॥सौंदर्यलहरी भाष्य भाग ३५॥

    20-Aug-2026

Saundaryalahari Bhashya 

त्रयाणां देवानां त्रिगुण-जनितानां तव शिवे
भवेत् पूजा पूजा तव चरणयो-र्या विरचिता|
तथा हि त्वत्पादोद्वहन-मणिपीठस्य निकटे
स्थिता ह्येते-शश्वन्मुकुलित करोत्तंस-मुकुटाः॥२५॥

अन्वय : हे शिवे! त्रिगुणजनितानां त्रयाणां देवानां या पूजा विरचिता भवेत्, सा तव चरणयोः पूजा भवेत्| तथा हि एते तव पादोद्वहन-मणिपीठस्य निकटे शश्वत् मुकुलित-करोत्तंस-मकुटाः स्थिताः|
 
शब्दार्थ : सौंदर्यलहरीमधील हा श्लोक तात्त्विकदृष्ट्या संभ्रमित करणारा वाटू शकतो किंवा पारंपरिकदृष्ट्या आपली जी दृष्टी विकसित झालेली आहे, तिला धक्का देणाराही आहे. परंतु, मागील श्लोक निरूपण आत्मसात केल्यास, हा श्लोक आत्मसात करणे सोपे आहे. ब्रह्मदेव हा सृजन कार्य करतो, विष्णु पालन करतो आणि रुद्र/शिव हा संहार, अर्थात लय करतो. हे तिन्ही देव म्हणूनच आपल्याला ज्ञात आहेत; परंतु वास्तवात हे तिघेही ब्रह्माचे अंश असून ते उत्पत्ति स्थिती आणि लय हे कार्य पूर्णत्वाला नेतात. हे तिन्ही देव अनुक्रमे त्रिगुणातून प्रकट झाले आहेत, असा एक अद्भुत आणि श्री विद्येतील अत्यंत महत्त्वाचा सिद्धान्त या ठिकाणी आदि शंकराचार्य मांडत आहेत.
 
ब्रह्मदेवाची उत्पत्ति ही परम तमो गुणातून झालेली आहे. सृजन हे तमोगुणाशिवाय असाध्य आहे. विष्णु हे पालनकर्ते ईश्वरी तत्त्व हे परम राजसी आहे आणि संहार तत्त्वाचा स्वामी असणारा रुद्र/शिव/शंकर हा परम सात्त्विक आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत्|’ म्हणजे संपूर्ण विश्व या त्रिगुणात्मक प्रकृतीमध्येच कार्यरत आहे. त्रिमूर्ती स्वतः प्रकृतीच्या कार्यासाठी प्रकट झालेली दैवी तत्त्वे आहेत; ते तिघेही प्रकृतीच्या पलीकडील परमतत्त्व नाहीत. त्रिगुणात्मक त्रिमूर्ति वास्तवात श्रीदेवी अर्थात मूलप्रकृती, महामाया, चिद्रूपिणी, पराशक्ती अशा नामांनी जिचा गौरव होतो, त्या श्री ललिता त्रिपुरसुंदरीनेच प्रकट केल्या असून या त्रिमूर्तींचे कार्य हे श्री ललिताम्बिकेचीच एक लीला आहे.
 
ललिता सहस्रनामात देवीच्या ‘शिवशक्त्यैयरूपिणी’ या एका नामातच, संपूर्ण अद्वैत सिद्धांताचे तत्त्वज्ञान दडलेले आहे. शिव आणि शक्ती ही दोन स्वतंत्र तत्त्वे नसून, एकाच परब्रह्माच्या दोन अनुभूती आहेत. जसे अग्नी आणि त्याची उष्णता वेगळे करता येत नाहीत, सूर्य आणि त्याचा प्रकाश वेगळा करता येत नाही, तसेच शिव आणि शक्ती यांचे विभाजन अशक्य आहे. म्हणूनच, शंकराचार्य येथे देवीला ‘शिवे’ असे संबोधतात. ती शिवाची पत्नी म्हणून नव्हे, तर शिवस्वरूपच आहे म्हणून असा उल्लेख आहे. याच शिवशक्तीच्या ऐक्य रूपाचा पुढील विस्तार म्हणजे ही त्रिमूर्ति आहे.
 
केनोपनिषदात ही संकल्पना खूप छान उलगडून सांगितली आहे. देवांना असुरांवर विजय मिळाल्यानंतर अहंकार झाला. तेव्हा एक अद्भुत यक्ष प्रकट झाला. त्याने आव्हान दिल्यावर अग्नीला एक काडी जाळता आली नाही, वायूला ती हलवता आली नाही, समस्त पंचमहाभूते त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देऊ शकली नाहीत. शेवटी इंद्राला उमा हैमवती देवी प्रकट झाली आणि तिने सांगितले की, ज्याच्या शक्तीने तुम्ही विजय मिळविला, ते परमब्रह्म होते. हे ब्रह्मज्ञान देवांना शक्ती प्रदान करते आणि त्यांना जाणीव करून देते की, देवांचे सामर्थ्य त्यांचे स्वतःचे नसून पराशक्तीचे आहे. ‘सौन्दर्यलहरी’तील हा श्लोकच याच उपनिषदातील प्रसंगाचे काव्यमय रूप आहे.
 
त्वत्पादोद्वहन-मणिपीठ ही संकल्पना अत्यंत गूढ आहे. सामान्य साधकाला हा उल्लेख देवीच्या सिंहासनातील पादपीठ वर्णन वाटते. परंतु श्रीविद्येतील साधकाला याचे गुह्यतम रहस्य ज्ञात असते. श्रीचक्रातील अर्थात श्रीयंत्र संरचनेतील जे नऊ परस्पर छेदणारे त्रिकोण आहेत, यातील केंद्रस्थ त्रिकोण अर्थात सर्वसिद्धीचक्राच्या मध्यभागी असणारा जो बिंदू आहे, त्याचा उल्लेख मणिपीठ असा केला आहे. श्रीचक्रातील नऊ आवरणे पार करून साधक जेव्हा बिंदूपर्यंत पोहोचतो, तेव्हा बिंदूस्थानी ब्रह्मा, विष्णू, रुद्र, ईश्वर आणि सदाशिव ही पंचब्रह्म तत्त्वेही लय पावतात. तेथे सदाशिवतत्त्व सुप्त स्वरूप असते आणि त्यावर आरुढ असलेले महात्रिपुरसुंदरीचे अखंड चैतन्य हेच या बिंदूचे स्वरूप आहे. देवीच्या या शिवशक्त्यैयस्वरूपाचे चिंतन करणारा साधक परमानंदात अक्षरशः डुंबत असतो.
 
ललिता सहस्रनामात देवीला ‘पञ्चब्रह्मस्वरूपिणी’ आणि ‘पञ्चप्रेतासनासीना’ असे म्हटले आहे. या नामांचा अर्थसुद्धा अनेकदा चुकीचाच घेतला जातो. प्रेत म्हणजे मृतदेह. शक्तीशिवाय ब्रह्मा, विष्णू, रुद्र, ईश्वर आणि सदाशिव ही पंचब्रह्म तत्त्वे कार्य करू शकत नाहीत. शक्ती नसेल, तर ती केवळ निष्क्रिय तत्त्वे आहेत. म्हणून त्यांना ‘प्रेत’ असे संबोधले आहे. हा अपमान नसून, शक्तीचे अनिवार्यत्व दर्शविणारा अत्यंत गहन तात्त्विक संकेत आहे. शक्ती अर्थात ऊर्जा हे जगतातील प्रत्येक चर आणि अचर घटकाला व्यापून असणारे परम तत्त्व आहे आणि ते सूक्ष्म रूपाने, या जगताचे संचालन करत आहे. शक्ती तत्त्वाच्या प्रेरणेशिवाय त्रिमूर्तीसुद्धा निष्क्रिय आहेत, असेच या श्लोकातून आचार्य सांगत आहेत.
 
‘मुकुलित करोत्तंस मुकुटाः’ ही एक अत्यंत अनुपम कल्पना आहे. या विवेचनाचा अर्थ देवांचे हात जोडलेले आहेत आणि त्यांनी मुकुट धारण केलेला आहे, ते देवीच्या चरणी विनम्र होऊन आपले मुकुटासह मस्तक टेकवत आहेत, त्यामुळे त्यांचे हातच नव्हे, तर त्यांच्या मुकुटांनीही देवीच्या चरणांना स्पर्श केला आहे. मुकुट म्हणजे सत्ता, ज्ञान, ऐश्वर्य, अधिकार आणि अभिमान यांचे प्रतीक. शंकराचार्य सांगतात की, परब्रह्माच्या सान्निध्यात सत्ता आणि ज्ञानालाही नतमस्तक व्हावे लागते. तेथे अहंकाराचा अंशही टिकत नाही.
 
अद्वैत वेदांतात ब्रह्माला निर्गुण, निराकार, निर्विशेष म्हटले जाते. मग श्रीविद्येत देवीचे रूप, अलंकार, सिंहासन, श्रीचक्र यांचे वर्णन याचसाठी केले जाते की, सामान्य साधक निर्गुण निराकार अशा ब्रह्मतत्त्वाशी तादात्म्य पावू शकत नाही. निर्गुण ब्रह्माची अनुभूती सर्वसामान्य साधकाला त्वरित होत नाही. म्हणूनच, तेच ब्रह्म करुणेने सगुण रूप धारण करते. ते रूप म्हणजे महात्रिपुरसुंदरी. त्यामुळे श्रीविद्या ही अद्वैताचा विरोध नसून अद्वैताकडे नेणारा सर्वांत सौंदर्यपूर्ण मार्ग आहे.
 
श्रीविद्येत देवीचे चरण महत्त्वाचे मानले जातात. चरण साधकाच्या चित्ताला ब्रह्मचैतन्याशी संलग्न करतात. गुरु चरणांनाही म्हणूनच इतके महत्त्व आहे. मानवी शरीरातील मूलाधारापासून सहस्रारापर्यंत कुंडलिनीचा प्रवास, हा प्रत्यक्षात चरणांपासून शिरापर्यंत जाणारा प्रवास आहे. परंतु, साधक जेव्हा सहस्रारात पोहोचतो, तेव्हा त्याला पुन्हा देवीच्या चरणांमध्येच विश्रांती मिळते. यालाच श्रीविद्या परंपरेत ‘लय’ म्हणतात. प्रवास वर जातो; पण अनुभूती चरणांमध्ये संपते. हा विरोधाभास नसून परिपूर्णतेचा अनुभव आहे.
आपण देवतांमध्ये भेद करतो, हा शैव, हा वैष्णव, हा शाक्त. पण शंकराचार्य म्हणतात की, ज्याच्या चरणांजवळ शिव, विष्णू आणि ब्रह्मा उभे आहेत, तेथे संप्रदायभेदाला स्थानच उरत नाही. तेथे केवळ परम चैतन्यच उरते. जोपर्यंत मनाला स्वतःच्या ज्ञानाचा, भक्तीचा, साधनेचा किंवा सिद्धीचा अभिमान आहे, तोपर्यंत देवीच्या चरणांचे दर्शन होत नाही. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनाही ज्या चरणांपुढे मस्तक झुकवावे लागते, त्या चरणांपर्यंत पोहोचण्यासाठी साधकाने स्वतःचा अहंकार पूर्णपणे विसर्जित करणे आवश्यक आहे. तेव्हाच मी ‘उपासक’ आणि ती ‘उपास्य’ हा भेदही नष्ट होतो.
 
त्रिमूर्तींची पूजा श्रेष्ठ आहे, परंतु त्यांचे मूळ असलेल्या आदिशक्तीची उपासना सर्वश्रेष्ठ आहे. कारण त्या उपासनेत सर्व देवतांचे ऐय आहे. म्हणूनच श्रीविद्या परंपरेत देवीला ‘सर्वदेवमयी’, ‘सर्वमन्त्रस्वरूपिणी’, ‘सर्वयन्त्रात्मिका’ आणि ‘सर्वतन्त्ररूपा’ म्हटले आहे. तिच्या चरणांमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे. त्या चरणांवर मस्तक ठेवणे, म्हणजे विश्वाच्या मूळ चैतन्याशी स्वतःचे अस्तित्व एकरूप करणे होय.
 
सुजीत भोगले
९३७००४३९०१




संबंधित मजकूर