भक्तिरसाची ‘बालमुद्रा’!

    19-Aug-2026
Mudra Sawant Young Kirtankar
 
 
बदलत्या काळातही कीर्तनाच्या माध्यमातून संतविचारांचा धागा आपल्या साधनेतून समाजापुढे
नेणार्‍या मुद्रा राजेंद्र रमा सावंत हिच्याविषयी...
 
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातले कीर्तनाचे स्थान समजून घ्यायचे असेल, तर त्याकडे केवळ धार्मिक दृष्टीने पाहून चालणार नाही. एकेकाळी कीर्तन हे गावाच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या सामूहिक जीवनाचा भाग होते. काळाच्या ओघात ते जीवनच बदलले. पण, तरीही आजच्या पिढीतील अनेक मुले संतपरंपरेच्या पालखीचे ध्वजवाहक आनंदाने होत आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे मुद्रा राजेंद्र रमा सावंत!
 
मुद्राचा जन्म मुंबईतलाच. गिरगावच्या संस्कारशील वातावरणातील बालपण, तिच्या मनावरच्या संस्कारांचे पहिले पर्व ठरले. हिंदू संस्कृती आणि धर्माविषयीच्या अभिमानाचा वारसा तिला वडिलांकडूनच लाभला. तिचे वडील शिवव्याख्याते. त्यामुळे शिवचरित्र, इतिहास आणि संस्कृती हे तिच्यासाठी नंतर वाचून समजलेले विषय नव्हते; बालपणीच तिच्या भावविश्वाचा ते भाग झाले. एखाद्या मुलाच्या मनावर संस्कार होताना त्याला त्यांची जाणीव नसते. ते त्याच्या व्यक्तिमत्त्वातून हळूहळू प्रकट होतात. मुद्राच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. तिचे सुरुवातीचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. पुढे पालकांनी मातृभाषेतील शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. शिक्षण म्हणजे केवळ बुद्धीला माहिती देणे नव्हे; व्यक्तिमत्त्वाच्या मुळांना पाणी देणेही आहे, याच जाणिवेतून झालेला तो निर्णय होता. त्यानंतर दादरच्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये तिचा प्रवेश झाला.
 
घरात मोठा भाऊ कीर्तनाचे धडे घेत होता. तो एखादे पद किंवा श्लोक म्हणत असे आणि ते शब्द मुद्राच्या कानावर पडत. ऐकताच ते तिला पाठ होत. तिने ते शिकण्याचा संकल्प केला नव्हता; शिकवणाराही कोणी तिच्यासमोर नव्हता. तरीही मनाने त्यांना आपलेसे केले. बालमनाची हीच तर विलक्षणता आहे, ते ज्यावर प्रेम करते, त्याचे शिक्षण त्याला वेगळे घ्यावे लागत नाही. मुद्राची कीर्तनाशी झालेली पहिली ओळख अशी सहजच होती. तिची ओढ पालकांच्या लक्षात आली आणि तिला कीर्तन शिकवण्याचा निर्णय झाला. शिवाजी पार्कमधील जांभेकर महाराज मठात, गांधर्व विद्यालयांतर्गत सुरू असलेल्या बालकीर्तन प्रशिक्षण वर्गात तिने प्रवेश घेतला. त्या वेळी ती अवघी सहा वर्षांची होती. त्यामुळे प्रवेशाची अडचण आली. तरीही तिची परीक्षा घेण्यात आली. त्यात मुद्रा महाराष्ट्रात पहिली आली. यानंतर मात्र तिच्या वाटचालीला एक दिशा मिळाली.
 
दोन वर्षे जांभेकर महाराज मठात कीर्तनाचे धडे घेतल्यावर, तिने पहिले कीर्तन याच मठात सादर केले. पुढे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी, दादरच्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेत तिने प्रवेश घेतला. तीन वर्षे साधनारत राहून, तिने ‘कीर्तनालंकार’ पदवीही संपादन केली. वयाच्या जवळपास बाराव्या वर्षी परीक्षेसाठी स्वतःचे कीर्तन तयार करून, ते प्रकल्प म्हणूनही सादर केले. एखाद्या कलेशी बालवयात परिचय होणे सहज शय आहे; पण त्या परिचयाचे नाते, नात्याचे प्रेम आणि प्रेमाचे साधनेत रूपांतर होणे ही मनाच्या जडणीची वेगळीच प्रक्रिया! कीर्तनकलेसाठी वाचनाची गरज सर्वश्रुत आहे. मुद्राने लहान वयातच अनेक लघुकथा, कथा आणि ‘ययाती’सारख्या कादंबर्‍या वाचल्या आहेत.
 
कलासाधना करताना शालेय अभ्यासाकडे तिचे दुर्लक्ष झाले नाही. यावर्षी ती इयत्ता नववीत असून, पहिलीपासून आजवर तिने ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुणच मिळवले. इयत्ता सहावीमध्ये ‘होमी भाभा’ परीक्षेत तिने पदक मिळविले, तर पाचवी आणि आठवीमध्ये शिष्यवृत्तीही. कीर्तनाबरोबरच विज्ञानाचीही तिला आवड. शाळेतील विविध विज्ञानविषयक कार्यक्रमांत ती सहभागी होते. तिच्या व्यक्तिमत्त्वातील हे दोन प्रवाह एकमेकांना छेद देत नाहीत. उलट, या दोन्हींच्या सहवासाने तिच्या व्यक्तिमत्त्वाला व्यापक आकार मिळाला आहे.
 
कीर्तनाबरोबरच मुद्रा हार्मोनिअमचे शिक्षणही घेत आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात गीतापरिवाराच्या माध्यमातून, तिने भगवद्गीता मुखोद्गत केली. आज अठराही अध्याय तिच्या स्मरणात आहेत. सध्या जांभेकर महाराज मठात, गांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून ती ‘कीर्तन विशारद’ची तयारी करीत आहे. आजवर तिने सुमारे ३० कीर्तने केली असून, त्यात चरित्र आख्यानापासून जन्माच्या कीर्तनापर्यंत विविध प्रकारांचा समावेश आहे.
 
सध्या तिच्यासमोर दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचे ध्येय आहे. पुढे कोणत्याही शाखेत पदवी घेतली, तरी कीर्तन सोडणार नाही, असे ती ठामपणे सांगते. या तिच्या निर्धारात साधनेतून आलेली एक शांत निश्चयाचे दर्शन घडते. एखाद्या कलेशी नाते जोडणे सहज असते; त्या नात्याला काळाच्या ओघात जपणे कठीण. मुद्राने या नात्याची दिशा आताच ठरविली आहे. बालवयातच संतविचारांचा प्रसार करणार्‍या मुद्रा सावंत हिला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!
 
-कौस्तुृभ वीरकर 




संबंधित मजकूर