मुंबई - महाराष्ट्राच्या घराघरात हास्याची उधळण करणारा आणि प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण करणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि सोनी मराठी यांनी आपल्या यशस्वी प्रवासाची आठ वर्षे पूर्ण केली. या खास निमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने सेटवर एकत्र येऊन हा आनंदाचा क्षण साजरा केला.
गेल्या आठ वर्षांत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने केवळ एक विनोदी कार्यक्रम म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. विविध व्यक्तिरेखा, भन्नाट स्किट्स, कलाकारांची अफलातून केमिस्ट्री आणि रोजच्या आयुष्यातील प्रसंगांना विनोदी अंदाजात मांडण्याची शैली यामुळे या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून सातत्याने भरभरून प्रेम मिळत आलंय.
या खास प्रसंगी दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणाले, “महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा आठ वर्षांचा प्रवास आमच्यासाठी अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा आहे. या प्रवासात कलाकार, लेखक, तंत्रज्ञ आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याने मनापासून योगदान दिलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला आपलंसं केलं. आमच्या पात्रांवर, विनोदावर आणि कलाकारांवर त्यांनी जे प्रेम केलं, तेच आम्हाला सातत्याने नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देत आलं आहे. आठ वर्षांनंतरही प्रेक्षकांना हसवण्याची आणि त्यांचं मनोरंजन करण्याची हीच ऊर्जा आम्हाला पुढे घेऊन जाणार आहे.”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चा हा आठ वर्षांचा प्रवास म्हणजे कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, निर्माते आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीसोबतच प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाचा उत्सव आहे. सेटवर झालेल्या या छोटेखानी सेलिब्रेशनमधूनही संपूर्ण टीमचा एकमेकांशी असलेला जिव्हाळा आणि या कार्यक्रमाविषयीची आपुलकी पाहायला मिळाली.