विशाळगडानंतर दुर्मीळ ‘शिवराय कंदीलपुष्पा’ची उदगिरीतून नोंद

    20-Aug-2026

Ceropegia shivrayiana


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नामकरण करण्यात आलेल्या ‘शिवराय कंदीलपुष्पा’ची (Ceropegia shivrayiana) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात प्रथमच नोंद झाली आहे (Ceropegia shivrayiana). आतापर्यंत ही वनस्पती केवळ विशाळगड परिसरातून नोंदवली गेली होती. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील उदगिरी वनपरिक्षेत्रात सर्वेक्षणादरम्यान राधानगरी वन्यजीव अभयारण्याचे निसर्ग शिक्षण अधिकारी आकाश राऊत यांना ही वनस्पती आढळून आली (Ceropegia shivrayiana). त्यामुळे या दुर्मीळ आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतीच्या अधिवासाबाबत महत्त्वाची नवी नोंद झाली आहे. (Ceropegia shivrayiana)
 

 

महाराष्ट्रात कंदीलपुष्पाच्या तब्बल २९ प्रजाती आढळतात. त्यापैकी २० प्रजाती प्रदेशनिष्ठ असून, त्यांचे नैसर्गिक अस्तित्व जगात केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे. जगातील सेरोपेजिया प्रजातींच्या प्रदेशनिष्ठतेच्या दृष्टीने महाराष्ट्राला महत्त्वाचे स्थान आहे. कंदीलपुष्प यांच्या फुलांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते. तळाशी फुगीर लंबगोल भाग, त्यावर अरुंद आणि उंच नळी, उष्ण हवा बाहेर जाण्यासाठी असलेल्या खिडक्यांसारख्या रचना आणि सर्वात वर नक्षीदार कळस अशी या फुलांची रचना दिसते. कंदीलपुष्प ही रुईच्या कुळातील वनस्पती आहे. स्थानिक बोलीभाषेत तिला खरचुडी, खरपुडी, खरचुला किंवा खातुंडी अशी विविध नावे आहेत. फुलांचा आकार मारुतीच्या गदेसारखा वाटत असल्याने काही भागांत तिला ‘हनुमान बटाटा’ असेही म्हटले जाते. कंदीलपुष्पांच्या बहुतांश प्रजातींचे अस्तित्व विशिष्ट भौगोलिक परिसरापुरतेच मर्यादित असल्याने त्यांच्या अधिवासाचे संवर्धन महत्त्वाचे मानले जाते.

 

याच समूहातील Ceropegia shivrayiana या प्रजातीचा शोध वनस्पती संशोधकांनी २०२४ मध्ये लावला. विशाळगड आणि माचाळच्या खोऱ्यात तिची नोंद करण्यात आली होती. आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील उदगिरी परिसरात तिची नोंद झाल्याने या प्रजातीचे ज्ञात वितरणक्षेत्र वाढले आहे. विशेष म्हणजे, उदगिरीत आढळलेल्या वनस्पतीची फुले पूर्णपणे पांढरी दिसून आली आहेत. विशाळगड-माचाळ परिसरातील फुलांवर मात्र गुलाबी रंगाची झाक आढळते. ‘शिवराय कंदीलपुष्प’ ही वेलवर्गीय वनस्पती असून ती वेटोळे घेत वाढते. तिचा जमिनीखाली कंदयुक्त मुळभाग असतो. पाने हृदयाकृती असून त्यांचे टोक टोकदार असते. या वनस्पतीचे सर्वाधिक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे तिची फुले. एका पुष्पबंधात साधारण तीन ते आठ फुले असतात. फुले सुमारे १.५ ते २.५ सेंटीमीटर लांबीची असून त्यांचा रंग करड्या-पांढऱ्या रंगाचा असतो. फुलाची नलिका तळाशी फुगीर असून तिच्या आतील खालच्या भागात गडद जांभळा, तर वरच्या भागात पांढरा रंग दिसतो. या वनस्पतीचा फुलण्याचा कालावधी साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर असा आहे. खडकाळ उतार हा तिचा प्रमुख अधिवास असल्याचे दिसून येते.

 

या वनस्पतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यामागे त्यांच्या गड-किल्ले आणि वनसंवर्धनाच्या दृष्टीकोनाची सांगड घालण्यात आली आहे. स्वराज्याच्या रक्षणात गडांचे आणि त्यांच्या सभोवतालच्या जंगलांचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. गडांच्या परिसरातील वनसंपदेचे संरक्षण करण्याबाबतही त्यांच्या आज्ञापत्रात स्पष्ट निर्देश आढळतात. ‘गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी, त्यामध्ये एक काठी तेही तोडू न द्यावी’ या निर्देशातून वनसंपदेच्या संरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट होते. विशाळगडानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झालेली ही नवी नोंद केवळ एका वनस्पतीच्या वितरणक्षेत्रात झालेली भर नाही, तर सह्याद्रीच्या खडकाळ अधिवासांमध्ये अजूनही दडलेल्या जैवविविधतेची महत्त्वपूर्ण झलक आहे. अत्यंत मर्यादित अधिवासात आढळणाऱ्या अशा प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या नोंदी, त्यांच्या अधिवासाचा अभ्यास आणि संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.





संबंधित मजकूर