मुंबई : (BRICS Youth Energy Council) भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत आठवी ब्रिक्स युवा ऊर्जा परिषद २०२६ दि. १७ ऑगस्ट रोजी आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आली. या परिषदेत ब्रिक्स सदस्य देशांमधील ऊर्जा मंत्रालये, शासकीय संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील १०० हून अधिक युवा ऊर्जा तज्ज्ञांनी सहभाग घेतला. ब्रिक्स युवा ऊर्जा संस्था तसेच ‘सस्टेनेबल एनर्जी फॉर ऑल’, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्थेच्या प्रतिनिधींनीही परिषदेत सहभाग घेतला.
भारताच्या २०२६ मधील ब्रिक्स अध्यक्षतेचे मार्गदर्शक सूत्र ‘लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी’ असे आहे. ऊर्जा क्षेत्रासाठी भारताने ‘सर्वेषां ऊर्जम्’ अर्थात ‘सर्वांसाठी ऊर्जा’ हे सूत्र स्वीकारले आहे. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये सर्वसमावेशक, परवडणारी आणि सर्वांना उपलब्ध ऊर्जा व्यवस्था निर्माण करण्याच्या भारताच्या बांधिलकीचे हे सूत्र प्रतीक आहे. (BRICS Youth Energy Council)
ऊर्जाक्षेत्रातील सहकार्यात युवक केंद्रस्थानी
परिषदेत ब्रिक्स देशांमधील ऊर्जा सहकार्यात युवकांची भूमिका केंद्रस्थानी ठेवण्यात आली. नवोन्मेष, उद्योजकता, तंत्रज्ञानाचा विकास आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रमुख वाहक म्हणून युवकांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. युवा व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, शासकीय यंत्रणा आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावरही चर्चा झाली. युवकांच्या सहभागाचे रूपांतर प्रत्यक्ष परिणामांमध्ये करण्यासाठी संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान प्रात्यक्षिके, ज्ञानाची देवाणघेवाण आणि कौशल्यविकास उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. (BRICS Youth Energy Council)
परिषदेत तीन प्रमुख क्षेत्रांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये ऊर्जा सुरक्षा व शाश्वतता, ऊर्जा उपलब्धता व समानता तसेच तंत्रज्ञान व नवोन्मेष यांचा समावेश होता. २० हून अधिक युवा प्रतिनिधींनी विविध देशांचे अनुभव आणि भूमिका मांडल्या. ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणणे, सक्षम ऊर्जा पुरवठा साखळी, सर्वांसाठी ऊर्जा उपलब्धता, नाविन्यपूर्ण अर्थसाहाय्य, नव्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर तसेच ऊर्जा व्यवस्थेचे डिजिटलायझेशन यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. (BRICS Youth Energy Council)
सक्षम आणि शाश्वत ऊर्जा व्यवस्थेवर एकमत
ब्रिक्स देशांमधील चर्चेत लवचिक आणि विविधतापूर्ण ऊर्जा व्यवस्था, परवडणारी व सर्वसमावेशक ऊर्जा उपलब्धता आणि स्वच्छ ऊर्जेच्या विस्तारासाठी नाविन्यपूर्ण व परवडणारे अर्थसाहाय्य यांची गरज अधोरेखित करण्यात आली. तंत्रज्ञानातील नवोन्मेष आणि डिजिटलायझेशन हे ऊर्जा व्यवस्थेला अधिक कार्यक्षम, लवचिक आणि सक्षम बनविणारे महत्त्वाचे घटक असल्याचे नमूद करण्यात आले. यासाठी विश्वसनीय ऊर्जा माहिती, परस्पर सुसंगत डिजिटल व्यवस्था, सायबर सुरक्षा आणि कुशल मनुष्यबळ आवश्यक असल्याचेही परिषदेत स्पष्ट करण्यात आले. (BRICS Youth Energy Council)
भारताच्या ऊर्जा उपक्रमांची माहिती
भारताच्या युवा प्रतिनिधींनी ऊर्जा सुरक्षा, ऊर्जा उपलब्धता, स्वच्छ ऊर्जेचा विस्तार आणि वीज क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित विविध राष्ट्रीय उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये पीएम-कुसुम, पीएम सूर्य घर, शांती कायदा, सुधारित वितरण क्षेत्र योजना आणि इंडिया एनर्जी स्टॅक यांचा समावेश आहे. भारताने ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणणे, वीज वितरणाची पायाभूत सुविधा मजबूत करणे, विकेंद्रित अक्षय ऊर्जा आणि डिजिटलायझेशनला चालना देणे या क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचेही सादरीकरण करण्यात आले. (BRICS Youth Energy Council)
याशिवाय स्मार्ट ग्रीड आणि ऊर्जा साठवणुकीवरील ब्रिक्स डिजिटल सेंटर ऑफ एक्सलन्स हे ज्ञानाची देवाणघेवाण, कौशल्यविकास तसेच स्मार्ट ग्रीड, ऊर्जा साठवणूक आणि वीज ग्रीडची लवचिकता यांसंदर्भातील सहकार्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असल्याचे भारताने अधोरेखित केले. आठव्या ब्रिक्स युवा ऊर्जा परिषदेत सुरक्षित, शाश्वत, सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज ऊर्जा क्षेत्राच्या निर्मितीत ब्रिक्स देशांतील युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका पुन्हा अधोरेखित झाली. ‘सर्वांसाठी ऊर्जा’ या संकल्पनेच्या दिशेने ब्रिक्स देशांमधील ऊर्जा सहकार्य अधिक बळकट करण्याचा निर्धार परिषदेत व्यक्त करण्यात आला. (BRICS Youth Energy Council)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.