कोणतीही सामाजिक किंवा वैचारिक चळवळ केवळ घटनांची मालिका नसते; ती समाजमन, रणनीती, नेतृत्व, जनसहभाग आणि परिणामकारक कृती यांचा अभ्यास करण्याची संधी असते. त्यामुळेच एखादे आंदोलन ‘केस स्टडी’ म्हणून समजून घेणे महत्त्वाचे ठरते. ‘सीजेपी’ आंदोलनही याला अपवाद नाही. या आंदोलनाची पार्श्वभूमी, त्याची टप्प्याटप्प्याने झालेली उभारणी, विविध घडामोडी, त्यामागील विचार आणि त्यातून मिळणारे धडे यांची संपूर्ण कालानुक्रमिक मांडणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी आपल्या उद्बोधनातून केली आहे. या आंदोलनाचे स्वरूप आणि त्याचे व्यापक परिणाम समजून घेण्यासाठी त्यांची ही मांडणी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक ठरावी. अभाविपच्या छत्रपती संभाजीनगर येथे देवगिरी प्रांत कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमातील अतुल लिमये यांच्या भाषणाचा हा संपादित अंश देत आहोत.
भारत हा युवा देश आहे. जगात सर्वाधिक युवा इथे आहेत. युवा म्हणजे काय? तर युवा म्हणजे ऊर्जा, हिंमत, साहस, धैर्य... ‘सब कुछ न्योछावर करने की वृत्ती.’ असे बरेच गुण युवांमध्ये आहेत आणि म्हणून म्हटले जाते की, युवकांच्या ओठी जी गीते आहेत, ती गीते त्या देशाचे भविष्य सांगतात. ती गीते म्हणजे केवळ गीते नाहीत, तर गीते म्हणजे त्या युवकांची स्वप्ने काय आहेत, आकांक्षा काय आहेत, ते ज्या मूल्यव्यवस्थेवर विश्वास ठेवतात, ती मूल्यव्यवस्था कोणती आहे, त्यांचे आदर्श कुठले आहेत, त्यांचा दृष्टिकोन कुठला, हे दाखवणारी ती प्रतीके आहेत. म्हणून ही जर गीते देशभक्तीची, साहसाची, नवाचाराची, एकतेची अशी असतील; तर युवकांसमोर जे देशाचे स्वप्न, देशाचे भविष्य असेल, ते एकदम सकारात्मक असेल. पण, ती जर गीते विद्रोहाची, द्वेषाची, स्वार्थाची, निराशेची, उदासीनतेची असतील; तर त्या देशाचे भवितव्य हे नेहमी धोयात असू शकते. आजच्या या कालावधीमध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन जेव्हा झाले, तेव्हा या युवकांमध्ये काम करणारे संघटन आणि एक राष्ट्रीय विचार घेऊन काम करणारे संघटन, ही त्याची प्रासंगिकता अधिकाधिक ठळकपणे जाणवते.
आताचे ‘सीजेपी’चे जे आंदोलन झाले, त्या आंदोलनाचा खरोखर एक ‘केस स्टडी’ म्हणून सगळ्यांनी अभ्यास करायला पाहिजे. हे सर्वांसमोर आता उघडकीस आले असले, तरी तो गेल्या काही वर्षांपासून सतत चाललेला ‘फिनोमिना’ आहे. जर अभ्यास करायचा असेल, तर या सगळ्या आंदोलनाची ‘क्रोनोलॉजी’ काय, त्याची ‘मेथोडॉलॉजी’ काय, त्याची ‘सपोर्ट सिस्टम’ काय आणि त्यांनी वापरलेले ‘इनोव्हेटिव्ह एसपेरिमेंट’ कुठले आहेत आणि त्याच्यामागची विचारधारा कुठली आहे; या सगळ्याचा अभ्यास करायला पाहिजे.
‘क्रोनोलॉजी’ बघितली तर अभिजित दीपके त्या अर्थाने मराठवाड्यातला. त्याने हे ‘सीजेपी’ लॉन्च केले, तेव्हा पहिल्या दोन-तीन दिवसांत त्याला प्रचंड ‘फॉलोईंग’ मिळाले. प्रत्यक्षामध्ये तो दि. ६ जूनला भारतात आला आणि त्यानंतर ७ तारखेला त्याने आंदोलन केले. त्यावेळी पाहिजे तेवढा काही प्रतिसाद मिळाला नाही. मग दि. ७ ते १९ जूनपर्यंत तो देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरला आणि त्या वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याने आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न केला. तिथेसुद्धा त्याला प्रतिसाद तसा काही मिळाला नाही. दि. २० तारखेपासून मग जंतरमंतरवर ‘ठिय्या’ आंदोलन सुरू केले. क्रमशः त्याच्यानंतर या आंदोलनाचे स्वरूप बदलत गेले.
असे काय झाले असावे की, या आंदोलनाचे स्वरूप बदलले? अशी कुठली ‘सपोर्ट सिस्टम’ त्याच्याशी ‘अॅटॅच’ झाली? हे जर बघायचे असेल, तर कुठल्या कुठल्या संस्था, संघटना या आंदोलनात जोडल्या गेल्या, त्याची एक यादी बघायला पाहिजे. म्हणजे त्याच्या ‘सपोर्ट सिस्टम’ची कल्पना येऊ शकते. या आंदोलनात स्वाभाविक युवा वयोगट सहभागी होता. विद्यार्थ्यांचे आंदोलन होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी संघटना या आंदोलनाशी जोडल्या गेल्या. त्यातले ‘प्रॉमिनंट’ जे व्यासपीठाचे संचालन करत होते, ती संस्था होती ‘आयएसआर - ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन’. दुसरी सक्रिय संघटना होती, ‘एसएफआय’. अनेक मानवाधिकार संघटना या आंदोलनाशी जोडल्या गेल्या. ‘एमनेस्टी इंटरनॅशनल’, ‘ह्युमन राईट्स वॉच’, ‘पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी’, ‘सिटीझन्स फॉर जस्टिस अॅण्ड पीस’ हे जोडले गेले. अनेक जनजाती संघटना याच्याशी जोडल्या गेल्या जसे की, ‘ऑल इंडिया युनियन ऑफ फॉरेस्ट वर्किंग पीपल’, ‘बिरसा-आंबेडकर-फुले स्टुडंट असोसिएशन’, ‘ऑल ट्रायबल आसाम स्टुडंट्स युनियन.’
अनेक महिला संघटनाही ‘सीजेपी’शी जोडल्या गेल्या. ‘पिंजरा तोड कलेटिव्ह’; आपल्याला आठवण असेल की, ‘पिंजरा तोड आंदोलन’ मागच्या काही वर्षांमध्ये साधारण पन्नासएक विद्यापीठांमध्ये झाले होते. त्याचा एक फोरम केलेला आहे, त्यांनी ‘पिंजरा तोड कलेटिव्ह’ म्हणून. ‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन’, ‘वुमेन अगेन्स्ट सेशुअल व्हॉयलन्स अॅण्ड स्टेट रिप्रेशन’, ‘जेंडर
जस्टिस कलेटिव्ह’ अशी अनेक मोठी सूची बनू शकते.
अनेक मुस्लीम संघटना याच्याशी जोडल्या गेल्या. ‘स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन’, ‘मुस्लीम स्टुडंट ऑर्गनायझेशन अॅण्ड कलेटिव्ह’, अल्पसंख्याक म्हणजे ‘मायनॉरिटी अॅण्ड बहुजन राईट फोरम’ जोडले गेले. अनेक इसाई संस्था याच्याशी जोडल्या गेल्या. ‘युनायटेड ख्रिश्चन फोरम’, ‘ऑल इंडिया कॅथोलिक युनियन’, ‘नॅशनल कौैंन्सिल ऑफ चर्चेस इन इंडिया (एनसीसीआय)’ म्हणून प्रसिद्ध संस्था तीही जोडली गेली.
अनेक कायदेशीर विषयांत काम करणार्या संस्था, पर्यावरण विषयात काम करणार्या संस्था, पत्रकारिताविषयक संस्था, ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’, ‘रिपोर्टर विदाऊट बॉर्डर’ जोडले गेले. किसान संघटनाही जोडल्या गेल्या. ज्यांनी किसान आंदोलने उभारली अशा दोन प्रमुख संघटना ‘संयुक्त किसान मोर्चा’ आणि ‘भारतीय किसान युनियन.’ ‘ऑल इंडिया ट्रेडर्स युनियन कौंन्सिल’, ‘सेंट्रल ट्रेड युनियन (सीटू)’ अशा अनेक कामगार संघटना जोडल्या गेल्या. ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ह्युमन राईट्स’ वगैरे अशा अनेक विदेशी संस्था जोडल्या गेल्या. आता एवढ्या सगळ्या संघटनांना जोडण्याचे काम कोणी केले?
तुम्हाला जर या आंदोलनाची कार्यपद्धती समजून घ्यायची असेल, त्यामागची ‘सपोर्ट सिस्टम’ बघायची असेल, तर याचा अभ्यास करायला लागेल की, हे कोणी केले. हे जर अधिक स्पष्ट व्हायचे असेल, तर या आंदोलनामध्ये व्यासपीठावरून जे बोलले गेले, जे सांगितले गेले, ज्या घोषणा दिल्या गेल्या; जे व्यक्ती आले त्यांच्याकडे बघितले, तर मग आपल्याला लक्षात येईल की, या व्यासपीठावरती हिंदूविरोध का झाला. या व्यासपीठावरून ‘भारत तेरे तुकडे होंगे’सारखी घोषणा देणारे आणि त्याला समर्थन करणारी मंडळी का बरे आली? या व्यासपीठाचा पूर्ण ताबा हा वामपंथीयांनी कसा घेतला? या व्यासपीठावरती वेगवेगळे राजकीय पक्ष कसे सामील झाले आणि ते केवळ विद्यार्थी आंदोलन नाही झाले, तर राजकीय आंदोलन कसे झाले? केवळ दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशभरातल्या सर्व राज्यांमध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीची आंदोलने करण्याची रचना कशी लागली? याचे ‘कोऑर्डिनेशन’ कोणी केले? विदेशी संस्था, संघटना आणि विदेशातसुद्धा आंदोलन करण्याची पद्धत ही कशी विकसित झाली? आणि मग हे जर सगळे बघायचे असेल, तर आपल्याला योगेंद्र यादव यांचे वाय जे त्यांनी या आंदोलनानंतर म्हटले की, ते ‘डिकोड’ करणे आवश्यक आहे, ते नीट समजून घेणे आवश्यक आहे.
त्यांनी काय म्हटले, तर त्यांनी असे म्हटले की, "डेमोक्रेसी का फ्युचर अब इसके आगे संसद तय नहीं करेगी, सडको से तय होगा| इलेशन तय नहीं करेंगे, ‘रेझिस्टन्स’ से तय होगा|” हे वाय काय आहे, हे नीट समजून घेतले, यामागचे तत्त्वज्ञान हे जर ‘डिकोड’ केले, तर या आंदोलनाच्या मागे जे कारण आहे, ते खरे आहे. पण, आंदोलन भरकटले कसे गेले? ते कुणाच्या कब्जात गेले? ते जर नीट बघितले, तर त्या आंदोलनाचा अर्थ आपल्याला नीटपणे कळू शकेल. म्हणूनच म्हटले की, या आंदोलनात आपल्याला खूपकाही शिकण्यासारखे आहे. मग हळूहळू आपण निष्कर्षाप्रत येतो की, ज्याला म्हणतात ‘अल्टरनेट पॉलिटिस’ अर्थात ‘पर्यायी राजनीती!’ याचा एक उत्तम यशस्वी प्रयोग म्हणून या आंदोलनाकडे ते बघतात.
आता ही ‘पर्यायी राजनीती’ म्हणजे काय? याच्यामध्ये त्यांनी एक ‘थिअरी’ मांडलेली आहे. ते म्हणतात की, ‘सबवर्जन ऑफ डेमोक्रसी थ्रू डेमोक्रॅटिक मीन्स.’ म्हणजे काय आहे, हे जर नीट समजून घेतले तर आपल्याला या सगळ्याचा अर्थ कळेल. चांगली गोष्ट अशी आहे की, हे ‘वेल डॉयुमेंटेड’ आहे. हे व्यवस्थित शिकवले जाते. इटालियन तत्त्ववेत्ता ग्रामस्कीने ‘कल्चरल हेजिमनी’ ही थिअरी म्हणून मांडली. त्या ‘कल्चरल हेजिमनी’मध्ये तो सांगतो की, केवळ आर्थिक आधारावरती या देशामध्ये क्रांती आता होऊ शकत नाही. क्रांती करायची असेल, तर आपल्याला ज्या सगळ्यांना बांधणारी संस्कृती आहे, त्या संस्कृतीची ‘हेजिमनी’ नष्ट केली पाहिजे. म्हणून ही संस्कृती नष्ट केली पाहिजे. दुसरी थिअरी म्हणजे, ‘डीकन्स्ट्रशन थिअरी’. रामाचे ‘डीकन्स्ट्रशन’ बघतो किंवा वेगवेगळ्या आपल्या आदर्शांचे ‘डीकन्स्ट्रशन’ बघतो की, रामाला चॅलेंज केले जाते. ‘राम तुमचा आदर्श कसा असू शकतो? राम तर महिलाविरोधी आहे. आपल्याच पत्नीला त्यागले. शंभुकाचा वध केला म्हणून राम दलितविरोधी आहे,’ असा आदर्श कसा राहू शकतो? ‘धिस ईज डीकन्स्ट्रशन ऑफ राम!’ यांची काम करण्याची पद्धत कशी आहे, हे जरा नीटपणे आपल्याला समजून घेतले पाहिजे.
आपण ‘अल्टरनेट पॉलिटिस’ जेव्हा म्हणतो, तेव्हा दोन गोष्टी त्यांनी म्हटल्या. पहिले म्हटले की, व्यवस्था ज्या आहेत... म्हणजे आता संसदीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे, ही व्यवस्था आहे. या व्यवस्थेतच राहिले, तर आपल्याला क्रांती करता येणार नाही. त्याच्यामुळे न्यायव्यवस्था, पोलीस, प्रशासन या सगळ्या व्यवस्थांना आव्हान दिले पाहिजे. या सिस्टम ज्या आहेत, या ‘चॅलेंज’ केल्या पाहिजेत. यांना आव्हान कसे द्यायचे, तर त्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे, तुम्ही या निवडणुकीच्याच्या प्रक्रियेमध्ये शिरा आणि या प्रक्रियेत शिरून या सगळ्यावरती एकदा का ताबा मिळवला की, मग या सगळ्या व्यवस्था बदला. तसे त्या विचाराच्या मंडळींनी प्रयोगही करून बघितले; पण निवडणुकीत प्रकियेत प्रवेश करुन काही शय झाले नाही.
मग दुसरा पर्याय काय तर, ‘सबवर्जन ऑफ डेमोक्रसी थ्रू डेमोक्रेटिक मीन्स.’ म्हणजेच काय, तर लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचाच उपयोग करायचा. तुम्हाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, आंदोलनाचे स्वातंत्र्य आहे, यांचा उपयोग करून मग पुढची कामे करायची. मग ही कामे काय आहेत, तर त्यांनी एक पाच पायर्या ठरवलेल्या आहेत. एक आहे ‘इन्फिल्ट्रेशन अॅण्ड टॅटिकल पार्टिसिपेशन.’ न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, प्रशासन अशा सर्व सिस्टममध्ये ‘इन्फिल्ट्रेशन’ (घुसखोरी) कसे करायचे; शिक्षणव्यवस्थेत पाहिल्यास ‘क्रिटिकल थेअरी’ कशी शिकवली जाते किंवा ‘डीआय इंडेस’ हा कॉर्पोरेटमध्येसुद्धा येतो. ‘धिस ईज सबवर्जन ऑफ कॉर्पोरेटर्स.’ तर, अशा पद्धतीने ‘सबवर्जन’ करायचे, ‘इन्फिल्ट्रेशन’ करायचे.
दुसरे काय, तर या ‘इन्स्टिट्यूशन’चे, संस्थांचे खच्चीकरण करायचे. संस्थांना आव्हान द्यायचे. या संस्थांवरचा विश्वास उडाला पाहिजे. मग न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडाला पाहिजे, निवडणूक आयोगावरचा विश्वास उडाला पाहिजे, पोलीस प्रशासनावरचा विश्वास उडाला पाहिजे, म्हणून त्यांच्या विरुद्ध वेगवेगळे प्रश्न उपस्थित करा. या सगळ्या सिस्टम चालवत असताना काहीतरी तर चुका होतातच. त्या चुकांचे भांडवल बनवा आणि ‘वॉर ऑफ पोझिशन (वैचारिक लढाई)’, ‘वॉर ऑफ नॅरेटिव्ह’ असे चालवा आणि मग याच्या आधारावरती संस्कृती, चित्रपट, साहित्य, विद्यापीठ या माध्यमांतून एक वेगळ्या प्रकारचे ‘कल्चर’ उभे राहते.
आपल्याकडे मुलींकडे बघण्याची एक संस्कृती आहे. आपली संस्कृती आपल्याला सांगते की, परस्त्रीकडे मातेसमान बघायचे. असे शिकवण देणार्या संस्कृतीमध्ये हे आंदोलन जेव्हा झाले, तेव्हा व्यवस्थेत तिथे बंदोबस्तात असलेले काही पोलीस अधिकारी म्हणाले की, "भाईसाहब, जिस पद्धती से लडकिया बिहेव कर रही थी, तो उनको सहना बडा मुश्कील था| जिस पद्धती का वेश परिधान कर रही थी, जिस पद्धती की भाषा बोल रही थी, जिस पद्धती के हावभाव कर रही थी, शरम तो हमे आ रही थी|” संस्कृतीचे ‘डिग्रेडेशन’ करण्याचा हा प्रयत्न आहे. यात शेवटचे त्यांचे हत्यार म्हणजे, रस्त्यावरची आंदोलने! असे हे मार्ग वापरून आपल्याला ‘सबवर्जन ऑफ डेमोक्रसी’ करायचे आहे, अशी त्यांची थिअरी. आपल्या सुदैवाने बाबासाहेबांनी याच्याबद्दल आपल्याला खूप पहिले जागृत केलेले आहे. आपण आपल्या महापुरुषांचा संदेश नीटपणे पाहत नाही आणि त्याच्यामुळे अशी गडबड होते.
संविधान सभेचे त्यांचे शेवटचे भाषण. दि. २५ नोव्हेंबर १९४९. ते भाषण ‘थ्री वॉर्निंग स्पीच’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी त्याच्यामधून आपल्याला तीन इशारे दिले आहेत. त्यातला पहिला इशारा असे सांगतो की, कुठल्या पद्धतीने या सगळ्या आंदोलनांकडे आपण आता बघायला पाहिजे. ते म्हणतात, एक कालावधी होता; ज्यावेळी आपण पारतंत्र्यात होतो. जेव्हा इंग्रजांची सत्ता होती आणि त्यामुळे आपल्या न्यायिक व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध नव्हत्या. आपले म्हणणे ठेवण्यासाठी संसदीय मार्गसुद्धा उपलब्ध नव्हते. त्यामुळे आपण वेगवेगळी आंदोलने, वेगवेगळे सत्याग्रह, वेगवेगळे क्रांतिकार्य हेसुद्धा त्यावेळी जस्टिफाईड होते. पण, आता मार्ग बदललेला आहे, आता आपण संविधान स्वीकारतोय. जेव्हा आपण संविधान स्वीकारतो, त्यावेळी हे क्रांतिकार्य, ही हिंसक आंदोलने आपण त्यागली पाहिजेत. हे जर आपण यपुढेही स्वीकारले, तर काय होईल? तर लोकशाही टिकू नाही शकणार आणि म्हणून त्याला बाबासाहेबांनीच या सगळ्या प्रक्रियेला एक शब्दप्रयोग केला होता. त्यांनी या सगळ्या डाव्यांच्या प्रक्रियेला ‘ग्रामर ऑफ अनार्की’ (अराजकतेचे व्याकरण) म्हटले होते.
हे ‘ग्रामर ऑफ अनार्की’ आता आपण पूर्णपणे नाकारले पाहिजे. त्याच संविधान सभेमधून ते जागृत करतात की, दोन अशा शक्ती आहेत, ज्यांच्यापासून सदैव जागृत राहिले पाहिजे. एक ‘कम्युनिस्ट’ आणि दुसरे ‘सोशालिस्ट’. कम्युनिस्टांबद्दल ते म्हणतात की, या राज्यघटनेवरती आणि संसदीय लोकशाहीवरती यांचा विश्वास नाही; परंतु हिंसेच्या मार्गावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे हे संधी मिळेल, त्यावेळी हिंसेच्या मार्गाने किंवा कुठल्याही मार्गाने संविधान उखडून फेकण्याचा प्रयत्न करतील. समाजवादीं(सोशालिस्ट)बद्दल त्यांनी म्हटले की, हे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करतील आणि यांना अमर्याद अधिकार पाहिजेत. अमर्याद अधिकार कुठले? तर त्यांच्याच भाषेत म्हणायचे, तर राजसत्ता उखडून टाकण्याचेसुद्धा आणि त्याच्यासाठी आंदोलन करण्याचेसुद्धा अधिकार त्यांना पाहिजेत. इतया स्पष्ट शब्दांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या शक्तींबद्दल आपल्याला जागृत केले.
आपल्याला जर विकसित देश बनायचे असेल, तर या युवाशक्तीचे एक मोठे योगदान आपल्याला पाहिजे. पण, ही युवाशक्ती कशी पाहिजे? कुठले संस्कार पाहिजेत? कुठली स्वप्ने पाहिजे? कुठली गीते पाहिजेत त्यांच्या ओठी? हे मात्र नीट काळजीपूर्वक आपण ठरवले पाहिजे. हे आंदोलन फक्त राजकीय दृष्टीने बघू नका, केवळ ‘अॅन्टी बीजेपी’ या दृष्टिकोनातून हे बघू नका. हे आंदोलन ‘अगेन्स्ट द कॉन्सिट्यूशन’, संविधानाच्या विरोधातले एक हत्यार म्हणून उपयोग केलेले आंदोलन आहे, या अर्थाने बघा. ‘अगेन्स्ट द नेशन’ भारताच्या विरोधातले एक आंदोलन या अर्थाने उभे केलेले आंदोलन आहे, या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितले पाहिजे.
बाबासाहेबांनी ज्याच्याबद्दल आपल्याला जागृत केले, त्या ‘ग्रामर ऑफ अनार्की’ला नीटपणे ओळखले पाहिजे, ‘डिकोड’ केले पाहिजे आणि त्याचे उत्तरही आपल्याला शोधायला लागेल. जर उत्तर शोधायचे असेल, तर आपल्याला आपली सकारात्मक रेषा खूप मोठी करावी लागेल. या युवकांमध्ये-युवतींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संपर्क करावा लागेल. आजही युवकांना देशभक्ती आणि सेवेचे जबरदस्त आकर्षण आहे. हे आकर्षण आपल्याला परत एकदा जागवावे लागेल. या आकर्षणाच्या माध्यमातून आपल्याला परत एकदा राष्ट्रभक्तीचा भाव त्यांच्या मनामध्ये जागा करावा लागेल.
(शब्दांकन : ओंकार मुळ्ये)
- अतुल लिमये,
सहसरकार्यवाह, राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ