कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकल्पांना गती; मेट्रो, रस्ते आणि सॅटिसचा आढावा

मेट्रो-१२, ऐरोली-काटई मार्ग, कल्याण रिंग रोडसह विविध प्रकल्पांच्या कामांना वेग देण्याच्या सूचना

    19-Aug-2026
Kalyan Lok Sabha Projects
 
ठाणे : (Kalyan Lok Sabha Projects) वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता कल्याण लोकसभा मतदारसंघातील मेट्रो, फ्लायओव्हर, रिंग रोड, फ्रीवे आणि सॅटिस प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले. एमएमआरडीए मुख्यालयात झालेल्या बैठकीत मतदारसंघातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.
 
मेट्रो-१२च्या डबल डेकर मार्गाखाली प्रस्तावित फ्लायओव्हरचे काम मेट्रोसोबतच वेगाने पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश शिंदे यांनी दिले. फ्लायओव्हरसाठी आवश्यक परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासोबतच मेट्रो स्थानकांसाठी आवश्यक जमीन आणि परवानग्याही आधीच मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. मेट्रो पूर्ण झाल्यानंतर फ्लायओव्हरसाठी स्वतंत्रपणे प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी दोन्ही प्रकल्प समांतरपणे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. (Kalyan Lok Sabha Projects)
 
फ्लायओव्हरवर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी आवश्यक जोडरस्ते, मार्गिका आणि वाहतूक नियोजनही आतापासूनच निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. यामुळे मेट्रो आणि रस्ते वाहतुकीचा समन्वय साधून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. (Kalyan Lok Sabha Projects)
 
मेट्रो-१२ विस्तारालाही गती
 
कल्याण-तळोजा मेट्रो-१२च्या सुरू असलेल्या कामाला गती देतानाच शिळफाटा-मुंब्रा-कळवा मार्गे ठाणे अशी मेट्रो-१२ब विस्तारित मार्गिका पुढे नेण्याबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबत मेट्रो-५, ५अ, ५ब आणि कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो-१४च्या कामांचाही आढावा घेण्यात आला. (Kalyan Lok Sabha Projects)
 
ऐरोली-काटई फ्रीवे अंतिम टप्प्यात
 
ऐरोली-काटई फ्रीवेच्या काटई नाका येथील बोगद्याचे काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. येत्या ऑक्टोबरमध्ये दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. फ्रीवेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक भूसंपादनालाही गती देण्यात येणार आहे.
 
बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि डोंबिवलीला जोडणाऱ्या नियंत्रित प्रवेश मार्गाच्या आरेखनाचाही आढावा घेण्यात आला. पूर्व-पश्चिम जोडणीसोबतच या मार्गाची डबल डेकर मार्ग आणि मेट्रो-१४शी सांगड घालण्याबाबत चर्चा झाली. (Kalyan Lok Sabha Projects)
 
कल्याण रिंग रोड वेळेत पूर्ण व्हावा
 
डोंबिवली-टिटवाळा प्रवास अधिक सुलभ करणाऱ्या कल्याण रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्यासाठी भूसंपादन तातडीने पूर्ण करून उर्वरित कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. रिंग रोडमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
 
कल्याण पूर्व यू-टाईप रस्ता आणि श्रीमलंग रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादन, बाधित नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन तसेच पुढील टप्प्यात समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून घरे आणि व्यावसायिक गाळे उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. (Kalyan Lok Sabha Projects)
 
पत्री पूल, सॅटिस आणि घनकचरा प्रकल्पांनाही वेग
 
तिसऱ्या पत्री पुलाचे काम सुरू असून उर्वरित जागेचे भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. विविध वाहतूक प्रकल्पांच्या मार्गात येणारे विद्युत ट्रान्सफॉर्मर वेळेत स्थलांतरित करून तांत्रिक अडथळे दूर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
अंबरनाथ-बदलापूर-उल्हासनगर संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील शेड, यंत्रसामग्री आणि उर्वरित कामे पूर्ण करून नोव्हेंबरमध्ये प्रकल्प नागरिकांच्या सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
 
अंबरनाथच्या सुमारे ८० कोटी रुपयांच्या सॅटिस प्रकल्पाला गती देण्यासोबतच डोंबिवली सॅटिसचे काम लवकर सुरू करण्याबाबत चर्चा झाली. उल्हासनगर सॅटिसच्या आराखड्यावर स्वतंत्र बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
 
बैठकीला आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी, उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम, माजी आमदार राजू पाटील, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपमहापौर अमर लुंड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळ यांच्यासह विविध प्रशासकीय यंत्रणांचे अधिकारी, अभियंते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. (Kalyan Lok Sabha Projects)
 
प्रकल्प सुरू नव्हे, पूर्ण झाले पाहिजेत
 
"मेट्रो, फ्लायओव्हर, रिंग रोड, फ्रीवे आणि सॅटिस या सर्व प्रकल्पांची परस्पर सांगड घालून कल्याण लोकसभा मतदारसंघाची भविष्यातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. प्रकल्प केवळ कागदावर किंवा अर्धवट अवस्थेत न राहता वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळणे हे आमचे प्राधान्य असेल"
-- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
 
 




संबंधित मजकूर