सारनाथ : ज्ञान, करूणा, शांतीचा जागतिक वारसा

    02-Aug-2026

Sarnath UNESCO World Heritage Site
 
नुकतेच सारनाथ हे भारतामधील ४५वे जागतिक वारसा स्थळ ठरले आणि जागतिक वारसा स्थळांच्या संख्येनुसार भारत जागतिक स्तरावर सहाव्या क्रमांकावर, तर आशिया-प्रशांत क्षेत्रामध्ये दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. सारनाथला ‘युनेस्को’तर्फे जागतिक मानांकन प्राप्त होणे, हे बौद्ध धर्माची जन्मभूमी असलेल्या भारतासाठी केवळ सांस्कृतिकच नाही, तर भू-राजकीय दृष्टीनेसुद्धा फार मोठे यश आहे. त्यानिमित्ताने सारनाथचा संक्षिप्त इतिहास, विविध स्तुपांचे स्थापत्य आणि भारताच्या सांस्कृतिक मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
चीन भारताच्या लुंबिनीमधला शाय राजपुत्र सिद्धार्थ गौतम, मानवी जीवनासंबंधी अनेक प्रश्न मनात घेऊन त्यांची उत्तरे शोधण्यासाठी संसाराचा त्याग करून निघाला आणि कठोर तपश्चर्येने ‘बोधी’ प्राप्त करून घेऊन शायमुनी ‘गौतम बुद्ध’ झाला. त्या बोधीतून गौतम बुद्धांनी समाजाला सम्यक जीवनविचार, अर्थात, ‘धम्म’ दिला. केवळ भारतातल्याच नाही, तर जगभरातल्या करोडो लोकांनी तो ‘धम्म’ स्वीकारला. जिथे गौतम बुद्धांनी पहिल्यांदा प्रवचन देऊन आपल्या प्रथम पाच शिष्यांना धम्मविचार प्रदान केला, धर्माला गतिमान केले, धर्मचक्र प्रवर्तन केले आणि बौद्ध भिक्खू संघाचा औपचारिक आरंभ केला, ते उत्तर प्रदेशातले सारनाथचे पवित्र स्थळ आज समस्त जगताने आपला वारसा म्हणून स्वीकारले आणि गौतम बुद्धांनी इसवी सन पूर्व सहाव्या शतकात गतिमान केलेला धर्म आज २१व्या शतकातही जागतिक स्तरावर महत्त्वाचा आहे, हे सिद्ध झाले.
 
बौद्ध धर्माची शिकवण अभ्यासण्यासाठी भारतात आलेल्या ह्येन त्सांग या चिनी प्रवाशाच्या प्रवासवर्णनांमध्ये सारनाथचे वर्णन आहे. १८३४ साली ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे’चे पहिले अध्यक्ष अलेझांडर कनिंगहॅम यांनी ह्येन त्सांगनी केलेल्या वर्णनांनुसार स्थळांचा शोध घेत उत्खननांना सुरुवात केली. त्यादरम्यान सारनाथमध्ये केलेल्या उत्खननात बौद्ध धर्माशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या वास्तूंची ओळख जगाला झाली. येथील उत्खननात आढळलेल्या विविध पुरावस्तू ‘सारनाथ संग्रहालया’मध्ये प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
 
वाराणसीपासून दहा किलोमीटरवर असलेल्या सारनाथ परिसरामध्ये विविध बौद्ध भिक्खूंच्या स्मरणार्थ स्थापित अनेक छोटे-मोठे स्तूप आहेत. त्यातल्या धामेख स्तूप, धर्मराजिक स्तूप, मूलगंधकुटी विहार आणि चौखंडी स्तूप या वास्तूंना आता जागतिक वारशाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
 
धामेख स्तूप : याच ठिकाणी गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना प्रथम प्रवचन देत ‘आर्य अष्टांगमार्ग’ संकल्पना सांगितली होती. या स्तूपाचे ‘धामेख’ हे नाव ‘धर्मोपदेशक’ या शब्दावरून आले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. या विशाल स्तूपाचा आकार अन्य स्तूपांसारखा घुमटाकार नसून, दंडगोलाकार आहे. स्तूपाचा व्यास सुमारे ९३ फूट आणि उंची सुमारे १४३ फूट इतकी आहे. स्तूपावर साधारण ११ मीटरपर्यंत सुंदर शिलापट्ट आढळतात. त्यावर फुलापानांची आणि शुभचिन्हांची नक्षी दिसून येते. अशा प्रकारची सजावट हे गुप्तकाळाचे वैशिष्ट्य होते. सम्राट अशोकाच्या काळात इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात या स्तूपाच्या निर्मितीला सुरुवात झाली. कुषाणकाळात स्तूपाचा विस्तार करण्यात आला आणि गुप्तकाळात स्तूपाला पूर्ण स्वरूप प्राप्त झाले.
 
धर्मराजिका स्तूप : याही स्तूपाची निर्मिती सम्राट अशोकाच्या काळात झाली. स्तूपासाठी परिक्रमा मार्गही घडवण्यात आला होता. १८व्या शतकात काशीमधल्या अन्य बांधकामासाठी या स्तूपाच्या विटा काढल्यामुळे आज हा स्तूप पूर्ण रूपामध्ये अस्तित्वात नाही. त्याच्या तळाचा घेरच फक्त बघायला मिळतो.
 
२०व्या शतकात इथे झालेल्या उत्खननामध्ये धर्मचक्र प्रवर्तनमुद्रेमधली बुद्धांची मूर्ती मिळाली.
 
चौखंडी स्तूप : गौतम बुद्ध आपल्या कौंडिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजी आणि महानाम या प्रथम पाच शिष्यांना जिथे भेटले, त्याजागी हा स्तूप उभारण्यात आला आहे. सम्राट अशोकाच्या काळात प्राथमिक स्वरूपात असलेल्या या स्तूपाला गुप्तकाळामध्ये भव्य रूप देण्यात आले. एका विशाल चौकोनी चौथर्‍यावर स्थापित असलेल्या या स्तूपाची उंची सुमारे १२ मीटर आहे. माती आणि विटांनी बांधण्यात आलेल्या या स्तूपावरचा अष्टकोनी मनोरा हे या स्तूप स्थापत्याचे वैशिष्ट्य आहे. १६व्या शतकात मुघल शासक अकबराच्या काळात हा मनोरा बांधण्यात आला. अकबराने त्याचे पिता हुमायूच्या सारनाथ यात्रेच्या स्मरणार्थ हा मनोरा घडवला होता. त्यामुळे या वास्तूमध्ये बौद्ध आणि मुघल स्थापत्याचा सुंदर संगम दिसून येतो. पायर्‍यांची रचना असलेल्या चार बाजूंमुळे याला ‘चौखंडी’ हे नाव मिळाले असावे. स्तूपाच्या भिंतींवर सुंदर शिल्पकाम होते; पण आता ते पुसट झाल्याचे दिसते.
 
मूलगंधकुटी विहार : बौद्ध धर्मातील नियमांनुसार भिक्खूंना एका गावात तीन दिवसांहून अधिक काळ निवास करण्यास मनाई होती. पण, पावसाळ्याच्या चार महिन्यांदरम्यान ते बहुतांशी पहाडांमध्ये खोदलेल्या विहारांमध्ये निवास करत. त्यांना ‘वर्षावास’ म्हटले जात असे. गौतम बुद्धांनी प्रथम वर्षावास केला, तो विहार म्हणजे ‘मूलगंधकुटी.’ बुद्धांच्या इथल्या वास्तव्याच्या स्मरणार्थ गुप्तकाळामध्ये या वास्तूची निर्मिती झाली. बुद्धांच्या पावन वास्तव्याने सुगंधित म्हणून या विहाराला ‘मूलगंधकुटी’ म्हटले गेले. इथे गुप्तकालीन वास्तुसौंदर्याची झलक पाहायला मिळते. इथली सुंदर भित्तिचित्रे जपानी चित्रकार कोसेत्सु नोसू यांनी चितारली आहेत, तर दारावरची तांब्याची मोठी घंटा जपानच्या राजपरिवाराकडून भेट मिळाली आहे. विहारामध्ये बुद्धांची ‘धर्मचक्र प्रवर्तन’ मुद्रेतली पूर्णाकृती सुवर्ण प्रतिमा आहे.इथले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, इथला बोधीवृक्ष. गया शहरामध्ये ज्या पिंपळ वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमांना ‘बोधी’ प्राप्त झाली, तो वृक्ष ‘बोधीवृक्ष’ म्हणून पावन झाला. कालांतराने सम्राट अशोकाने बौद्ध धर्मप्रसारासाठी त्याच बोधीवृक्षाची एक फांदी श्रीलंकेतील अनुराधापूरमध्ये पाठवली होती. आता अनुराधापूरच्या बोधीवृक्षाची फांदी मूलगंधकुटी विहारात रुजवली आहे.
 
अशोकस्तंभ : सारनाथ येथील अशोकस्तंभ त्यावरील प्रतीकात्मक शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. एकाच पाषाणखंडातून घडवलेल्या गुळगुळीत स्तंभावर ‘ब्राह्मी’ लिपीमध्ये लेख कोरलेला आहे. स्तंभाच्या वर एका अधोमुखी कमळावर चौकोनी पीठ आहे. पीठाच्या चारही बाजूंवर मधे चक्र आणि त्याच्या दोन्ही बाजूंना हत्ती, घोडा, बैल आणि सिंह या प्राण्यांचे अंकन आहे. त्यावर चार दिशांना तोंड करून पाठीला पाठ लावून बसलेले चार सिंह आहेत. त्या सिंहांच्या वर असलेले चक्र आता पूर्ण रूपात उपलब्ध नाही. गतिमानता, शौर्य, स्थिरता, ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या या अशोकस्तंभाचे सिंहशीर्ष, दि. २६ जानेवारी १९५० रोजी या भारताचे राष्ट्रीय प्रतीक म्हणून स्वीकारण्यात आले, तर अशोकचक्राला भारताच्या राष्ट्रध्वजावर स्थान प्राप्त झाले.
 
हूण, गजनीचा मोहम्मद इत्यादी आक्रमणकर्ते सारनाथचा विध्वंस करत राहिले आणि कुषाण, गुप्त, वर्धन, पाल, गढवाल हे राजे पुन्हापुन्हा त्या स्थळांचे निर्माण करत आपला प्राचीन वारसा जपत राहिले. आधुनिक काळातही सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा हा अमूल्य सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी अनेक इतिहासकारांनी, पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी आणि राजकीय नेत्यांनी योगदान दिले.
गौतम बुद्ध ही जगभरातली भारताची एक प्रमुख ओळख आहे. ती ओळख जपण्यासाठी भारतातून सातत्याने प्रयत्न होत आहेत.स्वातंत्र्योत्तर काळात ‘महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी गौतम बुद्धांचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. बुद्धशिष्य सरीपुत्त यांचे अवशेष जपण्यासाठी भारत सरकारने म्यानमारला साहाय्य उपलब्ध करून दिले. २०२३ साली दिल्लीमध्ये पहिल्यांदाच जागतिक बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘सद्यस्थितीतील जागतिक आव्हाने आणि बौद्ध तत्त्वज्ञानानुसार उपाय’ हा त्या परिषदेचा प्रमुख विषय होता. काही महिन्यांपूर्वी भारताने हाँगकाँगमध्ये आयोजित लिलावामधून बुद्धांचे ‘पिप्रवाहा’ अवशेष सन्मानपूर्वक भारतात परत आणले. या पार्श्वभूमीवर सारनाथला मिळालेले जागतिक मानांकन विशेष महत्त्वाचे ठरते.
 
‘युनेस्को’मध्ये सूचीबद्ध होण्याचे महत्त्व
 
ज्यांची सांस्कृतिक, नैसर्गिक मूल्य संपूर्ण मानवजातीसाठी महत्त्वाची ठरतात, अशाच स्थळांना ‘युनेस्को’तर्फे जागतिक दर्जा प्रदान करण्यात येतो. ‘युनेस्को’ निवड समितीचे अभ्यासक संबंधित स्थळांना भेट देऊन समितीच्या निकषांनुसार त्या स्थळाचे महत्त्व, इतिहास आणि सुरक्षितता समजून घेतात. ‘युनेस्को’ मानांकन प्राप्त झाल्यावर संबंधित स्थळाला जागतिक ओळख तर प्राप्त होतेच; पण त्याच्या संरक्षणासाठी आणि देखभालीसाठी जागतिक स्तरावरून साहाय्यही प्राप्त होते.
 
१९९८ साली पहिल्यांदा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य सूचीमध्ये सारनाथचा समावेश करण्यात आला. २०२५ मध्ये भारतातर्फे सारनाथचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, स्थापत्यविषयक आणि धार्मिक महत्त्व स्पष्ट करणार्‍या तपशिलांसह अंतिम अहवाल सादर करण्यात आला आणि दि. २५ जुलै, २०२६ रोजी दक्षिण कोरियाच्या बुसानमध्ये आयोजित ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा समितीच्या ४८व्या सत्रामध्ये भारतातील सारनाथ प्राचीन बौद्धस्थळ ‘युनेस्को’ जागतिक वारसा स्थळांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणी ‘युनेस्को’ निवड समितीप्रति आभार व्यक्त करताना भारतीय राजदूत विशाल शर्मा यांनी ‘बुद्धं शरणं गच्छामि’ या ‘बुद्ध, धम्म, संघ’ या त्रिरत्नांचे महत्त्व सांगणार्‍या मंत्रातील पहिल्या चरणाचा उच्चार केला. दरवर्षी आषाढ पौर्णिमेच्या दिवशी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिवस’ सोहळा साजरा करण्यात येतो. या सोहळ्याच्या काहीच दिवस आधी ही आनंदाची वार्ता प्राप्त झाली.
 
बौद्धधर्म प्रचार-प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने अनेक स्तूप निर्माण केले, श्रीलंकेसह भारताबाहेरच्या अनेक प्रदेशांमध्ये आपले दूत पाठवले. त्यानंतर रेशीममार्गांवरून व्यापार्‍यांसह प्रवास करणार्‍या बौद्ध भिक्खूंद्वारे बौद्धधर्म प्रसार होत राहिला आणि बुद्ध तत्त्वज्ञानाच्या सांस्कृतिक धाग्याने भारत, प्रामुख्याने आग्नेय आशियाशी जोडला गेला. आज भूतान, श्रीलंका, म्यानमार, कंबोडिया या अधिकृत बौद्ध देशांसह थायलंड, लाओस, चीन, जपान, मंगोलिया, व्हिएतनाम, सिंगापूर, उत्तर-दक्षिण कोरिया, तैवान या देशांमध्ये बौद्ध धर्मियांची संख्या लक्षणीय आहे.
 
फाह्यान आणि ह्येन त्सांगपासून गेली अनेक शतके जगभरातले अनेक बौद्धधर्मीय, बौद्धधर्म अभ्यासक भारतात आणि विशेषत: सारनाथला भेट देण्यासाठी येत असतात. आता त्यांच्या संख्येत वाढ होईल. समान विचार, समान भाव असलेले देश एकत्रित येतील. भारताचे आग्नेय आशियाशी असलेले संबंध आणखी दृढ होतील. अर्थातच, सारनाथला मिळालेला जागतिक दर्जा, वारसा आणि विकास साधत भारताच्या सांस्कृतिक मुत्सद्देगिरीसाठीही अतिशय महत्त्वाचा आहे.
 
भारताने जगाला ‘युद्ध’ नाही, तर ‘बुद्ध’ दिला आहे आणि आज जागतिक अस्थिर वातावरणामध्ये सारनाथचा महाकाय ‘धामेख स्तूप’ जगाला ज्ञान, करुणा आणि शांततेचा संदेश देणारा दीपस्तंभ ठरला आहे.
 
- इंद्रायणी चव्हाण
(लेखिका भारतीय विद्या पारंगत असून, अनुवादिकाही आहेत.)




संबंधित मजकूर