_202608192045464783_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
मुंबई : लग्नानंतरच्या आयुष्यातील बदलते नातेसंबंध, जबाबदाऱ्या आणि स्वतःची ओळख जपण्याचा प्रवास मांडणाऱ्या ‘लग्न आणि बरंच काही’ या आगामी मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
म्हाळसा एंटरटेन्मेंटच्या डॉ. संजना सुरेश पै आणि अव्यान आर्ट्सच्या अंजली तुषार नान्नजकर यांच्या निर्मितीतील या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती दाणी यांनी केले आहे. पोस्टरचे अनावरण करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चित्रपटाच्या टीमचे अभिनंदन करून आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी चित्रपटाच्या विषयाचे कौतुक केले. मुलीच्या जन्मापासून बालपण, तारुण्य आणि पुढील आयुष्यापर्यंतच्या अनुभवांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला असून, आजी, आई, सध्याची पिढी आणि पुढील पिढी अशा तीन पिढ्यांतील महिलांना हा विषय जोडणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘लग्न’ या एका घटनेपलीकडे स्त्रीच्या आयुष्यात सुरू होणारा नवा प्रवास, बदलती नाती, वाढणाऱ्या जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या स्वप्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या चित्रपटातून संवेदनशीलपणे मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या पडद्यामागील निर्मितीतही महिलांचा मोठा सहभाग आहे. संगीत वैशाली सामंत, छायाचित्रण स्मिता निर्मळ, संकलन भक्ती मायाळू, संवाद शर्वरी पेटकर, कथा यशश्री मसूरकर, वेशभूषा अपेक्षा गांधी सोनी, मीडिया दिग्दर्शन प्रज्ञा सुमती, डिजिटल मार्केटिंग अश्मिकी टिळेकर, पब्लिसिटी डिसाईन प्राजक्ता डोंगरे यांनी चित्रपटाच्या विविध विभागांची धुरा सांभाळली आहे. तसेच अभिनेत्री पूजा सावंत आणि अक्षया नाईक यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.