नवी दिल्ली : (Drug Free Youth For Developed India Campaign) शत्रू देश तरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनात अडकवण्याचा कट रचतात. अमली पदार्थांच्या पुरवठ्यातून पैसा कमावणे आणि देशाला कमकुवत करणे हा या दहशतवादी कटांचाच एक भाग आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणाला व्यसनाच्या विळख्यात पडण्यापासून वाचवणे महत्त्वाचे आहे. या मोहिमेला एक जनआंदोलन बनवावे आणि अमली पदार्थमुक्त भारतासाठीचा आपला निर्धार अधिक दृढ करावा," असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी सरकारने देशात 'नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियाना'ची घोषणा केली असून रविवारी, या अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या आपल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "हे अभियान व्यक्ती, कुटुंब, समाज आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रासाठी आहे. 'विकसित भारत संकल्प अभियानासाठी नशामुक्त युवा' या उपक्रमाचे नावच तिचा निर्धार स्पष्टपणे व्यक्त करतो. देश 'विकसित भारत' बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, आपले तरुण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे, त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असणे आणि ते अमली पदार्थांच्या जीवघेण्या व्यसनापासून नेहमी दूर राहणे अत्यावश्यक आहे. हाच या मोहिमेचा उद्देश आहे. आपले तरुण अमली पदार्थ आणि व्यसनाचे धोके समजून घेतील, सतर्क राहतील आणि या वाईट सवयीपासून दूर राहतील, अशी प्रतिज्ञा आपण केली पाहिजे."(Drug Free Youth For Developed India Campaign)
१२५ हून अधिक संघटना सहभागी
"ही मोहीम गेल्या वर्षी काशीमध्ये एक प्रायोगिक प्रकल्प म्हणून सुरू झाली. त्यामुळे यात वैज्ञानिक दृष्टीकोनासह आध्यात्मिक ऊर्जा, संतांचे आशीर्वाद आणि एक महान सांस्कृतिक वारसाही आहे. आज लाखो देशवासियांच्या कल्याणासाठी १२५ हून अधिक आध्यात्मिक संघटना या मोहिमेशी जोडल्या गेल्या आहेत. आता हा एक राष्ट्रीय प्रकल्प बनला असून आजपासून देशभरात नशामुक्त अभियानाला सुरुवात होत आहे. लोकांना अनेकदा अवघड कामे एकट्याने करणे कठीण वाटते, परंतू, सामूहिक प्रयत्नांमध्ये प्रचंड शक्ती असते आणि आज देशभरातील एक कोटीहून अधिक तरुण या मोहिमेत सहभागी झाले आहेत. १० हजार हून अधिक ठिकाणांहून तरुण, तसेच मायभारत आणि एनएसएस स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, युवा क्लब, स्वयंसेवी संस्था आणि आध्यात्मिक संस्था यात सहभागी होतील," असेही त्यांनी सांगितले.
१०० आठवडे चालणार अभियान
"आजचे तरूण ही भारताची अमृत पीढी आहे. पुढच्या २०-२५ वर्षात ते आपल्या जीवनाला दिशा देतील आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. तरुणांची ऊर्जा, कल्पनाशक्ती आणि प्रतिभेची आज गरज आहे. व्यसन तरुणांचे लक्ष विचलित करते आणि हळूहळू त्यांना त्यांच्या स्वप्नांपासून दूर नेते. त्यामुळे, देशासाठी आणि स्वतःच्या जीवनासाठी व्यसनमुक्त राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देशातील लाखों तरुणांनी आज व्यसनमुक्तीचा संकल्प केला आहे. हा संकल्प येणाऱ्या १०० आठवड्यांपर्यंत असाच पुढे जात राहील. या मोहिमेचा एक भाग म्हणून, दर रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यात कला, संस्कृती, क्रीडा, अध्यात्म, ध्यान सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमांचा समावेश असेल. देशभरातील १ कोटींहून अधिक तरूण हे या अभियानाचे प्रमुख आहेत."(Drug Free Youth For Developed India Campaign)
या मोहिमेला जनआंदोलन बनवावे
"जेव्हा एखादा तरुण अमली पदार्थांच्या विळख्यात अडकतो, तेव्हा केवळ त्याचेच नुकसान होत नसून तो एक संपूर्ण कुटुंबही गमावतो. व्यसन केवळ शरीरालाच हानी पोहोचवत नाही, तर आईचे हास्य, वडिलांचे स्वप्ने, बहिणीची राखी आणि धाकट्या भावाचे आदर्शही हिरावून घेते. कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींना आपल्या मुलांना दररोज हळूहळू स्वतःपासून दूर जाताना पाहण्याचे दुःख भोगावे लागते. जेव्हा कुटुंब आणि समाजात अशा घटना घडतात, तेव्हा राष्ट्राची शक्तीही कमकुवत होते."(Drug Free Youth For Developed India Campaign)
व्यसनावर मात करणारा खरा योद्धा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जो तरुण व्यसनावर मात करतो तो खरा योद्धा असतो. समाजाने त्याचा सन्मान करून त्याला दुसरी संधी द्यायला हवी. अंमली पदार्थविरोधी अभियानात आज सरकारसुद्धा मजबूतीने युवकांसोबत उभे आहे. देशात अंमली पदार्थाच्या व्यवसायांवर आणि तस्करांवर सक्तीने कारवाई होत आहे. पूर्वीपेक्षा अनेक पटीने अटक झाली आहे. हजारो-कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे अभियान मिशन मोडमध्ये राबवणार आहे. आपल्या देशातील तरुण व्यसनमुक्त राहून केवळ स्वत:ची सुरक्षा करणार नसून विकसित भारताच्या संकल्पाला पुढे नेतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Drug Free Youth For Developed India Campaign)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....