भरकटलेल्या आंदोलनातून राष्ट्रविरोधी कट : श्याम जाजू

    02-Aug-2026   
Shyam Jaju Interview
 
नीट’ पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या ‘सीजेपी’ आंदोलनाने देशभरात मोठी चर्चा घडवून आणली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला, तरी हे आंदोलन यशस्वी झाले नसल्याचे स्पष्ट मत भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी व्यक्त केले. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे वरिष्ठ प्रतिनिधी ओंकार मुळ्ये यांनी ‘सीजेपी’चे आंदोलन आणि जाजू यांच्या ’ठडड १०० : एक सदी संकल्प की’ या नव्याने प्रकाशित झालेल्या पुस्तकाविषयी साधलेला हा विशेष संवाद...
 
व्यक्तीशः किंवा विद्यार्थ्यांशी संवादी राहणारी संघटना म्हणून आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहतो. तेव्हा एक स्वयंसेवक म्हणून आपण या आंदोलनाकडे कसे पाहता?
 
जंतरमंतरवर झालेले ‘सीजेपी’चे आंदोलन त्या ठिकाणी झालेले पहिले आंदोलन नाही. दिल्लीत २६ वर्षे वास्तव्यास असताना आणि त्यांपैकी १८ वर्षे जंतरमंतरपासून चालत जाण्याच्या अंतरावर राहत असल्याने तेथे झालेल्या अनेक आंदोलनांचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. निरनिराळ्या विचारप्रवाहांनी जंतरमंतरचा आंदोलनासाठी वापर केला आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर या ठिकाणाला देशव्यापी ओळख मिळाली आणि त्यानंतर विविध मोठी आंदोलने येथे झाली. ‘सीजेपी’चे आंदोलन मात्र केवळ आंदोलन नसून, एका विशिष्ट परिस्थितीतून निर्माण झालेली प्रतिक्रिया असल्याचे मला वाटते. देशाच्या सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्याचा वेगळ्या अर्थाने प्रचार करण्यात आला आणि त्यातून असंतोषाला दिशा देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला मोठी प्रसिद्धी मिळाली. ज्यांचा मूळ प्रश्नाशी थेट संबंध नव्हता, असे लोकही या आंदोलनाचे चेहरे बनले. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पाठिंबा, प्रसिद्धी आणि आर्थिक मदत मिळाल्याचेही दिसून आले. माझ्या मते, देशातील राष्ट्रवादी शक्तींना विरोध करणार्‍या विविध राजकीय आणि वैचारिक गटांनी या आंदोलनात संधी पाहिली. विविध विरोधी पक्ष, संघटना आणि इतर शक्ती एकत्र आल्यामुळे हे आंदोलन केवळ ‘नीट’ परीक्षेच्या मुद्द्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर त्याला व्यापक राजकीय स्वरूप प्राप्त झाले. ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारांचे समर्थन कोणताही जबाबदार नागरिक करू शकत नाही. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, हीच सर्वांची भूमिका आहे. मात्र, या घटनेचा आधार घेऊन देशभरात ज्या प्रकारचे वातावरण निर्माण करण्यात आले आणि आंदोलनाचे स्वरूप ज्या दिशेने वळले, ते देशहिताच्या दृष्टीने योग्य वाटत नाही.
 
‘नीट’ पेपरफुटीच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर ‘सीजेपी’चे हे आंदोलन यशस्वी झाल्याचे आपण मानता का?
 
मला असे वाटत नाही. सरकारने योग्य वेळी निर्णायक पाऊल उचलून देशभरात वेगाने पसरत असलेले आंदोलन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाचा वापर करून काही राजकीय आणि वैचारिक शक्ती व्यापक असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत होत्या. यापूर्वी, ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) आणि शेतकरी आंदोलनाच्या वेळीही मूळ मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन आंदोलनांना वेगळे राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचे आपण पाहिले आहे. आजच्या २५ ते ३० वर्षे वयोगटांतील अनेक तरुणांनी पूर्वीच्या सरकारांचा कारभार किंवा आणीबाणीचा काळ अनुभवलेला नाही. त्यामुळे त्यांची राजकीय समज प्रामुख्याने गेल्या काही वर्षांच्या घटनांवर आधारित आहे. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे आणि विविध प्रचार मोहिमांमुळे अनेक तरुण भावनिक प्रतिक्रिया देत अशा आंदोलनांमध्ये सहभागी होत असल्याचे दिसते. सरकारने या प्रकरणात केवळ राजीनाम्यावरच थांबून न राहता संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली, अनेकांना निलंबित केले, आरोपींना अटक केली आणि भविष्यात अशाप्रकारच्या पेपरफुटीला आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजनांची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेबाबत शंका घेण्याचे कारण नाही. समाजात विघातक शक्तींना संधी मिळू नये आणि आंदोलनाचा गैरवापर होऊ नये, यासाठी सरकारने योग्य वेळी आवश्यक निर्णय घेतला. चांगल्या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ कठोर भूमिका घेणे नव्हे, तर समाजहित आणि देशहित लक्षात घेऊन योग्य वेळी संतुलित निर्णय घेणे.
 
‘सीजेपी’ आंदोलनात ‘नीट’ पेपरफुटीच्या मुद्द्याबरोबरच संघविरोधी घोषणाही देण्यात आल्या. याकडे आपण कसे पाहता?
 
हे आंदोलन केवळ ‘नीट’ पेपरफुटीपुरते मर्यादित राहिले नाही. जर हा फक्त परीक्षेशी संबंधित विद्यार्थ्यांचा प्रश्न असता, तर आंदोलनात मुख्यतः विद्यार्थीच सहभागी झाले असते. मात्र, विविध राजकीय आणि वैचारिक गटांशी संबंधित व्यक्ती, पूर्वी इतर आंदोलनांमध्ये सक्रिय असलेले चेहरे आणि विविध विरोधी पक्षांचे नेतेही मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले. या आंदोलनादरम्यान झालेल्या काही घोषणा, विविध गटांचा सहभाग, तसेच आंदोलनाला मिळालेली रसद आणि इतर सुविधांमुळे हे आंदोलन मूळ मुद्द्याच्या पलीकडे गेले असल्याची भावना निर्माण झाली. विरोधी पक्षांनीही हा विषय प्रामुख्याने रस्त्यावरच्या आंदोलनातून पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, माझ्या मते हे आंदोलन केवळ पेपरफुटीविरोधातील विद्यार्थी आंदोलन राहिले नाही, तर त्याला व्यापक राजकीय आणि वैचारिक स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व आणि त्यामागील हेतूंबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
 
आंदोलनादरम्यान झालेली दगडफेक आणि त्यानंतरचा पोलिसांचा लाठीचार्ज पाहता, हे केवळ विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण आंदोलन होते, असे तुम्हाला वाटते का?
 
कोणत्याही आंदोलनाच्या नावाखाली कायदा हातात घेणे, पोलिसांवर हल्ला करणे किंवा संविधानिक संस्थांवर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे; पण तो कायद्याच्या चौकटीत राहूनच वापरला गेला पाहिजे. विद्यार्थी परिषदेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून अनेक आंदोलने अनुभवली असल्यामुळे आंदोलनाची पद्धत आणि त्यामागील उद्देश यांचा मला प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यामुळे आंदोलनाचा घोषित अजेंडा आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये विसंगती असेल, तर त्याबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. जर हे आंदोलन केवळ ‘नीट’ पेपरफुटीपुरते मर्यादित असते, तर त्याची दिशा आणि स्वरूप वेगळे दिसले असते. यापूर्वीही विविध राज्यांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, त्यावेळी अशाप्रकारचे व्यापक राजकीय आंदोलन किंवा सरकारच्या राजीनाम्याची मागणी झालेली दिसली नाही. त्यामुळे या आंदोलनामागील उद्दिष्टे आणि त्याच्या राजकीय पार्श्वभूमीबाबत प्रश्न उपस्थित होतात.
 
आजची तरुण पिढी खूप वेगाने बदलणार्‍या जागतिक आणि तांत्रिक वातावरणात मोठी होत आहे. राष्ट्रीयता, सेवाभाव आणि राष्ट्रनिर्मितीचे संस्कार आजच्या ‘जेन-झी’ मध्ये रुजवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे?
 
देशाचे भविष्य मोठ्या प्रमाणावर युवकांच्या जडणघडणीवर, त्यांच्या विचारांवर आणि कृतीवर अवलंबून असते. त्यामुळे तरुण पिढीला देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरा, मूल्यव्यवस्था आणि सामाजिक वारसा यांची योग्य माहिती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. माझ्या मते, या विषयांवर जितकी सखोल चर्चा, चिंतन आणि जनजागृती व्हायला हवी होती, तितकी झालेली नाही. त्यामुळे अनेक तरुणांना आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेची पुरेशी ओळख होत नाही. गेल्या काही वर्षांत या दिशेने प्रयत्न झाले आहेत. ‘मन की बात’, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि इतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, परंपरा आणि राष्ट्रविषयक विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, हे प्रयत्न अधिक व्यापक आणि प्रभावी होण्याची गरज आहे. इलेट्रॉनिक माध्यमे, मुद्रित माध्यमे आणि शिक्षणव्यवस्था यांच्या माध्यमातून या विषयांवर अधिक सखोल आणि सातत्यपूर्ण जनजागृती झाली, तर नव्या पिढीची वैचारिक जडणघडण अधिक सक्षम होईल.
 
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे. अशा परिस्थितीत संघाची पारंपरिक ‘शाखा व्यवस्था’ आणि ‘व्यक्तिमत्त्व निर्माणाची प्रक्रिया’ आजच्या तरुण पिढीला जोडण्यासाठी कशी अनुकूल ठरत आहे?
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती शाखेवर आधारित असली, तरी आज संघाचे कार्य केवळ शाखेपुरते मर्यादित राहिलेले नाही. समाजजीवनातील शिक्षण, सेवा, व्यावसायिक क्षेत्र, युवक, महिला, ग्रामविकास, सामाजिक समरसता, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांमध्ये संघप्रेरित कार्य आणि विविध संघटनांद्वारे व्यापक काम सुरू आहे. काळानुसार बदल स्वीकारत संघाने ‘आयटी’ शाखा, व्यावसायिकांसाठी विशेष उपक्रम आणि विविध मंचांच्या माध्यमातून अशा व्यक्तींनाही जोडण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांना नियमित शाखेत सहभागी होणे शय नसते. संघाने सनातन परंपरा, सांस्कृतिक वारसा, तीर्थक्षेत्रे आणि राष्ट्रीय जीवनाशी संबंधित विविध विषयांवर सातत्याने चिंतन करून समाजाला त्यामध्ये सहभागी करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यामुळे संघ म्हणजे केवळ शाखा नसून, राष्ट्रजीवनाच्या विविध अंगांचा दीर्घकालीन विचार करणारी एक व्यापक संघटनात्मक चळवळ आहे.
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अनेक पुस्तके प्रकाशित होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मीही संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासातील काही महत्त्वपूर्ण आणि कमी परिचित घटनांवर आधारित पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ पत्रकार रामबहादूर राय यांच्या उपस्थितीत झाले. या पुस्तकाद्वारे संघाच्या कार्याचा इतिहास आणि त्यातील महत्त्वपूर्ण घटनांची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
‘सीजेपी’ आंदोलनात मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग दिसला. या पार्श्वभूमीवर पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे?
 
तरुणाईचे वैशिष्ट्य म्हणजे, ती केवळ विचार करत नाही, तर त्या विचारांवर त्वरित कृती करण्यासही तयार असते. जोखीम स्वीकारण्याची तयारी, जलद निर्णयक्षमता आणि उत्साह यामुळे तरुण मोठ्या प्रमाणात आंदोलनांमध्ये सहभागी होतात. मात्र, कालांतराने अनेकदा ते त्या घटनांकडे अधिक परिपक्वपणे पाहू लागतात. त्यामुळे अशा काळात युवकांना सकारात्मक, विधायक आणि राष्ट्रहिताच्या दिशेने मार्गदर्शन करणार्‍या सामाजिक व वैचारिक शक्तींची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. पालकांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. पूर्वीच्या पिढीमध्ये पालक किंवा शिक्षकांचे मार्गदर्शन प्रश्न न विचारता स्वीकारण्याची प्रवृत्ती होती. आजची पिढी मात्र प्रत्येक गोष्टीमागचे कारण जाणून घेऊ इच्छिते. त्यामुळे केवळ आदेश देऊन चालत नाही; संवाद, विश्वास आणि तर्कसंगत चर्चा आवश्यक आहे. याच कारणामुळे कुटुंबातील संवाद, संस्कार आणि परस्पर विश्वास अधिक मजबूत करण्याची गरज आहे. पालक आणि तरुण यांच्यातील संवादातील दरी कमी झाली, तर युवकांना योग्य दिशा देणे अधिक सोपे होईल. भारतीय कुटुंबव्यवस्थेचे हेच वैशिष्ट्य जपणे आणि अधिक बळकट करणे आजच्या काळाची गरज आहे.
 
संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर आधीच अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. अशा वेळी ‘ठडड १०० : एक सदी संकल्प की’ हे पुस्तक लिहिण्यामागची मुख्य प्रेरणा काय होती? हे पुस्तक इतर ग्रंथांपेक्षा कसे वेगळे आहे?
 
पुस्तकाच्या शीर्षकातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या पर्वाची संकल्पना आहे. संघाला त्याच्या मूळ विचारांसह नव्या पिढीसमोर समकालीन संदर्भात मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. आजच्या तरुण पिढीला संघाच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटना, त्याग आणि योगदानाची पुरेशी माहिती नाही. आणीबाणीच्या काळातील संघर्ष, संघ कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय, तसेच स्वातंत्र्योत्तर भारताच्या विविध टप्प्यांवरील संघाची भूमिका नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. संघाची पारंपरिक भूमिका प्रसिद्धीपासून दूर राहून कार्य करण्याची होती. मात्र, बदलत्या काळात समाजापर्यंत सत्य माहिती पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमे आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याची गरज संघानेही स्वीकारली आहे. त्यामुळे संघाचे कार्य, विचार आणि योगदान अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पुस्तकात स्वातंत्र्यलढा, जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत स्वयंसेवकांचे योगदान, आणीबाणीतील लोकशाही रक्षणासाठीचा संघर्ष, तसेच जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातील संघाची भूमिका, अशा अनेक ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे. या घटनांमधून राष्ट्रजीवनातील विविध टप्प्यांवर संघाने निभावलेल्या भूमिकेची नोंद घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संघाचे मूलभूत कार्य व्यक्तिनिर्माणाचे आहे. शाखा आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून देशभक्ती, शिस्त, सेवाभाव आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे संस्कार घडवले जातात. नैसर्गिक आपत्ती, महामारी किंवा कोणतेही राष्ट्रीय संकट उद्भवल्यास स्वयंसेवक सर्वप्रथम मदतीसाठी पुढे येतात. अशा स्वयंसेवकांची जडणघडण ही दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण संस्कार प्रक्रियेचा परिणाम आहे. संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्याचा इतिहास, कार्यपद्धती आणि राष्ट्रनिर्माणातील योगदान वस्तुनिष्ठपणे समाजासमोर मांडणे आवश्यक आहे. याच उद्देशाने हे पुस्तक लिहिण्यात आले असून, नव्या पिढीने संघाचा इतिहास आणि त्याच्या कार्याचा अभ्यास करावा, हा त्यामागील प्रमुख हेतू आहे.




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर