राष्ट्रयज्ञातील अखंड तेवत राहिलेली समिधा

    02-Aug-2026
Mohanlal Bidichandani
 
राष्ट्रनिर्मितीचा इतिहास हा अशा असंख्य निःस्वार्थ कार्यकर्त्यांच्या समर्पणाने घडतो, ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समिधेसारखे अर्पण केले. ज्यांच्या कष्टांची नोंद इतिहासाच्या पानांवर फारशी झाली नाही, पण ज्यांच्या तपश्चर्येमुळे राष्ट्रकार्याचा दीप अखंड प्रज्वलित राहिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अशाच तेजस्वी कार्यकर्त्यांमध्ये कै. अॅड. मोहनलाल बिदीचन्दाणी यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.
 
वयाच्या विशीत माणूस स्वतःच्या भविष्याची स्वप्ने रंगवत असतो. पण मोहनलाल बिदीचन्दाणी यांनी आपल्या आयुष्याचे स्वप्न राष्ट्राशी जोडले. १९३९ मध्ये सिंध प्रांतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा सुरू झाल्या आणि त्या शाखेच्या वातावरणाने त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली. संघ स्वयंसेवक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास संघशिक्षक, शाखा कार्यवाह अशा विविध जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. संघशिक्षा वर्गाचे तृतीय वर्ष पूर्ण करून त्यांनी स्वतःला संघकार्याच्या कठोर शिस्तीत घडवले. त्यांच्या आयुष्याची खरी परीक्षा भारताच्या फाळणीच्या काळात झाली. हजारो कुटुंबांप्रमाणे त्यांचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले. स्वतः निर्वासित म्हणून भारतात यावे लागले. अशा वेळी बहुतेकांची धडपड स्वतःचे घर उभे करण्यासाठी असते; पण मोहनलालजींची पहिली चिंता होती - या नव्या भूमीत संघाची शाखा कधी सुरू होणार?
 
मुलुंडच्या निर्वासित वसाहतीत पाय रोवल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम संघकार्याला प्रारंभ केला. १९४९ मध्ये सहकाऱ्यांसह मुलुंड कॉलनीची शाखा सुरू झाली. त्या एका शाखेने पुढे प्रभात, सायं आणि रात्र शाखांचे विस्तीर्ण जाळे निर्माण केले. निर्वासितांच्या मनात आत्मविश्वास जागवण्याचे, संघटित समाज उभारण्याचे आणि राष्ट्रनिष्ठेची बीजे रुजवण्याचे कार्य त्यांनी शांतपणे केले. स्वतःकडे काहीच नसताना इतरांसाठी सर्व काही देण्याची वृत्ती हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा गुण होता. पाणी, वीज, परिवहन, घरांचे वाटप अशा नागरी समस्यांनी ग्रासलेल्या निर्वासितांसाठी त्यांनी अक्षरशः दिवस-रात्र झटून काम केले. आज त्या परिसरात दिसणाऱ्या अनेक सार्वजनिक सुविधा त्यांच्या प्रारंभीच्या संघर्षाची साक्ष देतात. त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही; समाजाचे दुःख कमी व्हावे, एवढाच त्यांचा ध्यास होता.
 
त्यागाची परिसीमा म्हणजे स्वतःच्या आयुष्यापेक्षा कार्याला प्राधान्य देणे. स्वतःच्या घराची व्यवस्था पूर्ण झाली नव्हती, पण संघ कार्यालयासाठी जागा असावी, कार्यकर्त्यांना एक केंद्र मिळावे, ही त्यांची अखंड धडपड होती. सुरुवातीला स्वतःचे घरच कार्यालय बनवले. नंतर तर आपल्या घरामागील जागाच कार्यालयासाठी अर्पण केली. आर्थिक परिस्थिती साधी असूनही कार्यालयासाठी निधी दिला, जनसंघ कार्यालयाचे डिपॉझिट स्वतःच्या खिशातून भरले आणि शेवटपर्यंत त्याचे भाडेही स्वतः भरत राहिले. ही केवळ देणगी नव्हती; हा त्यांच्या जीवनदृष्टीचा अविष्कार होता.
 
त्यांच्या मते संघकार्याचा खरा पाया म्हणजे कार्यकर्ता. म्हणून प्रत्येक स्वयंसेवक सक्षम, संस्कारित आणि ध्येयनिष्ठ व्हावा, यासाठी त्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य खर्च केले. एखाद्या कार्यकर्त्याला अडचण आली, तर ती स्वतःची समस्या आहे, या भावनेने ते धावून जात. अनेकांच्या आयुष्यात ते मार्गदर्शक, मित्र आणि कुटुंबवत्सल ज्येष्ठ म्हणून उभे राहिले. व्यवसायाने ते वकील होते; पण समाज त्यांना 'संघाचे वकील' म्हणूनच ओळखत असे. आणीबाणीच्या कठीण काळात संघ परिवारातील असंख्य कार्यकर्त्यांच्या खटल्यांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांसाठी तर ते केवळ कायदेशीर सल्लागार नव्हते, तर संकटसमयी आधार देणारे पालकच होते. विनाशुल्क सेवा, प्रेमाने केलेले मार्गदर्शन आणि प्रत्येक कार्यकर्त्याविषयीची आत्मीयता यामुळे ते सर्वांच्या हृदयात स्थान मिळवून गेले.
 
जीवनाने त्यांची आणखी एक कठोर परीक्षा घेतली. तरुण वयात त्यांना क्षयरोगाने ग्रासले. एका फुफ्फुसावर शस्त्रक्रिया करून ते काढावे लागले. एका फुफ्फुसाच्या आधारावर जगणे हेच मोठे आव्हान होते; पण त्यांनी कधीही आपल्या वेदनांचे प्रदर्शन केले नाही. कार्यकर्त्यांनाही आपल्या आजाराची जाणीव होऊ दिली नाही. शारीरिक वेदनांवर मात करून ते पूर्वीइतक्याच उत्साहाने संघकार्य करत राहिले. जेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या प्रकृतीविषयी उशिरा समजले, तेव्हा त्यांच्या त्यागापुढे सर्वजण नतमस्तक झाले.
 
मोहनलाल बिदीचन्दाणी यांनी जणू स्वतःला राष्ट्रकार्याच्या यज्ञात समिधा बनवले. म्हणूनच त्यांचे जीवन हे संघाच्या कार्यपद्धतीचे जिवंत उदाहरण आहे. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विशाल वटवृक्षाकडे पाहताना त्याच्या मुळाशी अशा असंख्य अज्ञात, अल्पज्ञात कार्यकर्त्यांचे तप, त्याग आणि समर्पण सामावलेले आहे. कै. अॅड. मोहनलाल बिदीचन्दाणी हे त्यांपैकीच एक तेजस्वी नाव. त्यांनी जगाला हे दाखवून दिले की राष्ट्रासाठी जगणारा माणूस कधीच मरत नाही; तो आपल्या कार्यातून, संस्कारातून आणि प्रेरणेतून पिढ्यान्‌पिढ्या जिवंत राहतो.




संबंधित मजकूर