नुकतेच ‘फुटबॉलचा महाकुंभ’ म्हणून जगप्रसिद्ध ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेत स्पेनच्या संघाने अर्जेंटिनावर मात करीत, विश्वविजेता म्हणून आपले नाव कोरले. भारतातील फुटबॉलप्रेमींनीही ‘फिफा’चा हा जल्लोष अतीव उत्साहाने साजरा केला. फक्त शहरांतच नव्हे, तर अगदी गावांतही फुटबॉलप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. असेच एक गाव म्हणजे केरळम्च्या एर्नाकुलम् जिल्ह्यातील दक्षिण चित्तूर. या गावातील ‘सेंट मेरीज् यूपी’ या सरकारी शाळेत ‘अक्षरकन्दुकम्’ नावाचा फुटबॉलला संस्कृतशी जोडणारा एक अभिनव उपक्रम राबविला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दि. २६ जुलै रोजीच्या ‘मन की बात’मधून या यशस्वी उपक्रमाचे तोंडभरून कौतुकही केले. त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ‘अक्षरकन्दुकम्’ उपक्रमाचे आयोजक आणि त्याच शाळेतील संस्कृत शिक्षक अभिलाष प्रताप यांच्याशी बातचीत करून, या अनोख्या उपक्रमाची माहिती जाणून घेतली.
गेला महिनाभर संपूर्ण जगभर ‘फिफा’ विश्वचषकाची लाट आली होती. भारतातही गावोगावी, गल्लोगल्ली, शाळा-महाविद्यालयांत, सर्वच ठिकाणी केवळ फुटबॉलचेच वारे वाहात होते. केरळम्च्या एर्नाकुलम् जिल्ह्यातील दक्षिण चित्तूर गावातील ‘सेंट मेरीज् यूपी’ शाळेतील विद्यार्थी तरी याला अपवाद कसे ठरतील? तेही महिनाभर अभ्यासापेक्षा मैदानात फुटबॉल खेळण्यातच रमले होते. यातून मार्ग काढून त्यांना अभ्यासाकडे वळवले, ते त्या शाळेतील संस्कृतचे शिक्षक अभिलाष प्रताप यांनी!
मुलांचा उत्साह पाहून अभिलाष यांच्या मनात आले की, या फुटबॉलच्या माध्यमातूनच मुलांकडून संस्कृतचा अभ्यास करून घेतला, तर खेळ आणि अभ्यास दोन्हीही गोष्टी साध्य होतील आणि काहीतरी नवीन उपक्रमदेखील करून पाहता येईल! अभिलाष यांनी आधी फुटबॉलशी संबंधित सुचतील त्या सगळ्या शब्दांची एक यादी तयार केली. यात मुले मोठ्या उत्साहाने पुढाकार घेत होती. मग त्या शब्दांसाठी संस्कृत शब्द शोधून काढले. आपण नेहमी इंग्रजीत वापरत असलेल्या ‘पास’, ‘शूट’, ‘ड्रिबल’, ‘गोल’ या अशा शब्दांना संस्कृतमध्ये काय म्हणतात, ते कळल्यावर मुलांना खूपच मजा वाटू लागली; त्यांनी तेच शब्द उचलून धरले. नवीन शब्द जाणून घेण्याची उत्सुकता अभिलाष यांना अतोनात समाधान देऊन गेली. ते खेळतानाही संस्कृत शब्दांचाच वापर करू लागले. मग अभिलाष यांनी मुलांना ते सगळे शब्द संस्कृतातील वर्णानुक्रमे प्रत्येक अक्षराला एक याप्रमाणे लिहायला सांगितले. त्या शब्दांसाठी एकेक चित्र निवडले आणि त्याला इंग्रजी आणि मल्याळी शब्ददेखील लिहून ‘फुटबॉलजगतातील सचित्र वर्णमाला’ तयार झाली. त्यातील एकेक शब्द घेत, त्याचे फ्लॅशकार्ड तयार केले. तसेच संकलित एक तक्तादेखील बनवला. त्या कार्डांना ‘फुटबॉल’ अर्थात, ‘कन्दुकक्रीडा’ आणि त्याच्या माध्यमातून शिकता येणारी ‘अक्षरे’ यांचा सुयोग्य संयोग साधत दिलेले ‘अक्षरकन्दुकम्’ नावही अगदी समर्पक ठरले.
फक्त भारतातच नाही, तर जगभरातील सर्व संस्कृतप्रेमी आणि फुटबॉलप्रेमींना ‘अक्षरकन्दुकम्’ची ही फ्लॅशकाडर्स नक्कीच आवडतील. संस्कृतशी अनभिज्ञ असणार्या फुटबॉलप्रेमींनीदेखील ही फ्लॅशकाडर्स पाहिली, तर त्यांच्याही मनात नक्कीच कुतूहल निर्माण होईल. मल्याळी आणि इंग्रजी भाषेतही अर्थ लिहिला असल्यामुळे त्यांना ते समजायला सोपे होईल आणि अशाप्रकारे संस्कृतचा जगभर प्रसार होत जाईल. या फ्लॅशकाडर्समधून प्रेरणा घेऊन भविष्यात आणखीही विषयांवर नवनवीन अभिनव उपक्रम देश-विदेशांतून राबविले जातील, याची खात्रीही अभिलाष प्रताप व्यक्त करतात.
शाळेतील विद्यार्थ्यांनाही हा खेळ प्रचंड आवडला. अगदी सहा वर्षांच्या मुलांपासून ते १२ वर्षांपर्यंतची मुले यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाली. याहून मोठ्यांचे अक्षरांशी खेळायचे वय नसले, तरी त्यांनीही आवर्जून प्रेक्षकरूपाने उपस्थित राहात उपक्रमात सहभाग नोंदवला.
त्या शाळेतील मुले अतिशय साधारण घरातील आहेत. त्यांचा नैसर्गिकपणे खेळाकडेच अधिक कल आहे. तरीही, त्यांना अभ्यासात रुची निर्माण करायची असेल, तर खेळातून अभ्यासाकडे जाणारा असा एखादा मार्ग अवलंबायला हवा, अशा विचारातून अभिलाष यांना ‘अक्षरकन्दुकम्’ची संकल्पना सुचली. ही फ्लॅशकाडर्स मुलांना अतिशय रोचक वाटली. ते फुटबॉल खेळताना हे शब्द वापरत, सहजी संस्कृत बोलू लागले. एरव्ही, संस्कृत बोलताना न्यूनगंड बाळगणारी मुले फुटबॉलविषयी बोलताना मात्र बिनधास्त दिसू लागली. त्यांना ते मनापासून आवडले. बसून पुस्तकी अभ्यास शिकवण्यापेक्षा असे काहीतरी नवीन केले की, मुलांना ते मनापासून आवडते आणि लक्षातही राहते, याची प्रचिती या उपक्रमातून आली. असे नवनवीन उपक्रम भारतभर घेतले, तर संस्कृत भाषा आताच्या ‘जेन-अल्फा’ आणि ‘जेन-झी’पर्यंत पोहोचेल आणि तरच, आपली जननी भाषा संस्कृत भविष्यातही जिवंत राहील.
‘अक्षरकन्दुकम्’ची फ्लॅशकाडर्स तयार झाल्यावर त्यांनी वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर फोटोज, व्हिडिओज पोस्ट केले. शाळेच्या संकेतस्थळावरही ते टाकले. जवळपासच्या प्रदर्शनांमध्येदेखील ती काडर्स ठेवली होती. शाळेतील मुले तेथे उत्साहाने उभी राहून सगळ्यांना उपक्रमाची माहिती देत होती. यातून त्यांच्या कल्पकतेबरोबरच संभाषण कौशल्यांचासुद्धा आपोआपच विकास झाला. हळूहळू आत्मविश्वास बळावल्यावर मुलांनाही स्वतःचा अभिमान वाटू लागला. या सगळ्यातून उपक्रमाचा प्रचार तसा आपोआपच होत गेला. जसजसे लोकांना कळत गेले, तसे आसपासचे लोक उत्सुकतेने पाहायला जाऊ लागले. साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील ‘अक्षरकन्दुकम्’चा त्यांच्या ‘मन की बात’मध्ये उल्लेख केला. ते कळल्यावर अभिलाष यांचा तर प्रथमतः विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर आता देशाच्या कानाकोपर्यांतून लोकांच्या शुभेच्छा आणि कौतुकाचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे. मुलांचा तर आनंद गगनात मावत नाहीये. या राष्ट्रीय यशानंतर मुलेही स्वखुशीने अभ्यासाकडे वळलेली आहेत. ते स्वतःहून ‘आणखी काहीतरी उपक्रम करूया,’ म्हणत अभिलाष यांना कल्पनाही सुचवत आहेत. याच जोमाने कार्य करत, आताच्या मुलांसह पुढील पिढीतील मुलांना उपक्रमाशी जोडून घेण्याचा अभिलाष यांचा मानस आहे. ‘मन की बात’मध्ये झालेला उल्लेख हा अभिलाष यांच्यासाठीही नक्कीच समाधानाचा आणि निःसंशय गौरवाचा क्षण आहे. यातून प्रेरणा घेत, भविष्यात नव्या जोमाने संस्कृत क्षेत्रात आणखीही ‘हटके’ उपक्रम राबवण्यास प्रा. अभिलाष उत्सुक आहेत.
पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाप्रमाणे २०४७ पर्यंत जर भारत खरेच ‘विकसित राष्ट्र’ बनवायचे असेल, तर त्यात वैज्ञानिक प्रगतीबरोबरच सांस्कृतिक ऐक्यदेखील तेवढेच महत्त्वाचे. भारत हा ‘विविधतेतून एकता’ जपणारा देश आहे आणि याच सांस्कृतिक विविधतेतील एक समान धागा, भारताचा ‘सांस्कृतिक आत्मा’ हा निर्विवादपणे संस्कृतच आहे. तेव्हा आपल्या संस्कृतीचे, ती जाणून घेण्याचे मूळ असणार्या संस्कृतचे संवर्धन केले, तरीही आपण देशाच्या विकासात खूप मोठे योगदान देऊ शकतो.
- ओवी लेले