक्षण करावे आणि आपल्या अस्तित्वामुळे दुसर्‍याच्या जीवनातील दुःख थोडे कमी व्हावे, यापेक्षा मोठी रामभक्ती कोणती?
 
आसावरी पाटणकर




संबंधित मजकूर