अखेरीस आपल्या न्याय्य-हक्कांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार्या झारखंडच्या विद्यार्थ्यांसमोर हेमंत सोरेन सरकारला झुकावे लागले व विद्यार्थ्यांच्या मागण्याही मान्य करणे भाग पडले. ‘सीजेपी’च्या आंदोलनानंतर लगोलग उफाळलेल्या या आंदोलनाने मात्र विरोधकांचा दुटप्पीपणा उघडा पाडला. त्याचा आढावा घेणारा हा लेख...
नवी दिल्लीमध्ये ‘नीट’ परीक्षेतील गैरप्रकारांच्या विरुद्ध आंदोलन झाले. ‘जेन-झी’च्या आंदोलनास मिळत असलेला प्रतिसाद पाहून या आंदोलनात विविध विरोधी पक्ष उतरले. या आंदोलनाचे निमित्त साधून विरोधकांनी आपल्या पोळ्या भाजून घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे मोदी सरकारला जबर हादरा बसणार, अशी स्वप्ने विरोधकांकडून रंगविली जात होती. पण, विरोधकांचे सर्व मनोरथ, सरकारने जी पावले उचलली त्यामुळे धुळीस मिळाले. जंतरमंतरवरील आंदोलनाच्या पाठोपाठ झारखंड राज्यात असेच आंदोलन सुरू झाले. पण, हेमंत सोरेन सरकारकडून त्या आंदोलनाकडे प्रारंभी दुर्लक्ष केले गेले. पण, त्या आंदोलनास विद्यार्थीवर्गाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला. विद्यार्थीशक्तीने सोरेन सरकारला निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर अखेर सरकारला झुकावे लागले. झारखंड राज्यामध्ये होणार्या सर्व भरती परीक्षा रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केली. ‘टीडीपीएल’ने घेतलेल्या ‘जेपीएससी’ - ‘जेएसएससी’सह सर्व परीक्षा रद्द करण्यात येत असल्याचे सोरेन यांनी घोषित केले. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाकडे प्रारंभी सोरेन सरकार, त्या सरकारला पाठिंबा देणारा काँग्रेस पक्ष यांनी दुर्लक्ष केले. पण, विद्यार्थी नेता देवेंद्रनाथ महतो याचे प्रदीर्घ काळ चाललेले उपोषण, विद्यार्थ्यांचा सत्याग्रह आणि मुख्यमंत्री सोरेन यांच्या निवासस्थानावर येत्या दि. २० ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने मोर्चा नेण्याचा दिलेला इशारा लक्षात घेऊन सोरेन सरकारला झुकावे लागले.
‘झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चा’चे नेते देवेंद्रनाथ महतो यांनी परीक्षेतील अनियमिततेच्या निषेधार्थ गेल्या दि. २ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांचे उपोषण लक्षात घेऊन सरकारने महतो यांना इस्पितळात हलविले होते. पण, इस्पितळात असताना विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘तिरंगायात्रे’त सहभागी होण्यास ते निघाले असताना, पोलिसांनी त्यांना रोखले. त्या झटापटीत महतो यांच्या छातीस इजा झाली. दि. १५ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा २२वा दिवस होता. त्याच दिवशी हा प्रकार घडला होता.
‘जेपीएससी’ - ‘जेएसएससी’च्या भरती परीक्षा रद्द कराव्यात; तसेच या भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या. हेमंत सोरेन सरकारने आता भरती परीक्षाच रद्द केल्याने युवाशक्तीचा मोठा विजय झाला आहे. "आम्ही जी मुदत दिली आहे, त्या मुदतीत सरकारने कृती न केल्यास आमचे आंदोलन अधिक आक्रमक होईल,” असा इशारा विद्यार्थी नेता रवींद्र पासवान याने दिला होता. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात झारखंड राज्यातील सर्व जिल्हास्थानी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे पुतळे जाळण्यात येतील, असे विद्यार्थी नेता पीयूष कुमार यांनी सांगितले होते. विद्यार्थी अधिक आक्रमक झाल्यास आपले काही खरे नाही, हे सोरेन सरकारच्या उशिरा का होईना लक्षात आले आणि त्या सरकारने सर्व भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
झारखंड राज्यातील विद्यार्थी परीक्षांमधील गैरप्रकारांबद्दल आंदोलन करीत होते. मग त्या आंदोलनास राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अन्य विरोधी नेत्यांनी का पाठिंबा दिला नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. पण, याचे कारण स्पष्ट आहे. काहीतरी निमित्त साधून केंद्रातील मोदी सरकारची बदनामी कशी होईल, हा एककलमी कार्यक्रम विरोधकांचा असल्याने त्यासाठी ते सर्व जंतरमंतरवर एकवटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा ‘फार्स’ करून चमकोगिरी करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी करून पाहिला होता. पण, झारखंडमध्ये आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांच्या मागण्या हेमंत सोरेन मान्य करीत नसतील, तर त्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे धाडस राहुल गांधींनी लगेचच का दाखविले नाही? असाही प्रश्न उपस्थित होतो. दिल्लीमध्ये एक भूमिका घ्यायची आणि झारखंडमध्ये वेगळी घ्यायची, हा दुटप्पीपणा झाला. पण, अखेर सोरेन यांचे डोळे उघडले आणि विद्यार्थी आंदोलनाच्या रेट्यापुढे त्या सरकारला नमावे लागले, झुकावे लागले.
बस्तरमध्ये स्वातंत्र्याची पहाट!
छत्तीसगढमधील बिजापूर, सुकमा आणि नारायणपूर या जिल्ह्यांतील ९२ दुर्गम खेड्यांमध्ये यंदाच्या स्वातंत्र्य दिनी प्रथमच ‘तिरंगा’ राष्ट्रध्वज फडकला. या ९२ खेड्यांमधील ग्रामस्थांनी या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला. मार्च २०२६ मध्ये हा सर्व भाग माओवाद्यांपासून मुक्त झाल्यानंतर आता त्या भागात विकासाचे, शांततेचे आणि घटनात्मक सुशासनाचे वारे वाहू लागले आहेत, हे यावरून दिसून येत आहे. भारतास स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच या खेड्यांमध्ये ध्वजारोहण झाले. माओवाद्यांचा हिंसाचार, त्यांची दहशत यामुळे या भागात कोणतेही राष्ट्रीय सण साजरे केले जात नव्हते. छत्तीसगढ सरकारने दिलेल्या माहितीनुसार, बिजापूरमधील ३३, सुकमामधील ५० आणि नारायणपूरमधील नऊ गावांमध्ये प्रथमच राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. एकेकाळी या सर्व प्रदेशात नक्षलवाद्यांचे प्राबल्य होते. पण, या भागातून त्यांचे उच्चाटन झाल्याने तेथील नागरिक आता मोकळेपणाने श्वास घेऊ लागले आहेत. यासंदर्भात आपली प्रातिनिधिक प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अमित शाह म्हणतात, "कुर्रेगुटा डोंगर हा एकेकाळी नक्षलवाद्यांचा गड होता. आज त्याठिकाणी तिरंगा ध्वज गौरवाने फडकत आहे. जेथे एकेकाळी बंदुकांचे आवाज येत होते, तेथे आता राष्ट्रभक्तीचा गजर होत आहे. लाल मातीवर फडकत असलेला ‘तिरंगा’ नक्षलमुक्त बस्तरची शक्ती, प्रगती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.” या भागात झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाद्वारे दुर्गम भागात राहणारी जनता आणि शासन यांच्यातील संबंधात लक्षणीय परिवर्तन झाल्याचे दिसून आले. बस्तर भागात जो बदल घडला आहे, त्यावरून या भागात घटनात्मक शासन पुनर्स्थापित झाल्याचे दिसून येते, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी निर्धार केला की, हवे ते घडून येऊ शकते हे नक्षलवाद्यांच्या उच्चाटनावरून दिसून येते.
केरळम् : काँग्रेस नेत्याच्या पाकला शुभेच्छा!
केरळम् राज्यातील एका काँग्रेस नेत्याने पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्या देशाला शुभेच्छा देण्याचा संतापजनक प्रकार घडला. त्यावरून समाजमाध्यमांवर गदारोळ झाल्यानंतर त्या नेत्याने आपली ‘पोस्ट’ मागे घेतली. पथानामथित्ता येथील एका स्थानिक काँग्रेस नेत्याने पाकिस्तानला शुभेच्छा दिल्या. या काँग्रेस नेत्याचे नाव रेजी पुवाथूर असे असून, त्याने दि. १४ - दि. १५ ऑगस्टदरम्यान समाजमाध्यमांवर पाकिस्तानला शुभेच्छा दिल्या. पाकिस्तानचा ध्वज दाखवून, "पाकिस्तानचे ऐय कायम राहो आणि त्या देशाची भरभराट होवो,” असे त्या नेत्याने समाजमाध्यमावर म्हटले होते. एकीकडे काँग्रेस नेत्याने पाकिस्तानला शुभेच्छा देण्याचा प्रकार घडला असतानाच, दुसरीकडे काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना ‘वन्दे मातरम्’संदर्भात कडक सूचना केल्या होत्या. काँग्रेस नेत्याने जी पोस्ट टाकली होती, त्यावर माध्यमांतून जोरदार टीका झाली. भाजप आणि विविध हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्या पोस्टचा निषेध केला. टीकेचा झालेला भडिमार लक्षात घेऊन त्या काँग्रेस नेत्याने अखेर आपली पोस्ट ‘डिलीट’ केली. ज्या काँग्रेस नेत्याने सदर पोस्ट टाकली होती, तो स्थानिक नेता असला; तरी त्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचे आढळून आले आहे. एकीकडे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन करण्यास विरोध करायचा; पण त्याच वेळी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी त्या देशाला शुभेच्छा द्यायच्या, अशा देशविघातक प्रवृत्तींचे उच्चाटन होणे अत्यंत गरजेचे आहे. समाज जागरूक होत आहे, हे त्या नेत्याने आपली पोस्ट हटवल्यावरून लक्षात आले आहे. अशी जागरूकता सदैव सर्व ठिकाणी राहिली, तर देशविघातक शक्ती आपले डोके मुळीच वर काढणार नाहीत.