FASTag स्थानिक पासची सुविधा आता पूर्णपणे डिजिटल

देशभरातील १२१ पथकर नाक्यांवर ऑनलाइन सुविधा

FASTag Local Pass
 
मुंबई : (FASTag Local Pass) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील १२१ पथकर नाक्यांवर FASTag स्थानिक मासिक पासची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पात्र वाहनधारकांना मासिक स्थानिक पास मिळवण्यासाठी आता पथकर नाक्यावर प्रत्यक्ष जाण्याची किंवा कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही. ‘राजमार्गयात्रा’ भ्रमणध्वनी अनुप्रयोगाद्वारे हा पास ऑनलाइन मिळवता येणार आहे.
 
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक सुलभ करण्याबरोबरच पथकर वसुलीच्या व्यवस्थेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने ही डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे.(FASTag Local Pass)
 
या सुविधेअंतर्गत पात्र पथकर नाक्यापासून २० किलोमीटरच्या परिसरात राहणारे नागरिक ‘राजमार्गयात्रा’ भ्रमणध्वनी अनुप्रयोगावरून FASTag स्थानिक पाससाठी अर्ज करू शकतात. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित वाहनधारकाला त्या पथकर नाक्यावर महिनाभर अमर्यादित प्रवासाची सुविधा मिळणार आहे. यासाठी लागू असलेल्या नियम व अटींचे पालन करणे आवश्यक असेल. यापूर्वी स्थानिक पास मिळवण्यासाठी वाहनधारकांना संबंधित पथकर नाक्यावर प्रत्यक्ष जाऊन रहिवासी पत्ता आणि पात्रतेशी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागत होती. नव्या ऑनलाइन व्यवस्थेमुळे ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे.(FASTag Local Pass)
 
सरकारी माहितीच्या आधारे पडताळणी
 
या डिजिटल प्रक्रियेत ‘डिजिलॉकर’ आणि ‘वाहन’ यांसारख्या सरकारी डिजिटल व्यासपीठांची जोड देण्यात आली आहे. अर्जदाराच्या संमतीनंतर त्याचा रहिवासी पत्ता, वाहनाची माहिती आणि वाहनाशी जोडलेल्या इलेक्ट्रॉनिक पथकर ओळखपत्राची माहिती मिळवली जाते. त्यानंतर भौगोलिक माहिती प्रणालीच्या आधारे अर्जदाराचा नोंदणीकृत पत्ता संबंधित पथकर नाक्यापासून निर्धारित २० किलोमीटरच्या परिसरात आहे की नाही, याची पडताळणी केली जाते. अधिकृत डिजिटल माहिती आणि भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित पडताळणीमुळे कागदपत्रांची प्रत्यक्ष तपासणी आणि मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे. तसेच स्थानिक पाससाठी पात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक अचूक आणि एकसमान होण्यास मदत होणार आहे.(FASTag Local Pass)
 
जुलैमध्ये पहिली अंमलबजावणी
 
स्थानिक पासची डिजिटल सुविधा जुलै २०२६ मध्ये दिल्लीतील मुंडका–बक्करवाला पथकर नाक्यावर प्रथम सुरू करण्यात आली होती. या प्रारंभिक अंमलबजावणीनंतर आता ही सुविधा देशभरातील १२१ पथकर नाक्यांपर्यंत विस्तारण्यात आली आहे. आगामी काही महिन्यांत आणखी पथकर नाक्यांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आहे.(FASTag Local Pass)
 
राष्ट्रीय महामार्गावरील वाहनधारकांना ‘राजमार्गयात्रा’ व्यासपीठावर संबंधित पथकर नाका डिजिटल स्थानिक पाससाठी पात्र आहे की नाही, याची माहिती तपासता येणार आहे. स्थानिक पासचे डिजिटल रूपांतर हे नागरिककेंद्रित सेवा अधिक सक्षम करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा भाग असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुलभ, पारदर्शक आणि अखंड राष्ट्रीय महामार्ग प्रवास व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.(FASTag Local Pass)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर