मुंबई : (MMRDA Recruitment Complaints) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) 235 रिक्त पदांसाठी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची स्वतंत्र उच्चस्तरीय समितीमार्फत पडताळणी करण्यात येणार आहे. प्रोव्हिजनल निकालानंतर काही उमेदवारांनी परीक्षा प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदविल्यानंतर एमएमआरडीएने तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या नियम व प्रक्रियेनुसार ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली असून, ऑनलाइन अर्ज केलेल्या 26,749 उमेदवारांची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी 20,459 उमेदवार परीक्षेला उपस्थित होते.(MMRDA Recruitment Complaints)
माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
या तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी करण्यासाठी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक डॉ. श्यामप्रसाद करगडे आणि प्राध्यापक डॉ. दासका सत्यनारायण मूर्ती हे समितीचे सदस्य आहेत. प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, भरती परीक्षा शासनाने निर्धारित केलेल्या प्रक्रियेनुसार आणि शासनमान्य टीसीएस संस्थेमार्फतच घेण्यात आली आहे. या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, उमेदवारांच्या तक्रारींचे निराकरण करून भरती प्रक्रियेबाबत पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी स्वतंत्र चौकशीचा निर्णय घेण्यात आला आहे.(MMRDA Recruitment Complaints)
तक्रारींसाठी 30 दिवसांची मुदत
भरती प्रक्रियेबाबत तक्रार, आक्षेप अथवा म्हणणे मांडू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आवश्यक पुरावे आणि संबंधित कागदपत्रांसह पुढील 30 दिवसांत आपली तक्रार एमएमआरडीएकडे सादर करता येणार आहे. या कालावधीत प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी आणि त्यासोबत सादर करण्यात आलेल्या पुराव्यांची समितीकडून निष्पक्ष व वस्तुनिष्ठ पद्धतीने पडताळणी केली जाणार आहे. याचबरोबर, प्राधिकरणाने परीक्षा प्रक्रियेबाबत टीसीएसकडूनही खुलासा मागविला आहे.(MMRDA Recruitment Complaints)
समितीचा अहवाल येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित
समितीला तक्रारींचे निष्पक्ष परीक्षण करता यावे, यासाठी समितीचे परीक्षण पूर्ण होईपर्यंत भरती प्रक्रियेतील पुढील कार्यवाही केली जाणार नाही. समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.(MMRDA Recruitment Complaints)
राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन, नियोजन आणि प्रशासकीय प्रक्रियेचा अनुभव असलेली ही समिती भरती प्रक्रियेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची तपासणी करणार आहे. उमेदवारांचे हित आणि भरती प्रक्रियेची पारदर्शकता, निष्पक्षता व विश्वासार्हता कायम राखण्यास प्राधिकरण कटिबद्ध असल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे.(MMRDA Recruitment Complaints)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.