मुंबई (Marathi Movie Manjar) - चार मित्र, त्यांचं बिनधास्त जगणं आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या भन्नाट गोष्टी… ‘मांजर’च्या पोस्टरने काही दिवसांपूर्वी हे विश्व प्रेक्षकांसमोर आणताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता ‘मांजर’चा टीझर प्रदर्शित झाला असून या चित्रपटातील मैत्री, धमाल आणि गोंधळाची झलक पाहायला मिळत आहे.
सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये हे चार मित्र या टीझरच्या केंद्रस्थानी आहेत. तिघांचं आयुष्य अगदी मोकळं आणि बिनधास्त सुरू असतानाच त्यांच्या जगात नेमकं काय घडतंय, याची उत्सुकता टीझर निर्माण करतो. चौघांचे स्वभाव, स्टाईल वेगळी आहे; पण एकत्र आल्यावर त्यांच्या आयुष्यात सुरू होणारी धमाल मात्र एकच! त्यांचे संवाद, त्यांचं वागणं आणि वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये त्यांची होणारी धावपळ पाहाताना हा गोंधळ नेमका कुठे जाऊन पोहोचणार, अशी उत्सुकता निर्माण होते.
या चार मित्रांच्या विश्वात भाग्यश्री लिमये ही चित्रपटाची नायिका म्हणून दिसतेय. त्यातच सयाजी शिंदे यांची भूमिका विशेष लक्ष वेधून घेते. या व्यतिरिक्त यात अंशुमन विचारे, वैष्णवी अंधाडे आणि अश्विनी काळसेकर यांचीही झलक दिसतेय. एकंदरच, या चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी असून ‘मांजर’ हा एक मल्टिस्टारर चित्रपट ठरणार आहे. त्यामुळे या कलाकारांच्या भन्नाट अभिनयातून प्रेक्षकांना मनोरंजनाची एक वेगळी आणि धमाल मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.
एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या वितरणाची धुरा एए फिल्म्सने सांभाळली आहे. येत्या १८ सप्टेंबर २०२६ रोजी ‘मांजर’ चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.Marathi Movie