देशभरात प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टरांना आता एकच परवाना; राज्यांच्या नोंदणीची कटकट संपणार

    20-Aug-2026   
 
 One Nation One Licence
 
नवी दिल्ली (One Nation One Licence for doctors) : देशातील वैद्यकीय क्षेत्रात नोकरशाही आणि प्रशासकीय अडचणी दूर करणारा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे. . ’वन नेशन, वन लायसन्स’ (एक देश, एक परवाना) या संकल्पनेतंर्गत सर्व डॉक्टरांना आता ’सिंगल लायसन्स’ देण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव एनएमसीने मांडला आहे. सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या डॉक्टरने महाराष्ट्रातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले असेल, तर त्याला अनेकदा तातडीच्या परिस्थितीत एका राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर दुसर्‍या राज्यात जाऊन सेवा देण्यास कायदेशीर अडचणी येत होत्या.एनएमसीच्या नवीन प्रस्तावानुसार, डॉक्टरांना एकाच नोंदणीच्या आधारे संपूर्ण देशात कुठेही वैद्यकीय सेवा देण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. यामुळे कोणत्याही राज्यात पुन्हा वेगळी नोंदणी करण्याची कटकट पूर्णपणे संपणार आहे. (One Nation One Licence for doctors)
 
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने हा मसुदा सार्वजनिक केला असून, यावर देशभरातील डॉक्टर, वैद्यकीय संघटना आणि नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत. (११ सप्टेंबर २०२६ पर्यंतभागधारकांना आपल्या सुधारणा एनएमसीच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदवता येणार आहेत. त्यानंतर या प्रस्तावाचे पूर्ण कायद्यात रूपांतर केले जाईल. वैद्यकीय विश्वातून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे. (One Nation One Licence for doctors)

सामान्य जनता आणि डॉक्टरांना काय होणार फायदा?
 
१. रुग्णांसाठी: एखादा डॉक्टर अधिकृत आहे की नाही, हे रुग्ण केंद्रीय डिजिटल पोर्टलवर एका क्लिकवर तपासू शकतील. भोंदू डॉक्टरांना आळा बसेल.

२. डॉक्टरांसाठी: बदली झाल्यावर किंवा दुसर्‍या राज्यात सेवा द्यायची असल्यास पुन्हा फी भरणे आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याची गरज पडणार नाही.

३. आरोग्य व्यवस्थेसाठी: या निर्णयामुळे देशातील आरोग्य सेवेचे सक्षमीकरण होणार आहे. आपत्कालीन किंवा पूर-साथीच्या परिस्थितीत एका राज्यातील डॉक्टरांची फौज तात्काळ दुसर्‍या राज्यात कायदेशीर अडचणींशिवाय तैनात करता येईल.
 
वन नेशन वन लायसन्स आणि नियम
 
प्रत्येक पात्र डॉक्टरला एक ’युनिक आयडेंटिफिकेशन नंबर’ म्हणजेच युनिक आयडी दिला जाईल. हा आयडी मिळताच संबंधित डॉक्टर संपूर्ण भारतात कुठेही कायदेशीररीत्या प्रॅक्टिस करण्यासाठी पात्र ठरेल. मिळालेला परवाना ५ वर्षांसाठी वैध राहील, त्यानंतर डिजिटल नूतनीकरण आवश्यक आहे. मात्र परवाना दर ५ वर्षांनी नूतनीकरण करताना डॉक्टरांना केवळ अर्ज करून चालणार नाही. त्यांना गेल्या ५ वर्षांत त्यांनी वैद्यकीय परिषदा, कार्यशाळा आणि नवीन संशोधनांमध्ये घेतलेल्या सहभागाचे क्रेडिट्स सादर करावे लागतील. (One Nation One Licence for doctors)
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर