मुंबई : (Prabhadevi) मुंबई महानगरपालिकेच्या ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसर पादचाऱ्यांसाठी सुरक्षित, सुविधाजनक आणि अडथळेमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने अतिरिक्त महापालिका आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी मंगळवारी प्रभादेवी रेल्वे स्थानक, प्रस्तावित पादचारी पूल (FOB) तसेच परिसराची पाहणी केली.
पाहणीदरम्यान त्यांनी स्थानकाचे प्रवेश-निर्गमन मार्ग, पादचाऱ्यांची ये-जा, वाहतूक व्यवस्था तसेच प्रवाशांच्या सुरक्षेबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. (Prabhadevi)
पादचारी पुलाच्या जिन्यांचे काम लवकर सुरू करण्याचे निर्देश
अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी विद्यमान पादचारी पुलासाठी प्रस्तावित जिन्यांच्या बांधकामाला गती देण्याचे निर्देश दिले. महापालिकेकडून ‘पे अँड यूज’ शौचालयांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर पश्चिम रेल्वेला जिन्यांचे काम तातडीने पुढे नेण्यास सांगण्यात आले. (Prabhadevi)
दक्षिण दिशेला पादचारी पुलाचा प्रवेश-निर्गमन मार्ग रुंदावताना विद्यमान शौचालय हटविणे आवश्यक असल्यास, त्याऐवजी पर्यायी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले. प्रस्तावित पादचारी पुलाच्या संरेखनाची व्यवहार्यता तपासून पुलाच्या जिन्यांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेशी समन्वय साधण्यासही सांगण्यात आले. (Prabhadevi)
अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश
रेल्वे स्थानक आणि परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे प्राधान्याने हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना तसेच नागरिकांना स्थानकातून बाहेर पडताना आणि परिसरात ये-जा करताना होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
स्थानक परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी शेअर टॅक्सी स्टँड तसेच टॅक्सी प्रवाशांना उतरविण्याच्या ठिकाणांचे योग्य नियोजन करण्याचे आणि आवश्यकता भासल्यास ही ठिकाणे स्थलांतरित करण्याचे निर्देशही देण्यात आले. (Prabhadevi)
रस्त्यांचे पुनर्पृष्ठीकरण होणार
प्रभादेवी स्थानक आणि परिसराची व्यापक स्वच्छता करण्यासोबतच आवश्यक संपर्क व पोहोच मार्गांचे पुनर्पृष्ठीकरण (Resurfacing) करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Prabhadevi)
तसेच उत्तर दिशेला नमन मिडटाउन आणि इंडिया बुल्स बिझनेस पार्कदरम्यान प्रभादेवी स्थानकाच्या प्रवेश-निर्गमन मार्गाच्या रुंदीकरणाच्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आली. स्थानक परिसरात ‘आपला दवाखाना’ सुरू करण्याच्या प्रस्तावावरही अधिकाऱ्यांसोबत विचारविनिमय करण्यात आला. (Prabhadevi)
प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने आवश्यक कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे प्रभादेवी स्थानक परिसरात पादचारी, रेल्वे प्रवासी आणि नागरिकांना सुरक्षित, अडथळेमुक्त आणि सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. (Prabhadevi)
पाहणीदरम्यान जी-दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह, रेल्वे, एमएमआरडीए, एमआरआयडीसीएल, वाहतूक पोलीस तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Prabhadevi)