चीनच्या तियानमेन चौकात ३६ वर्षांपूर्वी निःशस्त्र विद्यार्थ्यांवर रणगाडे चालवणार्या चिनी कम्युनिस्ट पक्षाची क्रूरता आजही संपलेली नाही, याचा जिवंत पुरावा म्हणजे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे ताजे वक्तव्य! माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांच्या १००व्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात, ज्या घटनेला जगापासून लपवण्यासाठी चीनने हजारो प्रयत्न केले, त्याच दि. ४ जून १९८९च्या तियानमेन चौकातील भीषण नरसंहाराचे शी जिनपिंग यांनी उघडपणे आणि निर्लज्जपणे समर्थन केले आहे. लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणार्या हजारो तरुण विद्यार्थ्यांना लष्कराच्या जोरावर चिरडण्याच्या त्या अमानुष कारवाईला जिनपिंग यांनी ‘पूर्णपणे योग्य आणि आवश्यक’ ठरवले आहे.
चीनमध्ये तियानमेन चौकातील घटनेचा सार्वजनिक मंचांवर, सोशल मीडिया, पाठ्यपुस्तकांमध्ये, तसेच प्रसारमाध्यमांमध्ये उल्लेख करण्यावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध आहेत. त्यामुळे ज्या मुद्द्याला चीन जगापासून लपवण्याचा प्रयत्न करतो, त्याच मुद्द्यावर देशाच्या सर्वोच्च नेत्याने स्वतः पक्षाची भूमिका इतया आक्रमकपणे पुन्हा का मांडली, असा प्रश्न उपस्थित होतो.
१९८९ मध्ये लोकशाहीची मागणी करणार्या निःशस्त्र विद्यार्थ्यांवर चिनी सैन्याने गोळ्या झाडल्या, रणगाडे अंगावर घातले आणि हजारो निष्पाप जीवांचे रक्षण करण्याऐवजी त्यांचा बळी घेतला. ‘टँक मॅन’च्या प्रतिमेने जगाला चिनी राजवटीची अमानुषता दाखवून दिली. सध्या चीनची अर्थव्यवस्था रिअल इस्टेट संकट, तरुणांमधील बेरोजगारी आणि मंदावलेल्या विकासदरामुळे अडचणीत आहे. ‘कोविड’ निर्बंधांच्या काळात झालेल्या ‘व्हाईट पेपर मूव्हमेंट’सारख्या आंदोलनांनीही जनतेमध्ये असंतोषाची ठिणगी असल्याचे स्पष्ट केले होते. अशातच आज, जेव्हा चीन आर्थिक मंदी, बेरोजगारी, वाढता अंतर्गत असंतोष आणि अमेरिकेसह पाश्चात्त्य देशांच्या दबावाखाली गुदमरतोय, तेव्हा जिनपिंग यांनी पुन्हा तियानमेन कारवाईचे समर्थन करणे म्हणजे, आपल्याच जनतेला दिलेली उघड धमकी आहे.
जिनपिंग यांचा संदेश साफ आहे की, कम्युनिस्ट पक्षाच्या एकछत्री अमलाला आव्हान देण्याची हिंमत कुणीही करू नये. पक्षाची सत्ता टिकवण्यासाठी आम्ही १९८९ प्रमाणेच पुन्हा रणगाडे उतरवायला मागेपुढे पाहणार नाही! आपल्या भाषणात जिनपिंग यांनी या नरसंहाराला देशाचे ‘सार्वभौमत्व’ आणि ‘स्थैर्य’ जपण्यासाठी घेतलेला निर्णय म्हटले. परंतु, कोणता देश आपल्याच देशातील शांतताप्रिय विद्यार्थ्यांची कत्तल करून स्थैर्य मिळवतो? जियांग झेमिन यांच्या कौतुकाचा बहाणा करत, जिनपिंग यांनी पक्षातील आणि देशातील विरोधी आवाजांना इशारा दिला आहे. ‘झिरो टॉलरन्स’च्या नावाखाली आज चीनमध्ये ‘ग्रेट फायरवॉल’द्वारे इंटरनेटवर पोलादी नियंत्रण लादले गेले आहे. हाँगकाँग असो वा शिनजियांग, जिथे जिथे स्वातंत्र्याचा आवाज उठेल, तिथे तिथे १९८९चीच दडपशाहीची नीती राबवली जात आहे.
या दडपशाहीत नेमके किती लोक मारले गेले, याचा अधिकृत आणि स्वतंत्र आकडा आजही उपलब्ध नाही. चीन सरकारने सुमारे २०० नागरिक आणि काही सुरक्षा कर्मचार्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षदर्शी, ब्रिटिश राजनैतिक दस्तऐवज आणि मानवाधिकार संघटनांच्या माहितीनुसार मृतांची संख्या शेकड्यांपासून तीन हजारांहून अधिक असल्याचे विविध अंदाज आहेत. चीनच्या इंटरनेटवर ‘४ जून’, ‘६४’, ‘तियानमेन’ किंवा ‘टँक’ यांसारख्या शब्दांवर कठोर ‘सेन्सॉरशिप’ आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाला भीती आहे की, या दडपशाहीचे सत्य नव्या पिढीसमोर आले, तर कम्युनिस्ट पक्षाच्या नैतिक वैधतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
मात्र, जिनपिंग यांनी तियानमेन कारवाईचे समर्थन करून ही बाब सिद्ध केली आहे की, कम्युनिस्ट पक्षाची पायाभरणीच भीती, दडपशाही आणि अमानुष बळाच्या वापरावर झाली आहे. आर्थिक महासत्ता बनल्याचा आव आणणारा चीन आज आतून किती भयभीत आहे, हेच जिनपिंग यांच्या भूमिकेतून दिसते. सैन्याचा वापर करून तात्पुरता विरोध मोडून काढता येतो; पण जनतेच्या मनात पेटलेली स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची ठिणगी कायमची विझवता येत नाही. जिनपिंग यांनी तियानमेन नरसंहाराचे समर्थन करून हेच दाखवून दिले आहे की, बीजिंगच्या राजवाड्यांमध्ये बसलेले हुकूमशहा आजही देशाच्या तरुणपिढीच्या विचारांना आणि लोकशाहीच्या आकांक्षांना घाबरतात!