बुलेट ट्रेनच्या कामाला वेग; ४५३ किमी पिअर पूर्ण, ३५९ किमी व्हायाडक्टचे काम मार्गी

बुलेट ट्रेन प्रकल्पाची वेगाने प्रगती; २०२७ मध्ये सुरत-वापी मार्गावर पहिली धाव

Surat Vapi Bullet Train
 
मुंबई : (Surat Vapi Bullet Train) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून, देशातील पहिल्या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीत महत्त्वपूर्ण टप्पे गाठण्यात आले आहेत. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या जुलै महिन्याच्या प्रगती अहवालानुसार, आतापर्यंत ४५३ किमी पिअरचे काम पूर्ण, तर ३५९ किमी व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे.
 
ट्रॅक उभारणीतही मोठी प्रगती
 
५०८ किमी लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात २१५ किमी आरसी ट्रॅक बेडचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ९१ किमी ट्रॅक स्लॅब टाकण्यात आले असून, त्यावर सिमेंट अॅस्फाल्ट मॉर्टार इंजेक्शनचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. विद्युतीकरणाच्या कामालाही गती मिळाली असून, सुमारे २०० किमी मार्गावर ९ हजारांहून अधिक ओव्हरहेड इक्विपमेंट मास्ट बसविण्यात आले आहेत. हायस्पीड ट्रेनसाठी आवश्यक असलेल्या ओव्हरहेड ट्रॅक्शन यंत्रणेचा हा महत्त्वाचा भाग आहे.(Surat Vapi Bullet Train)
२९७ किमी मार्गावर ध्वनिरोधक भिंती
 
बुलेट ट्रेनच्या वेगामुळे निर्माण होणारा आवाज कमी करण्यासाठी २९७ किमी मार्गावर नॉईज बॅरिअर्स बसविण्यात आले आहेत. प्रकल्पांतर्गत आतापर्यंत १७ नदी पूल आणि १५ स्टील पूल पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील बोगदा बांधकामालाही वेग आला असून, चार माउंटन टनेलचे उत्खनन पूर्ण झाले आहे. एनएटीएम तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे ५ किमी बोगद्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.(Surat Vapi Bullet Train)
 
२०२७ मध्ये पहिली बुलेट ट्रेन धावणार
 
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील पहिली बुलेट ट्रेन ऑगस्ट २०२७ मध्ये सुरत-वापी या सुमारे १०० किमीच्या मार्गावर धावण्याची शक्यता आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण कॉरिडॉर कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा-नगर हवेली या भागांतील एकूण १२ स्थानके असतील. या मार्गाचा सुमारे ९० टक्के भाग उन्नत स्वरूपाचा असून, उर्वरित भागात बोगदे, पूल आणि स्थानकांचा समावेश आहे.(Surat Vapi Bullet Train)
 
मुंबई-अहमदाबाद प्रवास अवघ्या १ तास ५८ मिनिटांत
 
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बुलेट ट्रेनचा कमाल वेग ३२० किमी प्रतितास असेल. चार स्थानकांवर थांबा घेतल्यास मुंबई-अहमदाबाद प्रवास १ तास ५८ मिनिटांत, तर सर्व १२ स्थानकांवर थांबा घेतल्यास सुमारे २ तास १७ मिनिटांत पूर्ण होणार आहे. संपूर्ण ५०८ किमी मार्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे नियोजन असून, डिसेंबर २०२९ पर्यंत संपूर्ण कॉरिडॉर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.(Surat Vapi Bullet Train)
 
एकूण पूर्ण झालेले काम
 
४५३ किमी पिअर
३५९ किमी व्हायाडक्ट
२१५ किमी आरसी ट्रॅक बेड
२०० किमी विद्युतीकरणाचे काम
२९७ किमी नॉईज बॅरिअर्स
१७ नदी पूल
१५ स्टील पूल
 
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर